आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्ग आणि नरक पाहायचाय मला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल पृथ्वीवर जन्माला आलं आणि त्यातही माणूस म्हणून जन्माला आलं की, जगात उपस्थित असल्याचा आभास निर्माण करणारे जितकेही धर्म आहेत, ते तुम्हाला थोडेफार थोडेफार आपोआपच माहीत होत जातात. माणसाला जन्माबरोबर एक धर्म मिळण्याची कृत्रिम व्यवस्था इथं मौजूद आहेच आणि एकदा त्याला स्वतःचा धर्म मिळाला की, हळूहळू आपल्या धर्माबरोबर जगात इतरही धर्म आहेत, याचं ज्ञान होण्याचीही व्यवस्था आहेच. मग या धर्मांचे एकमेकांबरोबर जे द्वेष आणि मायेचे खेळ चालतात, त्यातून माणसाला आपल्या आणि दुसऱ्या धर्मांची चुकीची किंवा बरोबर पण बहुधा अर्धवट माहिती होण्याचीही व्यवस्था आहे. त्यातच स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही धर्मांबद्दल थोडेफार आणि मुबलक गैरसमज बाळगण्याचीही सोय इथं आहेच. आणि मीही या पृथ्वीवर जन्माला आल्यामुळं धर्मांबाबत इतरांना या ज्या माहितीच्या किंवा तथाकथित ज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्या मलाही साहजिकच झाल्या आहेत.

धर्म हेच मुळात माणसाचं स्वप्नरंजन आहे. आणि या एका स्वप्नरंजनाच्या पोटात माणसानं आणखी असंख्य स्वप्नरंजनं रचली आहेत. गेली साडेचार हजार वर्षं पिढी दर पिढी बाळगत आणलेलं आणि अखिल माणसाच्या जातीनं, कुणीतरी निव्वळ एकट्यादुकट्यानं नव्हे, स्वतःत नांदवत आणलेलं एकमेव स्वप्नरंजन आहे आणि माणसाच्या प्रत्येक पिढीनं त्याचा कल्पनाविस्तारही केलेला आहे.

थोडेफार संदर्भांचे बदल आहेत धर्माधर्मांत; पण प्रत्येक किंवा सर्वच धर्मांचा मूळ ढाचा साधारणपणे एकच आहे. गूढ शक्ती असलेला आणि सृष्टीचा नियंता असलेला एक परमेश्वर, त्याच्या शक्तीला आव्हान देणारी एक अघोरी शक्ती, परमेश्वराचे विविध साथीदार किंवा दूत वगैरे, त्या सर्वांचे काही चमत्कार वगैरे. माणसानं करायची त्यांची भक्ती, वगैरे. माणसानं पाळायचे धर्माचे काही नियम वगैरे. मग माणसाचा मृत्यू आणि त्याच्या पापपुण्याच्या कर्मानुसार त्याला मिळणारा स्वर्ग किंवा नरक, वगैरे वगैरे. अशीच प्रत्येक धर्माची मूळ मांडणी आहे आणि त्या मांडणीत प्रत्येक धर्माच्या वाहक लोकांनी आपापले संदर्भ भरले आहेत. सगळा मिळून स्वप्नरंजनाचा मुळात एकच खेळ आहे, पण तो अवाढव्य आहे आणि त्या खेळातून कुणालाच वंचित ठेवायचं नाही, असं सर्व धर्मांचं ठरलेलं आहे.

सर्वच धर्मांचा सर्वसाधारण ढाचा किंवा मूळ सांगाडा एकच असला तरी, प्रत्येक धर्माचा आणि त्या धर्माचं जू खांद्यावर घेऊन आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक माणसाचा काल्पनिक दावा असा असतो की, आमचा धर्म इतरांपासून वेगळा आहे. मला माणसांच्या आणि त्यांच्या धर्मांच्या या दाव्यात रस वाटतो आणि त्यातूनच माझं स्वप्नरंजन सुरू होतं. विशेषतः प्रत्येक धर्माची जी स्वर्ग-नरकाची कल्पना आहे, तिचं स्वप्नरंजन करायला मला जास्त आवडतं. या कल्पनेचा मी माझ्या परीनं विस्तार करत राहतो न् मला स्वतःला त्याबाबत काही प्रश्नही पडत राहतात. त्या प्रश्नांशी खेळणं हे माझं मोठं स्वप्नरंजन आहे.

प्रत्येक धर्म आपण दुसऱ्या धर्मांपासून वेगळे आहोत, असा जो भेद जाहीर करत राहतो आणि तो भेद उराशी कवटाळून सर्वच धर्मांचे लोक आपलं भेदयुक्त किंवा भेदासक्त आयुष्य जगत राहतात, ते गृहीत धरूनच माझं हे स्वर्ग-नरकाचं स्वप्नरंजन चालत राहतं.
मला वाटतं, प्रत्येक धर्म दुसऱ्यापासून वेगळा असेल, तर प्रत्येक धर्माचा स्वर्ग आणि नरकही दुसऱ्यांपासून वेगळाच असणार. धर्माधर्मात भेद म्हटल्यावर स्वर्गास्वर्गातही आणि नरकानरकातही भेदच असणार. प्रत्येक धर्माचा आपला स्वतंत्र स्वर्ग आणि आपला स्वतंत्र नरक (की पृथ्वीवर माणसांचे धर्म वेगवेगळे असले तरी माणसांची पापपुण्यं जवळजवळ एकसारखीच असतात, त्यामुळं सर्व धर्मांचे मिळून स्वर्ग-नरकसुद्धा एकच आहेत की काय? आणि असं वाक्य तर नेहमीच ऐकू येतं की, अंतिमतः सर्वांचा परमेश्वर एकच, सबका मालिक एकच, तर स्वर्गनरकांचा मालकही एकच असणार की काय?) पण पृथ्वीवर आज धर्म वेगवेगळे आहेत आणि त्यांचे अनुयायी कट्टरपणे धर्मांचे भेद पाळतात, तर मी गृहीत धरतो की, त्यांचे स्वर्ग-नरकही वेगवेगळे असणार.

तर माझ्या जगण्यातलं सर्वात मोठं स्वप्नरंजन हे आहे की, हे स्वर्ग-नरक आपण जिवंतपणी पाहून यावेत आणि फक्त एकाच धर्माचे स्वर्ग-नरक नाही, तर सर्वच्या सर्व धर्मांचे स्वर्ग-नरक पाहून यावेत. एवढ्या आस्थेनं आणि चवीचवीनं सर्वच धर्मांनी स्वर्ग-नरकाच्या कल्पना मांडलेल्या आहेत, तर आपण त्या साक्षात पाहून, अनुभवून याव्यात. (आणि यातलं ‘पाहून यावेत’ हे महत्त्वाचं. स्वर्ग आणि नरकांचा दौरा करून परत येणं महत्त्वाचं. कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही किंवा नरकसुद्धा दिसत नाही, हे सर्वधर्मसत्य असल्यानं मला वाटतं, आपण जिवंतपणी तिकडं तमाम स्वर्गांत आणि नरकांतसुद्धा जावं आणि पुन्हा जिवंत परत यावं. कारण परत आल्यावर मला मी लेखक असल्यानं आणि वास्तव लिहिणारा लेखक अशी माझी ‘ख्याती’ असल्यानं मला त्यावर अधिकारानं आणि अधिकृतपणे लिहिता येईल आणि जगातल्या सर्व मानवजातीला त्यांचं साक्षात पुराव्यांनिशी ज्ञान घडवता येईल. वाटल्यास जाताना मी माझा हुशार मोबाइलही घेऊन जाईन आणि सर्व धर्मांच्या सर्व स्वर्गांचं आणि नरकांचं जितंजागतं चित्रीकरणही करून आणीन. त्यामुळं तिथल्या खऱ्याखोट्याची सज्जड साक्षच मिळून जाईल सगळ्यांना. पण मला निबार दांडगेपणानं वाटतं की, आपण जगातली अशी एकमेव व्यक्ती ठरावं की, जी तमाम धर्मांच्या तमाम स्वर्गांचा आणि तमाम नरकांचा दौरा करून परत आलीय आणि त्यांच्यावर पूर्ण साक्षीभावानं लिखाण करतेय... माझ्या आयुष्यातलं हे सर्वांत विश्वाल स्वप्न आहे किंवा स्वप्नरंजन आहे.

मी स्वतःशी हे स्वप्नरंजन करतो, तेव्हा मला असंख्य प्रश्न पडतात आणि मी ते स्वतःशी फार आत्मीयतेनं खेळवत बसतो. या प्रश्नांची उत्तरं मात्र मला कितीही शोधलं तरी गवसत नाहीत. उदाहरणार्थ, सर्वच धर्म एका उदात्त टोकाला पोहोचल्यावर म्हणतात की, (आधीच वर म्हटल्याप्रमाणे-) सर्व मानवजातीचा परमेश्वर, नियंता एकच आहे, तर या सर्वच धर्मांचे स्वर्ग आणि नरक एकच आहेत की काय? पण पृथ्वीवर सगळे धर्म आपापला वेगवेगळेपणा एवढ्या कट्टरपणे जोपासतात, तर मला वाटतं की, सगळ्यांचे स्वर्ग-नरक वेगवेगळे असलेलेच बरे. कारण त्यानं विविधता अनुभवायला मिळेल आणि ती विविधता लिहायलाही मज्जा येईल. (कारण विविधता आणि तिच्यातले भेद हेच तर लेखकांच्या लिहिण्याचं मुख्य भांडवल असतं. जगातले भेद आणि भेदांतून येणारी दुःखं जर संपली, तर जगात एक तरी लेखक उरेल का?) मग मला प्रश्न पडतो की, माणसं आणि त्यांचे धर्म पृथ्वीवर राहतात, पण त्या सर्वांचे परमेश्वर आणि स्वर्ग-नरक नेहमी ‘वर’ असतात. तर हे ‘वर’ नेमकं कुठं असतं? तिथं जिवंतपणी जायचं कसं आणि यायचं कसं? आणि प्रत्येक धर्मांचं ‘वर’ एकाच ठिकाणी असतं की वेगवेगळ्या ठिकाणी? त्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येऊन पुन्हा पुन्हा त्या वेगवेगळ्या ठिकाणी जावं जागेल का? की एकदाच वर गेल्यावर एकाच फेरीत सर्व धर्मांचे स्वर्ग-नरक पाहून होतील? मुळात सर्व धर्मांचे सर्व स्वर्ग-नरक एकाच ‘वर’वर असतात का? शेजारीशेजारी असतात का? पृथ्वीवर जसे सगळे धर्म पृथ्वी एकच असल्यामुळं नाइलाजानं एकत्रच राहतात, तसे त्यांचे स्वर्ग-नरक वरसुद्धा एकत्रच असतील का? कशाच्या ताकदीवर ते वर तरंगत असतील? की पृथ्वीसारखी या स्वर्ग-नरकांखाली काही भूमी असेल? या स्वर्ग-नरकांना आपापल्या धर्मांची काही कुंपणं असतील का? भिंती असतील का? स्वर्गातून कुणी पळणं शक्य नाही; पण नरकवास सहन न होऊन पळणारे लोक असतील का? आणि ते पळून जाऊ नयेत, म्हणून बंदोबस्ताच्या काही सुविधा असतील का?

सगळ्या धर्मांची माणसं मेल्यावर त्यांचे आत्मे वर जातात. तर वर गेल्यावर त्या आत्म्यांना आपल्याच धर्मांचे स्वर्ग आणि नरक कोणते, हे कसं ओळखू येतं? पृथ्वीवर जशा आपापल्या धर्मांच्या खुणा असतात, तसं काही असतं का स्वर्ग-नरकात? धर्मांचे रंगीत झेंडे, कागदी पताका, चांदी-सोनं-पितळ-तांबं-लाकूड-पोलाद यांच्या धार्मिक वस्तू वगैरे? पण स्वर्ग-नरक म्हणजे परमेश्वराचं राज्य, तर त्या राज्यात पृथ्वीवरचे धातू, कागद, कापड वापरत असतील का? की आपापल्या धर्मांच्या भाषेतले फलकच लावत असतील थेट स्वर्ग-नरकाच्या प्रवेशद्वारावर?

पण कोणतीही भाषा कोणत्याही धर्माची नसते, असंही आहेच. तर मग परमेश्वराची स्वतःची एखादी भाषा वापरली जाते का फलकावर, दैवी वगैरे? की दूत येऊन घेऊन जातात मेलेल्या माणसांच्या आत्म्यांना? तर मग इथूनतिथून सर्वांचे आत्मे एकच असतात असंही म्हटलं जातं, तर मग हे दूत कोणत्या धर्माचा कोण आत्मा आहे, हे कसं ओळखतात? किंवा मग माणूस मृत होत असतानाच हे दूत येऊन आत्मा घेऊन जातात, असं म्हटलं जातं; तर त्यातला प्रश्न असा की, या दूतांना कोण माणूस कोणत्या धर्माचा आहे, हे कसं ओळखू येतं? अंगावरच्या धार्मिक खुणांनी ओळखतात का? मग जगभर असेही लोक असतात, जे कोणत्याच धार्मिक खुणा अंगावर बाळगत नाहीत, त्यांना दूत कोणत्या धर्माचं म्हणून कसं ओळखतात? की त्यांच्या तोंडी असलेल्या धार्मिक शब्दांवरून आणि परमेश्वराच्या नावाच्या धाव्यावरून दूत या लोकांचा धर्म ओळखतात? पण खूप लोक असेही असतात की, जे आयुष्यात एकाही देवाचं नाव घेत नाहीत किंवा धर्माचा शब्द उच्चारत नाहीत, तर मग दूत नेमक्या आपल्याच धर्माच्या माणसांना कसं ओळखतात? मुळात हे दूत असतात कसे न् दिसतात कसे? ते माणसाच्याच आकार-उकाराचे असतात का? की आत्म्यासारखेच भुसभुशीत असतात? पण मुळात आत्मा भुसभुशीत असतो का?

पृथ्वीवर प्रत्येक धर्म वेगळा न् प्रत्येक धर्माचा परमेश्वर वेगळा, तर हे प्रत्येक धर्माच्या परमेश्वरांचं निवासस्थान असतं कुठं? ते आपापल्या स्वर्ग-नरकाच्या परिसरातच राहतात का? स्वर्ग-नरकात जाणारांची आणि आपापल्या धर्मांच्या परमेश्वरांची भेट घडते का? परमेश्वर त्यांना रोज भेटतो, की अधेमधेच भेटतो? परमेश्वराशी त्यांचा संवाद होतो का न् कोणत्या भाषेत होतो? जगभर एवढ्या भाषा आहेत आणि कोणत्याही भाषेत कोणत्याही धर्माचे लोक जगतात, तर त्यांना देवाशी बोलताना भाषेची अडचण येत नाही का? की सर्व परमेश्वरांना जगातल्या सगळ्याच भाषा येतात?

आणि मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे, हे वेगवेगळ्या धर्मांचे परमेश्वर एकमेकांना कधी भेटतात का? एकमेकांकडं येतात-जातात का? पृथ्वीवर वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना जशी एकमेकांची गरज लागते किंवा ते एकमेकांशी आत्मीयता बाळगतात किंवा ते एकमेकांचा द्वेष करतात, तसं हे परमेश्वर लोकही एकमेकांशी तसंच वागतात का? त्यांना एकमेकांची गरज लागते का? ते एकमेकांशी आत्मीयतेनं वागतात का? ते एकमेकांचा द्वेष करतात का? पृथ्वीवर माणसं आमचा धर्म श्रेष्ठ असं म्हणतात, तसं त्या धर्मांचे परमेश्वर आमचा धर्म श्रेष्ठ आणि मी सर्वात श्रेष्ठ, असं एकमेकांना म्हणतात का? म्हणत असतील तर त्यांच्यात त्यापुढचे संवाद, वाद किंवा युद्ध होतात का? पृथ्वीवर जशा धर्माधर्मांच्या मारामाऱ्या चालतात, तशा विविध धर्मांच्या स्वर्ग-नरकात आणि त्यांच्या परमेश्वरांमध्येही मारामाऱ्या चालतात का? त्या मिटतात का? कोण मिटवतं?

आणखी एक उत्सुकता अशी आहे की, प्रत्येक धर्माच्या प्रत्येक स्वर्गाचा न् प्रत्येक नरकाचा परिसर किती गुंठे, बिघे, मैल पसरलेला असतो? गेली लाखो वर्षं पृथ्वीवरची माणसं मरत आली आहेत, आजही मरत आहेत, पुढंही मरणार आहेत, तर एवढ्या अगणित माणसांना लाखो वर्षं हे स्वर्ग आणि नरक कसे पुरतात? त्यांना जागा अपुरी पडत नाही का? पडली तर ते काय करतात? काही धर्मांची लोकसंख्या जास्त असते, तर काहींची कमी, तर त्या लोकसंख्येनुसार धर्मांचे स्वर्ग-नरक छोटे किंवा मोठे असतात का?

आणि मी ऐकलंय, प्रत्येक सजीवात आत्मा असतो न् प्रत्येक सजीवाचा कर्ताकरविता परमेश्वर असतो. पृथ्वीवर माणसाचीच जात काही सजीव नाही; तर असंख्य, अगणित प्रकारचे सजीव आणखीही आहेत, अमिबा, रोगजंतू, विषाणू, किटाणूपासून हत्ती, जिराफापर्यंत काहीही. अगदी झाडं, वनस्पतीही सजीवात येतात. आणि हे सजीव कधी ना कधी मरतातच. तर त्यांचेही आत्मे कुठं जातात? माणसांचे जसे धर्म, त्या धर्मांचे परमेश्वर आणि स्वर्ग-नरक असतात, तसे माणसाशिवायच्या इतर अगणित सजीवांचे काही धर्म असतात का? त्यांचे स्वतःचे काही परमेश्वर असतात का? त्यांचे स्वतःचे काही स्वर्ग-नरक असतात का?

मृत्यूनंतर कुठं जात असतील या तमाम सजीवांचे आत्मे? की हे जे वेगवेगळ्या धर्मांचे स्वर्ग-नरक आहेत वेगवेगळे, त्यांच्यातच या इतर सजीवांच्या आत्म्यांची वर्णी लागत असेल? पण या सर्वांची धर्माच्या विभागणीत वर्गवारी कशी होत असेल? म्हणजे उदाहरणार्थ, ज्वारी नावाची वनस्पती आहे ती कोणत्या धर्माची, न् हत्ती नावाचा प्राणी आहे तो कोणत्या धर्माचा, न् वांब नावाचा मासा आहे तो कोणत्या धर्माचा, न् दयाळ नावाचा पक्षी आहे तो कोणत्या धर्माचा, न् अमीबा कोणत्या धर्माचा? की माणसांच्या धर्मांच्या स्वर्ग-नरकात यांना जागा नाही? पण मग या इतर तमाम सजीवांचे आत्मे कोट्यवधी वर्षांत कुठं जात असतील? (मला कोंबड्यांबद्दल विशेषत्वानं वाटतं, जगात रोज लाखो कोंबड्या मारल्या जातात, त्यांचे आत्मे कुठं जात असतील?) आणि मुख्य उत्सुकता माझी अशी आहे की, मी स्वतः कुठल्याही धर्माचा, परमेश्वराचा नाही; तर पाहण्यासाठी म्हणून मला त्या त्या धर्मांच्या स्वर्ग-नरकात प्रवेश देतील का? की कोणत्याच धर्माचा नसलेला न् परमेश्वर मानत नाही म्हणून मला प्रत्येक धर्माच्या स्वर्ग-नरकात प्रवेश निषिद्ध केला जाईल? हे मी माझ्या बायकोला विचारलं, तर ती म्हणाली, कदाचित तू कुठल्याच धर्माचा, परमेश्वराचा नसल्यामुळं तुला ते लोक तटस्थ निरीक्षक म्हणून आनंदानं प्रवेश देतील. तू पृथ्वीवर परत जाऊन हे लिहिणारयंस म्हटल्यावर, ते लोक आपापल्या स्वर्गांचा न् नरकांचा कारभार किती आदर्श आणि थोर चाललाय, हे तुला आवर्जून दाखवतील. तू येच एकदा जाऊन...
माझीही तयारी आहे, जगातल्या सगळ्या धर्मांचे सगळे स्वर्ग आणि सगळे नरक मला याचि देही याचि डोळा पाहून यायचे आहेत. तीव्र दिव्य उत्तुंग स्वप्न आहे ते माझं.
राजन खान
aksharmanav@yahoo.com