मराठी प्रकाशन व्यवहार दळभद्रा आहे, असं एक चित्र असतं. याची कारणं शोधणं गरजेचं आहे. मराठीतल्या तमाम प्रकाशकांचा इतिहास पाहिला, तर असं दिसेल की, यातला प्रत्येक प्रकाशक या धंद्याला सुरुवात करताना फार मोठा भांडवलदार होता न् भरभक्कम भांडवल घेऊन, नीट सगळी तयारी करून तो या धंद्यात उतरला, असं दिसणार नाही. मराठीतला प्रत्येक प्रकाशक हा अतिशय प्राथमिक, कच्च्या अवस्थेत आणि अतिशय अल्प अशा भांडवलावर या धंद्यात उतरला, असंच दिसेल. कित्येक प्रकाशकांच्या प्रारंभाच्या कथा तर फारच मजेशीर आहेत. ‘फक्त पन्नास रुपये होते खिशात आणि एक पुस्तक काढायचं ठरलं,’ ‘एका स्नेह्यांकडून साडेतीनशे रुपये उसने घेतले आणि प्रकाशन सुरू केलं’ अशा वाक्यांनी त्या कथा सुरू होतात. ‘मी एक पुस्तक लिहिलं. ते एका प्रकाशकांकडं घेऊन गेलो. ते म्हणाले, पुस्तकात पैसे गुंतवावे लागतील. मी म्हटलं, तुझ्याकडं पैसे गुंतवण्यापेक्षा मीच माझ्या पुस्तकाचा प्रकाशक होतो’, या वाक्यांच्या कथा तर मराठी प्रकाशन विश्वात हमखास ऐकू येतात.
रस्त्यावर जुनी पुस्तकं विकता विकता प्रकाशक झालेले प्रकाशकही मराठीत आहेत, आणि छापखाने चालवून छपाईची कामं करता करता प्रकाशनात उतरलेले लोकही मराठीत आहेत. एखादं नियतकालिक चालवत प्रकाशक झालेलेही लोक आहेत किंवा प्राध्यापकी करता करता प्रकाशक झालेलेही आहेत. पण या सगळ्यांचं एक समान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, एखादा उद्योगपती किंवा एखादा दुकानदार जशा व्यावसायिक आखण्या, त्यांचा कालावधी, गुंतवायचं भांडवलं, मिळवायचे नफे, सोसायचे तोटे, असं सारं बारकंसारकं नियोजन करून व्यवसायाला प्रारंभ करतो, तसं या प्रकाशकांनी केलेलं आढळत नाही. अतिशय अपुर्या, मोघम आणि तात्कालिक नियोजनावर, भांडवल असो-नसो, अंधार्या दिशेला झटका आल्यागत घेतलेली झेप म्हणजे, मराठी प्रकाशकाच्या धंद्याची सुरुवात. आणि मग सुरुवात केल्यानंतर त्या धंद्याच्या टिकावासाठी करायच्या धडपडी. म्हणजे पोहता येत नसताना डोहात उडी मारून मग जीव वाचवण्यासाठी हातपाय मारायची धडपड करणं म्हणजे, प्रत्येक मराठी प्रकाशकाची कथा. माणसाचं स्वत:चा रोजगार शोधण्याचं जे वय असतं, त्यात मी आयुष्यभर लेखक म्हणूनच व्यवसाय करेन, किंवा मी आयुष्यभर प्रकाशक म्हणूनच व्यवसाय करीन, असं ठरवलेला न् या धंद्यात उतरलेला एकही लेखक-प्रकाशक मराठी साहित्यसृष्टीत दिसत नाही. लेखकाचं एक वेळ जाऊ द्या, लेखक हा व्यवसाय असतो, असं मानायची आपली अजून पद्धत आणि तयारी पण नाही, पण प्रकाशन हा तर व्यवसायच असतो, त्यातही माणसं अनिश्चित आणि अंधार्या उड्या घेतात आणि पुढं प्रकाशक ठरतात, ही मोठी कमालीची गोष्ट मानली पाहिजे. कित्येक जण तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली; नाही तर मोडून खाल्ली, अशा बेतानंच या धंद्यात येतात. मराठीत तर असे कित्येक लोक आहेत, जे जगणं चालवण्यासाठी कुठं तरी नोकर्या करतात आणि कडेकडेला प्रकाशनाचा व्यवसायही करतात.
एका अनिश्चित, अंधार्या डोहात उडी मारायची पद्धत असल्यानं, त्यातले काही जण चिवटपणे आणि जिवटपणे हातपाय मारत कसेबसे कडेला पोहोचतात, काही जण काही काळ हातपाय मारत तगून राहतात आणि बुडतात. हा व्यवसायही मुळात अनिश्चित आणि अंधाराच आहे. या व्यवसायात कशाचीच हमी नाही. अगदी चांगली छपाई मिळण्याची हमी नाही, चांगला लेखक मिळण्याची हमी नाही, चांगला ग्राहक मिळण्याची हमी नाही, चांगले पैसे मिळण्याची हमी नाही आणि मिळालीच चुकूनमाकून तात्पुरती हमी, तर ती सातत्यानं टिकून राहील, याचीही हमी नाही. हा तसा भगवान भरोसेच व्यवसाय आहे. (आणि भगवान तर नसतोच, तो असण्याचीसुद्धा हमी नाही.) त्यामुळंच या व्यवसायात पिढ्या न् पिढ्या टिकून राहिलेले लोक दिसत नाहीत. काही काही प्रकाशक दोनअडीच पिढ्यांपर्यंत येऊन पोहोचलेले दिसतात, पण ते पुढं अनेक पिढ्या टिकून राहतील, किती टिकतील याची हमी नाही. (आणि तरीही या पूर्णपणे बेभरवशी धंद्यात काही प्रकाशकांची आणि लेखकांची नावं मोठी झालेली आपल्याला दिसतात.) कसेबसे लोक, कसेबसे या प्रकाशन धंद्यात आले आणि कसेबसे टिकून राहिले. मग साहजिकच हे कसेबसे लोक पै-पैला चिकट होतात. सातत्यानं पैसा वाचवण्याच्याच विचारात असतात. मोठी व्यावसायिक धाडसं करण्याची धमक त्यांच्यात नसते. जिथं तिथं पैसा वाचवण्याचा नाद त्यांना लागतो. एखादी गोष्ट फुकट मिळणार आहे का, फुकट मिळणार नसेल तर अगदी कमी पैशात मिळणार आहे का, कमी पैशात मिळणार नसेल तर मग त्या गोष्टीचा इतर अंगांनी जास्तीत आणि काय काय उपयोग करून घेता येईल, अशी सवय त्यांना लागते. मराठी प्रकाशक या सवयीचे आहेत. या सवयीचा भाग म्हणूनच कुणाचे द्यायचे पैसे बुडवता येतील का, कुणाचे हक्क मारता येतील का, याचा शोध घेण्याचीही सवय प्रकाशकांना लागते आणि पैसे बुडवायची जास्तीत जास्त सोय असलेला लेखक हा प्राणी त्याला सापडतो. प्रकाशकाच्या त्या ‘कशाबशा’ वृत्तीचा लेखक सहजसाध्य बळी ठरतो, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, केवळ व्यावसायिक किंवा भांडवलशाही व्यवस्थेतले प्रकाशक मराठीत जन्माला येत नाहीत, तोवर मराठीतलं लेखक-प्रकाशकातलं आर्थिक नातं दुरुस्त होण्याची अजिबात शक्यता नाही.
(पुढील आठवड्यापासून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची लेखमाला)