आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajeev Tambe Article About Education, Divya Marathi

कोरडे रुमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिहीर शाळेतून धावतच घरी आला. कॉटवर सॅक टाकत म्हणाला, ‘आजी आजी, आज शाळेत सॉलिड मजा आली. आज सरांनी ऑफ पिरियडला आम्हाला एक एकदम सोपा प्रश्न विचारला आणि त्याचं सोपं उत्तर माझ्या वहीत लिहून वही बंद केली. गंमत म्हणजे आम्ही खूप उत्तरं सांगितली पण त्याचं ‘ते उत्तर’ कुणालाच सांगता आलं नाही, अगदी सोपं असूनसुद्धा.’

‘हॅ, मी सांगतो. काय प्रश्न होता?’ आजोबांनी असं म्हणताच डोळे मोठे करत आजी म्हणाली, ‘तो प्रश्नबिश्न नंतर. मिहिरू, आधी कपडे बदल, हातपाय धू आणि जेवायला चल.’

मिहीर येईपर्यंत आजोबांना धीर धरवत नव्हता; पण ते आजीकडे पाहून कसेबसे गप्प बसले होते. मिहीर येताच ते ओरडले, ‘सांग प्रश्न आणि ऐक उत्तर.’

हात पुसत मिहीर सांगू लागला, ‘सरांनी आम्हाला विचारलं, ‘दगड पाण्यात पडला तर काय होईल?’ आम्ही खूप उत्तरं सांगितली. म्हणजे उदा.
पाण्यावर तरंग निर्माण होतील.
दगड बुडेल.
डुब्ब असा आवाज होईल.
दगड पाण्यात पडल्याने थोडेसे पाणी वरती उडेल.
पाण्यावर वर्तुळाकार लहरी निर्माण होतील.
ही सगळी उत्तरं बरोबर असूनसुद्धा सर म्हणाले, ‘ठीक आहे; पण हवे ते उत्तर नाही.’ हे ऐकून आम्ही सगळेच चक्रावलो. आजोबा तुम्हाला सांगता येईल का याचे ‘ते’ उत्तर?’
‘अरे, काय समजलास काय तुझ्या अजोबाला? ‘दगड पाण्यात पडल्यावर तो ओला होईल.’ काय बरोबर आहे की नाही?’
‘ग्रेट आजोबा ग्रेट. एकदम सही. हेच त्याचे उत्तर होते. तुम्हाला हे कसं माहीत?’
‘अरे, कुठलीही गोष्ट पाण्यात टाकली किंवा पाण्यात ठेवली तर ती ओली होणारच. हा सिंपल सेन्स आहे.’
आजोबांना थांबवत आजी म्हणाली, ‘हे पाहा, पाण्यात टाकल्यावर ठीक आहे; पण एखादी गोष्ट पाण्यात ठेवली म्हणजे ती काही ओली होतेच, असं काही नाही.’
रागाने डोळे मोठे करत आजोबा गुरगुरले, ‘म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की, तू एखादी गोष्ट पाण्यात ठेवशील आणि तरीपण ती कोरडी राहील? आँ, कसं काय शक्य आहे?’
‘अहो, सहज शक्य आहे. मी तुमच्या खिशातलीच गोष्ट ठेवीन पाण्यात आणि पाहा काय गंमत होते ती.’
‘तो फिर हो जाय पानी का पानी और कोरडे का कोरडा.’
आता भराभर जेवणं झाली. तिघांनी मिळून पटापट किचन आवरलं.
आजीने मिहीरच्या कानात सांगितलं.
मिहीरने रुंद तोंडाची काचेची बरणी आणली. बाथरूममध्ये नळाखाली बादली भरायला ठेवली.
आजोबा खुर्चीत बसून हे सारं पाहत होते. तोंडात सुपारी टाकत व रुमालाने मिशा पुसत आजोबा म्हणाले, ‘काय, झाली का तयारी?’
‘तो तुमचा रुमाल मिळाला की झाली तयारी,’ असं आजीने म्हणताच आजोबांनी आजीला रुमाल दिला.
आजीने त्या रुमालाचा बोळा करून तो बरणीच्या तळाशी घट्ट चेपून बसवला. बरणी उलटी केल्यावर तो खाली पडत नाही ना, याची खात्री केली.

आता पाऊण बादली पाण्याने भरली होती. मग आजीने बरणी उलटी धरून पाण्याने भरलेल्या बादलीत एका झटक्यात पूर्णपणे बुडवली. आणि तशीच थोडा वेळ पाण्यात दाबून धरली. आजोबा डोळे मोठे करून हे सारं पाहत होते.
मग आजीने झटक्यात बरणी पाण्याबाहेर काढली.
आजीने बरणीतला रुमाल बाहेर काढला आणि आजोबांना दिला.
बरणीत पाणीच गेले नव्हते. त्यामुळे रुमाल अजिबात भिजला नव्हता, तर तो व्यवस्थित कोरडा होता.
मिहीरने स्वत:चा रुमाल बरणीत कोंबून हा प्रयोग स्वत: करून पाहिला. तेच झालं. रुमाल सुकाच!
आजोबांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
आजोबा काही बोलण्याआधीच आजी म्हणाली, ‘हवेला जागा लागते. हवेने बरणीतली जागा व्यापल्यामुळे बरणीत पाणी शिरू शकत नाही. बरणीतील हवेचा दाब बादलीतल्या पाण्याला रोखून धरतो. म्हणूनच बरणी सरळ व झटकन पाण्यात बुडवावी लागते.’
‘हां म्हणजे, जर का बरणी पाण्यात बुडवताना तिरकी झाली तर बरणीतली हवा बाहेर पळेल व बरणीत पाणी घुसेल.’
‘शाबास मिहीर. आता तुला समजलं.’
‘हो हो. मलाही समजलं. नाही तर ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे रुमाल’ असं झालं असतं माझं.’
सांगा पाहू हे कोण बोललं असेल?

rajcopper.@gmail.com