आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिहिरने सकाळी दरवाजात खोचलेला पेपर बाहेर काढला आणि त्यातून एक रंगीत कागद बाहेर पडला. त्याने तो कागद वाचला आणि तो जोरात किंचाळला. आजोबा घाबरून बाहेर धावत आले. त्यांच्याकडे पाहात मिहिर म्हणाला, ‘‘आजोबा वाट लागली. या रविवारी 500 माणसं मरणार.’’
आजोबा वैतागून म्हणाले, ‘‘सकाळी-सकाळी काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. भूकंप होऊन शहर खड्ड्यात गेल्याचं स्वप्नं पडलं की काय तुला?’’
किचनमधूनच आवाज चढवत आजी म्हणाली, ‘‘हे काय बोलताय तुम्ही? लहान मुलांना असं बोलतात का? ये रे मिहिरू इकडे. काय झालं मला सांग.’’
‘‘अगं आजी या लाल कागदावर लिहिलंय की, ‘या रविवारी 500 लोकं रक्तदान करणार आहेत. तुम्ही पण करा.’ अगं पण रक्तदान केल्यावर फक्त हाडंच शिल्लक राहतील ना? मग माणसं मरणार नाहीत तर काय?’’ हे बोलताना मिहिर थरथरत होता.
आजी हसतच त्याला थोपटत म्हणाली, ‘‘अरे मिहिरू, आपल्या शरीरातलं सगळंच्या सगळं रक्त काही देत नाही कुणी.’’
‘‘अगं आजी ही 500 माणसं कुणाला रक्त देणार? आणि ज्यांना देणार त्यांच्याकडे काय रक्त नसणार? मला काही समजतच नाहीए.’’
‘‘अरे अपघात होतात तेव्हा किंवा शस्त्रक्रिया करताना बरेचसे रक्त वाहून जाते. अशा वेळी त्या व्यक्तीला रक्ताची तातडीने गरज असते. अशांना हे रक्त दिलं जातं.’’
तरीसुद्धा मिहिरचा प्रश्नार्थक चेहरा पाहून आजोबा सांगू लागले, ‘‘शरीरातून वाहून गेलेल्या रक्तामुळे होणारं आपलं नुकसान हे काही कायमस्वरूपी नसतं. काही वेळा तर थोडे दिवस नुसती विश्रांती घेऊनसुद्धा हे नुकसान भरून निघतं.’’
पदराला हात पुसत आजी बाहेर येत म्हणाली, ‘‘लक्षात ठेव, आपल्या एकूण रक्ताच्या 10 ते 15 टक्के रक्त जरी काही कारणाने वाहून गेलं तरी काळजी करण्याचं काही कारण नाही.’’
‘‘अगं आजी, पण आपल्या शरीरात एकूण किती रक्त असतं तेच मला माहीत नाही ना..’’
आजोबा पुढे येत म्हणाले, ‘‘अरे चांगली ठणठणीत तब्येत असणा-या तरुणाच्या शरीरात सरासरीनं साडेपाच लिटर रक्त असतं.’’
‘‘हां हां, त्याच्या दहा टक्के म्हणजे साधारण अर्धा लिटर रक्त जरी वाहून गेलं तरी फार काळजी करण्याचं कारण नाही. हो ना?’’
‘‘बरोब्बर. पण मिहिर, रक्तदानाच्या वेळी दात्याच्या शरीरातून फक्त पाव लिटर एवढंच रक्त काढून घेतलं जातं आणि या रक्ताची भरपाई केवळ 24 तासांत होते. मुख्य म्हणजे, एकदा रक्तदान केल्यानंतर त्या माणसाला पुन्हा दोन महिने रक्तदान करू दिलं जात नाही. त्यामुळे तुला जी भीती वाटतेय...’’
‘‘म्हणजे रक्तदान करणारी माणसं मरणार नाहीत तर त्यांच्यामुळे मरणाचा धोका असणारी माणसं ठणठणीत होतील.’’
‘‘आणखी एक गमतीशीर माहिती सांगते. रक्तदान केल्यानंतर दोन महिने पुन्हा रक्तदान करता येत नाही, पण रक्तातील प्लेटलेट्स दान केल्यानंतर पुन्हा तीनच दिवसांनी परत त्यांचं दान करता येतं!’’
ऑ! आता हे काय नवीन?
यात नवीन काही नाही रे. काही वेळा रुग्णासाठी केवळ प्लेटलेट्सची गरज असते. अशा वेळी डॉक्टर्स संपूर्ण रक्त काढून न घेता ‘एफरीसिस’ नावाच्या प्रक्रियेचा वापर करून रक्तातील फक्त प्लेटलेट्स काढून घेतात.’’
‘‘आणि यांची भरपाई रक्तापेक्षा जलद होते.’’
जरा मोठ्याच आवाजात आजोबा गुरगुरले, ‘‘शाबास मिहिर! पण...’’
‘‘पण आता थोड्याच वेळात नाश्ता नाही मिळाला, तर आपल्याच घरातील एका माणसासाठी मलाच रक्तदान करावं लागेल असं वाटतंय मला.’’
हे शेवटचं वाक्य, कोण म्हणालं असेल असं वाटतंय तुम्हाला?