आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajeev Tambe Article About A Different School In Australia

शोधा नव्या वाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले सहा महिने मी ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथे माझ्या नातीकडे राहतो आहे. तुमच्यासाठी हा लेख मी तिथूनच लिहीत आहे. आमच्या घरासमोरच एक सरकारी शाळा आहे. ही शाळा एकदम चकाचक आहे. 80 वर्षांपूर्वीची भक्कम दगडी इमारत व मुलांना वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी तीन मैदानं.


या शाळेतल्या मला सर्वात आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे या शाळेतल्या भिंती मुलांनी काढलेली चित्र व त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंनी लगडलेल्या आहेत. या शाळेत आठवड्यातून एक दिवस शून्य ते पाच या वयोगटासाठी फक्त दोन तासांची आनंद-शाळा भरते. या शाळेची ऐच्छिक फी आहे ‘एक सोनेरी नाणं’ (या ठिकाणी एक व दोन डॉलरची नाणी सोनेरी आहेत.) आणि एक फळ.


मी साराला आनंद शाळेत घेऊन गेलो तेव्हा ती फक्त सहा महिन्यांची होती. मी साराला घेऊन वर्गात पाऊल टाकलं तर मला धक्काच बसला. तिथे चिक्कार खेळण्यांच्या पसा-यात डच, लेबनीज, इराणी, जपानी,
चिनी, इंडोनेशियन, ग्रीक व युरोपियन मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा कल्ला सुरू होता.
तिथे 5 महिने ते 4 वर्षांपर्यंतची 20 मुले व त्यांचे 27 पालक होते व हे सर्वजण मिळून खेळत होते. वेगवगेळ्या वंशांची व धर्मांची मुले आपापल्या पालकांसोबत एकाच वर्गात गुण्यागोविंदाने शिकत आहेत.
आणि इथे कुणी कुणाला शिकवत नाहीए तर सारेच नकळत शिकत आहेत आणि एकमेकांच्या सोबत शिकत आहेत.
साने गुरुजींच्या स्वप्नातली आंतरभारती शाळाच आपण पाहतो आहोत, असं वाटलं मला.
वर्गातला हा आनंद-गोंधळ पाहून सारा जोरजोरात चित्कारू लागली, तोंडातून फुर्र फुर्र करत थुंकी उडवू लागली व माझ्या हातातून त्या मुलांच्या दिशेने झेपावू लागली. आता मला समजेना की साराला सांभाळू की यातल्या शिक्षिकेला शोधू? इतक्यात एक तरुण मुलगी हसतच पुढे आली. तिला पाहताच मी तिला हाक मारली, हॅलो जेसिका.
मग तिने आम्हाला तिच्याप्रमाणेच दंडावर चिकटवायच्या नावाच्या पट्ट्या दिल्या.


तिथे वेगवेगळ्या वयोगटांसाठी भरपूर खेळणी होती. मुलांना सांभाळण्यासाठी तीन शिक्षिका. त्या दिवशी त्यांनी आम्हाला भरपूर रंग, निरनिराळे ब्रश आणि रंगवायला चित्रं व छोटे फ्लॉवरपॉट्स दिले.
त्या शाळेत बहुतांश सर्व गोष्टी पालक व मुलांनी मिळून करायच्या असतात. अनेक पालकांनी आपल्या मुलांना खेळायला सोडलं आणि स्वत: लहान होऊन ते मन लावून रंगवारंगवी करू लागले.
काही मुलांना ही पालकांची रंगीत आयडिया समजली. त्यांनी आपापल्या पालकांना विनम्रतेने बाजूला ढकलून रंगांचा ताबा घेतला. मग गाणी, गोष्टी व मस्त खेळ असा मुलांसाठी कार्यक्रम झाला.


जेसिका म्हणाली, तुम्हाला कुणाला मुलांसाठी तुमच्या भाषेतलं छानसं गाणं म्हणायचं असेल, छोटीशी गोष्ट सांगायची असेल किंवा गाणं म्हणत नाच करायचा असेल तर सांगा. भाषा कुठलीही असली तरी चालेल. करा सुरुवात. सर्व मुलांना त्यांच्या भाषांसकट, त्यांच्या संस्कृतीसकट सामावून घेणारा हा वर्ग... ही शाळा मला फार आवडली.
जेसिकाने सांगितल्यावर डायाच्या आईने एक चिनी गाणं म्हटलं. मग साराच्या आजोबांनी एक मराठी कविता म्हटली. मग सगळ्यांनी मिळून एका इंग्रजी कवितेवर धमाल नाच केला.
नंतर मुलांनी आणलेली फळे एकत्र करून सर्व मुलांना वाटली.
शाळेतून घरी जाताना आपण रंगवलेले फ्लॉवरपॉट्स घेऊन मुले व पालक घरी गेले.