आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा हवेचा दाब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मिहीर अभ्यासाला बसला तरी त्याचं लक्ष लागेना. तो मध्यच उठत आजोबांना म्हणाला, ‘सर्वांवर हवेचा दाब असतो म्हणजे ही हवा काय सगळ्यांना सगळीकडून दाबत असते?’ आजोबांनी ‘हो-हो’ करत मान हलवली.

‘पण मला तर सगळीकडे ठाकठीक वाटतंय. मी आजूबाजूला हात फिरवून पाहिला, पण मला ती हवा दाबतेय किंवा चेपतेय असं काही वाटत नाही हं. खरंच. अं... मला सांगा, ही हवा तुम्हाला चारही बाजूने दाबतेय का?’

आता जरा आजोबा गोंधळलेच. मिहीरला कसं काय समजावून सांगावं, हे काही त्यांना समजेना. इतक्यात आजी किचनमधून बाहेर येत
म्हणाली, ‘अरे मिहिरू, माझी पण अवस्था तुझ्यासारखीच आहे.’

मिहीर आनंदाने म्हणाला, ‘म्हणजे तुला पण...’
मिहीरला थांबवत आजी म्हणाली, ‘हो हो. अगदी तुझ्याप्रमाणेच माझ्यावरही त्या हवेचा दाब चारही बाजूंनी आहे आणि मी तो तुला दाखवू शकते.’
‘आँ, हवा कशी काय दाखवणार?’
‘अहो, मी हवा दाखवणार असं काही म्हटलं नाही, तर ‘हवेचा दाब’ दाखवणार असं म्हणाले मी.’
मान हलवत आजोबा म्हणाले, ‘चला पाहूयाच हवेचा दाब, पण हा हवेचा दाब मला फक्त एकाच बाजूने नव्हे, तर चारही बाजूंनी दिसला पाहिजे बरं.’
आजोबांकडे पाहत हसतच आजी म्हणाली, ‘मिहीर पातेलं भरून पाणी गरम कर. आजोबांना दाखवते मी हवेचा दाब.’
आजोबा किरकिरत म्हणाले, ‘गरम पाण्याचा माझ्यावर अभिषेक करणार आहेस की काय?’
‘आता पाहाच तुम्ही,’ असं म्हणत आजी कामाला लागली.
आजीने मिहीरच्या कानात काही सांगितलं.
मिहीरने अर्धी बादली पाणी आणलं.
फिरकीचे झाकण असणारा पत्र्याचा डबा आजीने आणला.

आता पातेल्यातले पाणी उकळू लागले होते. आजीने पत्र्याच्या डब्यात ते उकळते गरम पाणी ओतले. आता डब्यातून वाफा भराभर बाहेर येऊ लागल्या. थोड्या वाफा जाऊ दिल्यावर आजीने फिरकीचे झाकण घट्ट बसवले आणि डबा चटकन बादलीतल्या थंड पाण्यात बुडवला.
आजोबा हे सारं काळजीपूर्वक पाहत होते. त्यांचा चेहरा त्रासिक झाला होता. अजून त्यांना तो हवेचा दाब काही दिसत नव्हता. आता ते काही बोलणार इतक्यात टब् खट् फट् असा काहीसा अवाज आला आणि पाण्यात बुडवलेला डबा आत चेपून वाकडातिकडा झाला.
हे पाहून आजोबा चाट पडले. मिहीर भुवया उंचावून आजीकडे पाहू लागला.

मिहीर म्हणाला, ‘आपण जेव्हा डब्यात उकळतं पाणी ओतलं, तेव्हा त्यातून वाफा येऊ लागल्या.’
‘बरोबर. या वाफेबरोबर डब्यात पूर्वी असलेली हवाही बाहेर जाऊ लागते व डबा पाण्याच्या वाफेनेच भरून जातो. फिरकीच्या झाकणाने डबा हवाबंद करून तो चटकन थंड पाण्यात बुडवल्यावर डब्यात असलेली वाफ थंड होते आणि तिचे पाणी होते, पण झाकण बंद असल्याने आता रिकाम्या झालेल्या जागेत जास्त हवा जाऊ शकत नाही त्यामुळे डब्यात निर्वात जाग किंवा पोकळी तयार होते.’
‘आलं लक्षात. म्हणजे आता डब्यात अत्यंत कमी हवा, तर बाहेर खूप हवा.’

‘म्हणजेच डब्यात हवेचा दाब कमी होतो, पण डब्याच्या बाहेरच्या बाजूला हवेचा दाब इतका मोठा असतो की तो डब्याला आत चेपतो. डबा वाकडातिकडा होतो.’
आजोबांकडे पाहत आजी काही म्हणणार तोच आजोबा म्हणाले, ‘दिसला हो हवेच्या दाबाचा प्रताप! पण मिहीर मला सांग, आपण डब्यात थंड पाणी भरलं आणि बुडवला पाण्यात, तर होईल का तो वाकडा तिकडा?’

‘अहो आजोबा, डब्यात थंड पाणी ओतल्यावर डब्यातली हवा काही बाहेर जाणार नाही. त्यामुळे डब्यात निर्वात पोकळी होणार नाही. त्यामुळे डब्यात असलेली हवा व बाहेरील हवा यांचा
डब्यावर सारखाच दाब असणार तर मग त्या डब्याला कोण चेपणार?’
‘शाब्बास मिहीर. आता तुला समजलं...’
‘त्याला नीट नाही समजलंय. ये मिहीर इकडे. मला वाटतंय, त्याच्यावरचा थोडा हवेचा दाब वाढवला तर चांगलं समजेल त्याला.’
तुम्हाला काय वाटतं, हे शेवटचं वाक्य कोण बोललं असेल?

rajcopper@gmail.com