आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajani Deshpande Article About Pre festival Cleanup, Divya Marathi, Madhurima.

चाँदसा मुखडा क्यूं शरमाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता नवरात्र, मग दसरा आणि नंतर दिवाळी, असं म्हणत पदर खोचून कामाला लागणाऱ्या गृहिणींनी थोडीशी उसंत काढून आवर्जून वाचावा, असा हा गमतीशीर अनुभव...

महालक्ष्मीच्या सणापूर्वी घराची साफसफाई करायला रविवारचा दिवस ठरवला. मोड आलेल्या मटकीचा कांदा-टॉमेटाे घालून मसालेदार रस्सा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, लिंबू आणि पाव. सगळी तयारी करून ठेवली. सुटीचा दिवस म्हणून मुलं नऊ वाजता उठली. ‘नाष्टा तयार आहे’, मी किचनमधून ओरडले. चिंगी आणि विनू पटापट तयार होऊन आले. सगळं साहित्य मध्यभागी ठेवलं. डिश भरल्या. म्हणाले, ‘पोटभर खा, हवं ते. अन् सगळे बाहेर जा. मला माझी कामं आहेत.’ ह्यांनी विचारलं, ‘मीसुद्धा?’ मी ‘हो’ म्हणाले. तुमची लुडबुड नसली की काम झटपट होईल. आज जेवण बाहेर! ‘हो, हो,’ चिंगी अन् विन्याची लगेच संमती मिळाली. चहा घेऊन सगळे बाहेर पडले. मी दार लावेपर्यंत मनी आत आली. ‘बरं झालं बाई तू आलीस ते’,
असं म्हणत मी नेहमीप्रमाणे बशीत दूध घालून तिच्यापुढे ठेवलं. म्याँव म्याँव करत जवळ येऊन मिटक्या मारत तिनं दूध संपवलं. पुन्हा पायात घोटाळू लागली. आधी बैठक स्वच्छ आवरून सोफा, टेबलचे कव्हर बदलून एकदा सगळीकडे नजर टाकून बेडरूमकडे वळले. नावाला बेडरूम, पण बरंचसं सामान दाटीवाटीनं ठेवलेलं. जाळं जळमट अन् खालचं सामान इकडचं तिकडे हलवून सफाई करताना मोठा उंदीर कपाटाखाली पळाला. मनी माझ्या आधी पळाली.
मी झाडूने मारण्याआधी तो कपाटाखाली दडून बसला. ना मला काढता येई, ना तिला. खूप खटपट करूनही तो इकडेतिकडे पेट्यांच्या मागे, कॉटखाली लपत राहिला अन् आम्ही त्याच्या मागे! त्याचा नाद सोडून पसारा आवरणार, इतक्यात तो किचनमध्ये पळताना दिसला. मनी माझ्या आधी पळाली. सगळा पसारा तसाच टाकून मीसुद्धा पळाले.
सिलिंडरच्या मागे, कोपऱ्यात, भांड्याचं रॅक सगळं शोधून झालं. बेटा कुठे लपला होता, कोण जाणे. मनी मध्ये मध्ये घोटाळत होती. अन् तो पाइपवरून एकदम वरल्या रांगेतल्या फळीवरच्या डब्यावर जाऊन बसलेला दिसला. कधी गेला ते कळलेच नाही. माझा झाडूचा हात पुरत नव्हता न मनीची उडी. उडी मारली तरी फळी धरायला जागा नव्हती. त्या प्रयत्नात डोळे वटारून, मिशा पिंजारून मनीची धडपड सुरू असताना उंदीर कोपऱ्यात त्या डब्यावर चढला अन् त्याच्या धक्क्याने अलीकडचा बेसनचा डबा खाली थेट माझ्या डोक्यावर पालथा झाला. जमिनीवर पीठच पीठ. मनीची उडी टेबलवर अन् तिथून किचनच्या ओट्यावर! त्या उडीने किचनवरचा भरलेला तांब्या खाली पडला. सगळीकडे पाणी आणि पीठ. माझा तर अवतारच झाला. हातात झाडू. सर्वांगावर सांडलेलं पीठ. अगदी नखशिखांत. त्या पाण्यातल्या पिठात पाय घसरायला लागले. मनी मात्र ओट्यावरून त्याच्याकडे नजर लावून बसली. घाबरलेला उंदीर डब्याच्या फटीतून तिच्याकडे पाहात होता. त्याची गाळण उडाली होती. समोरी मूर्तिमंत काळ उभा होता. त्या दोघांमुळे मी हैराण. काम मात्र दुप्पट वाढलं होतं. बेडरूमचा पसारा तसाच! मुलं आणि हे असते तर काहीतरी मदत झाली असती, पण...!
रागारागाने मी मनीकडे अन् मनी उंदराकडे पाहात राहिलो. तालबद्ध स्वरात घड्याळात तीनचे ठोके पडले. दारावरची बेल खणखणली. हातात झाडू, पायाला चिकटलेल्या पिठानं सगळ्या घरात पावलं उमटवत मी दार उघडलं. हे आणि मुलं दारात उभी होती. ‘भूत भूत’ विन्या ओरडला अन् बाबांच्या मागे दडला.
चिंगीनं बाबांच्या कंबरेला मिठी मारली. क्षणभर ह्यांनी आणि किलकिलत्या डोळ्यांनी मुलांनी निरखून माझ्याकडे पाहिलं. खो खो करून सगळे हसायला लागले. अगदी पोट धरून! मी वळले तसे सगळे घरात आले. घरातला पसारा पाहात ते माझ्यामागे किचनमध्ये आले. त्या चिकट पाण्याने बेसावध चिंगी पाय घसरून पडली. तसा विन्याच्या हसण्याला जोर आला. डब्याच्या फटीतून दिसणारा उंदीर आणि किचनवरच्या मनीकडे मी रागानं बोट दाखवलं. ह्यांनी
दोघांकडे पाहिलं. त्यांच्या करामतीनं माझ्या अवताराकडे पाहून पुन्हा सगळ्यांना हसण्याची उबळ आली. थोड्या वेळानं त्या जोडीकडे पाहून त्यांना गाणं सुचलं होतं. माझ्या रागाच्या पाऱ्याकडे न पाहता त्यांना विनोद सुचला होता. ‘चाँद सा मुखडा क्यूँ शरमाया, आँख मिले और दिल घबराया... चाँद सा मुखडा...’