आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिक चाकोरीचा फेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझी पिढी ही खिळाछपाईची साक्षीदार आहे. माझी स्वत:ची सुरुवातीची दोन-तीन पुस्तकं खिळाछपाईवर निघाली आहेत. इसवी सन दोन हजारपर्यंत खिळाछपाई होती. नव्वदनंतर संगणक आला न् पुढच्या दहा-बारा वर्षांत त्यानं खिळाछपाईचा खात्मा केला. ती यंत्रणा भंगारात गेली आणि एवढ्याशाच काळात संगणकानंही तुफान प्रगती केली.

गेल्या पन्नास-साठ किंवा शंभरसुद्धा वर्षांचा मराठी प्रकाशनांचा लेखाजोखा घेतला, तर असं दिसतं की, एके काळी कथा-कादंबर्‍या छापण्याचा जोर होता. थोडेफार वैचारिक ग्रंथ छापले जात होते. पण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मराठी प्रकाशनानंसुद्धा जगातले तमाम विषय पुस्तकरूपानं आणण्याची झेप घेतली आहे.

एकेकाळी कथा, कादंबर्‍या किंवा जाडे ग्रंथ छापण्यातच प्रकाशकांना प्रतिष्ठा वाटायची. याशिवाय आपण काही छापलं तर आपल्या नावाला बट्टा लागेल असं ते समजायचे. सरळ सरळ व्यावसायिक असणारी पुस्तकं छापणं तर या प्रकाशकांना लाजिरवाणं वाटायचं. मग तेव्हा नावानं मोठे असलेल्या काही प्रकाशकांनी बिचकत बिचकत पाककृतींची पुस्तकं काढली. लाजत लाजत विकू लागले. लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. मग ज्ञान देण्याच्या नावाखाली काहींनी कामजीवनावरची पुस्तकं काढली. लोकांनी त्यांनाही चांगला प्रतिसाद दिला आणि मग प्रकाशकांचं धाडस वाढत गेलं. ते मग बेधडकच व्यावसायिक पुस्तकांच्या प्रकाशनात उतरले आणि वेगवेगळ्या क्षेत्रांवरची पुस्तकं निघण्याचा धडाका वाढला. त्यात मग विज्ञानापासून अंधश्रद्धांपर्यंत सगळाच मसाला होता. तो सगळा मसाला जोरातच खपू लागला. त्यातनं मग अशी पाळी आली की कथा, कादंबर्‍या न् इतर ललित साहित्य विक्रीच्या बाजूनं दुय्यम ठिकाणी जाऊन पोहोचलं. आजही तीच स्थिती आहे.

हा सगळा मसाला खपू लागण्याची कारणं जरा समजून घेतली पाहिजेत. जगात, महाराष्ट्रात आणि प्रकाशन व्यवहारात त्या वेळी अनेक गोष्टी घडल्या. मुख्य गोष्ट घडली ती आपल्या समाजात आधी दूरचित्रवाणीचा प्रसार वाढला. पाठोपाठ संगणकानं आपला जम बसवला. दुसर्‍या बाजूला शिक्षण घेणं, हे जे एके काळी शिंगाळू शहाण्यांचं कुरण होतं, ते बदलून प्रत्येकाला वाटू लागलं की, शिकलं पाहिजे. शिक्षणाची महत्ता वाढली. त्यातच शिक्षणाच्या एके काळी मर्यादित शाखा होत्या. त्यांचा संकोच सुटून, वैविध्यपूर्ण शाखांची भरमार झाली. व्यावसायिक जागतिकीकरणाची एक नवी लाट आली न् तिनं लोकांमध्ये भांडवली व्यवस्थेमधली पैशांची स्पर्धा लावून दिली. पैशांशिवाय या जगात जगता येणं अशक्य आहे, अशी नवीच भीती या स्पर्धेनं प्रत्येकाच्या मनात रुजवली. त्यामुळं पैसा कमावणं हेच सर्वांचं ध्येय बनलं. मग पैसा, अधिक पैसा मिळवण्यासाठी लोकांना अधिकाधिक माहितीची गरज वाटू लागली. दूरचित्रवाणी, संगणक प्रणाली माहिती देतच होती. पण त्या माहितीला वेग होता. संथपणा नव्हता, दूरचित्रवाणी, संगणक बगलेत मारून - अर्थात माहिती सोबत घेऊन वावरण्याची सोय नव्हती. ती सोय पुस्तकांनी केली. त्यांच्यातली माहिती हवी तेव्हा वाचता येऊ लागली. त्यामुळं या काळात माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक, जगण्याची कला शिकवणार्‍या पुस्तकांची बेसुमार चलती सुरू झाली. धर्म, अध्यात्म यांनाही दांडगं धंदेवाईक रूप आलं. त्यांचीही पुस्तकं खपू लागली.

याच काळात जगभरच्या विविध माणसांच्या चरित्रांना, आत्मचरित्रांनाही मागणी वाढली. त्यामागंही ती पैसा मिळवण्याची, यश मिळवण्याची, मोठं होण्याची प्रत्येकात लागलेली भांडवली स्पर्धाच होती. ही चरित्रं वाचून आपल्याला यश मिळवण्याची प्रेरणा, दिशा मिळेल ही वाचणारांची मानसिक धारणा. पुन्हा कथा-कादंबर्‍या वाचायचं सोडून माणसं जगातल्या इतर विषयांच्या पुस्तकांकडं वळली याला आणखीही एक कारण असू शकेल. नव्वदनंतर देशात करमणूक क्रांती झाली, ती घराघरात शिरली न् वाचणारातली काही माणसं तिकडं वळली. या करमणूक क्रांतीला समांतर किंवा तिच्यापेक्षा जास्त प्रभावी अशा कथा-कादंबर्‍यांचं लिहिणं मराठीत घडेना. तेही एक कारण असावं माणसं मराठी कथा-कादंबर्‍यांपासून दूर पळण्याचं. मध्यंतरी मराठी प्रकाशन व्यवसायात एक काळ असा आला की, प्रकाशक कथासंग्रह, कवितासंग्रह असल्या साहित्याची पुस्तकं काढायला धजेनात. कादंबर्‍याही मोठ्या जिवावर आल्यागत काढायचे. कथा, कवितांना नकोच म्हणायचे. त्यांचा त्यात दोष नसणार. ग्राहकच जर कथा, कादंबर्‍या, कविता विकत घेणं नको म्हणत असतील तर ते तरी त्या गोष्टी कशाला छापतील?

वाचकाला नावीन्याची ओढ असते, आपण जगतोय त्याच्या पुढचं काहीतरी लेखकांनी सांगावं, आपल्याला लेखकांनी अज्ञात विश्व दाखवावं, अशी वाचकांची अपेक्षा असते, याकडं बहुतेक मराठी लेखक आणि प्रकाशकांचंही दुर्लक्ष झालेलं दिसतं. थोडं नवं काहीतरी लिहिलं जातंय असं दिसलं की त्या त्या काळातल्या त्या त्या लेखकांना मराठी वाचकांनी त्या काळापुरतंच का होईना, डोक्यावर घेतल्याची उदाहरणं अनेक घडलीत. विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी ही नावं याच कारणानं गाजली असावीत. बाबा कदम, सुहास शिरवळकर ही नावं लोकप्रिय झाली, त्यालाही तेच कारण असावं. त्यांचे विषय, त्यांची भाषा लोकांना नवी वाटली असणार सुरुवातीला.

आपल्या जगण्याच्या बाहेरचं किंवा आपल्या काळाच्या पुढचं लिहिणार्‍या लेखकांमुळं समाजाचा बौद्धिक विकास होतो. जगण्याच्या, विविध पद्धतींच्या नवनव्या संकल्पना त्यामुळं समाजात रुजतात. समाजाच्या सर्व प्रकारच्या विकसनाला ती गोष्ट पूरक ठरते. आत्मानुगत अशा समकालीन किंवा गतकालीन-आणि त्यातही चाकोरीबद्ध अशा विषयांवर ज्या समाजात भरपूर लिहिलं जातं, तो समाजही मग आपोआप मागं राहतो. त्याच्यात पुढच्या नव्या झेपा घेण्याची वृत्ती निर्माण होत नाही. त्यातही व्यावसायिक-व्यावहारिक पुस्तकं जगण्याचं कौशल्य आणि तंत्र शिकवत असली तरी, मानवी समाजाला समूहात टिकून राहायची भावनाशीलता शिकवण्याचं काम ललित साहित्याची पुस्तकं करतात. ती मानवी समाजाला उन्नत होण्याची भावनिक, बौद्धिक प्रेरणा देतात. कथा-कादंबर्‍यांचा वाटा यात मोठा असतो.

मराठी ललित साहित्य बहुश: चाकोरीबद्धच राहिलं. त्यानं समाजही चाकोरीबद्धच घडत राहिला. चाकोरीच्या बाहेर काही आहे, असतं, याचं ज्ञान द्यायला हे साहित्य कमी पडलं. लिहिण्याची काही काही बंड घडली, पण ती पुन्हा चाकोरीच्या आतलीच होती. काही लेखकांनी भाषेची मोडतोड वगैरे केली, पण त्यांचे विषय आत्मानुगतच होते. तेही आपल्यातून उठून बाहेर जाऊन, काही समजून घेऊन, तिकडच्या बाजूचं तटस्थपणानं काही लिहिताहेत असं दिसलं नाही. त्यांचे ग्रह, दुराग्रह जरा मोडतोडीच्या भाषेत, पण पुन्हा एकांगीच लिहिणं, असंच त्यांचं लिखाण राहिलं. उदाहरणार्थ, साठच्या दशकात बंडखोर म्हणून आलेलं मराठी साहित्य. त्यातही काही लेखक तुकाराम महाराजांचं साहित्य सर्व समाजाला सहज उपलब्ध असताना त्या साहित्याचं विश्लेषण करून, त्या साहित्याचं पुनरुज्जीवन करण्याचा आव आणत राहिले. तुकाराम महाराजांच्या पुढं जाऊन नव्या काळाचं काही लिहावं, आपण स्वत:च नव्या काळाचे तुकाराम महाराज व्हावं, याकडं मात्र त्यांचं दुर्लक्ष झालं. वाचक काही काळ नाइलाजानं साहित्याच्या चाकोर्‍या सोसत राहिला, तरी त्याची नावीन्याची ओढ संपत नाही. चाकोरीचा कंटाळा येणं हा मानवी स्वभाव आहे. मराठी लेखक नवं काही द्यायला कमी पडतायत असं दिसलं तेव्हा मराठीचा नाद सोडून वाचक दुसर्‍या भाषेतल्या मूळच्या किंवा अनुवादित साहित्याकडं वळले.(क्रमश:)