आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा हत्तीचं वजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवताना मिहीर म्हणाला, ‘हे बघ आजी, माझी अट लक्षात ठेव. आपल्याकडचा वजनाचा काटा हा माणसांसाठीचा आहे. म्हणजे त्या काट्यावर जास्तीत जास्त एकशेवीस किलो वजनच मोजता येतं. हत्तीच्या नुसत्या एका पायाचं वजन काहीशे किलो असेल. मला सांग, फक्त आपलाच वजनाचा काटा वापरून आपल्याला हत्तीचं वजन मोजता येईल का?’ आजोबा हसत म्हणाले, ‘का नाही येणार? त्या हत्तीचे एक एक भाग वेगळे करायचे आणि मग त्यांचं वजन करून करायची त्यांची बेरीज! काय?’ ‘अगदी बरोबर! आणि मग डॉक्टरांना बोलवायचं...’ आजीने असं म्हणताच मिहीर किंचाळला, ‘आँ? ते कशाला?’ ‘तुझ्या आजोबांनी हत्तीचे वेगळे केलेले भाग मग शिवणार कोण? अहोऽऽ वजन केल्यानंतर तो हत्ती जिवंत राहिला पाहिजे बरं का.’
‘आणि त्या हत्तीचे भाग वेगळे करायचे म्हणजे काय? तुम्हाला काय तो हत्ती गुळाचा वाटला की पुरणाचा?’ डोळे मिचकावत आजोबा म्हणाले, ‘अगं, मी गंमत करत होतो. हत्तीचं वजन करणं ही काही फार कठीण गोष्ट नाही... म्हणजे जसं वाघाचं वजन करतात किंवा जसं सिंहाचं वजन करतात, अं... तसंच मला वाटतं हत्तीचं वजन करतात. कळलं का तुला?’ डोकं खाजवत मिहीर म्हणाला, ‘नाही बुवा. पण मला सांगा वाघाचं वजन कसं करतात?’ डोळे बारीक करून मिशांवर हात फिरवत आजोबा म्हणाले, ‘आत्ताच सांगितलं ना तुला... जसं हत्तीचं किंवा सिंहाचं करतात तसं!’
‘आणि हे बघ, आता मस्त जेवण झाल्यामुळे माझं चांगलंच वजन वाढलं आहे. त्यामुळे यापुढच्या सगळ्या गोष्टी तुला आजी सांगेल बरं.’ आजोबांनी सुपारीचा डबा जवळ ओढला. हाताता अडकित्ता घेणार तोच आजी म्हणाली, ‘थांबा. या क्षणी थांबा.’
‘आधी या अडकित्त्याचं वजन सांगा आणि मगच ती सुपारी खा.’ हे ऐकल्यावर आजोबांचा चेहरा मात्र सुपारीसारखाच झाला.
‘हे पाहा, किचनमध्ये एक छोटासा वजनकाटा आहे. त्यावर जास्तीत जास्त वीस ग्रॅम वजन करता येतं. त्याचा उपयोग करता येईल तुम्हाला,’ असं आजीने म्हणताच मिहीरने विचारलं, ‘पण आजी या अडकित्त्याचं वजन तर वीस ग्रॅमपेक्षा तर नक्कीच जास्ती आहे ना? मग काय करणार?’ आजी एकदम उत्साहाने म्हणाली, ‘चला, आजोबांच्या अडकित्त्याचं वजन करू. मिहीर अर्धी बादली पाणी घे. एक रंगीत खडू घे. तोपर्यंत मी चमचे, उभं भांडं आणि छोटा वजनाचा काटा घेऊन येते.’ आजोबांना गंमत वाटली. एका अडकित्त्याचं वजन करायला अर्धी बादली पाणी आणि एवढ्या सार्‍या वस्तू?
मिहीरने अर्धी बादली पाणी तयार ठेवलं. आजीने ते उचलून आणलं. बादलीतलं डुचमळणारं पाणी शांत झाल्यावर आजीने उभं भांडं पाण्यावर सावकाश ठेवलं. भांडं तरंगू लागलं.
या तरंगणार्‍या भांड्यात मग तिने अडकित्ता ठेवला.
भांडं जिथपर्यंत बुडालं तिथे आजीने खडूने खूण केली.
तिने आता अलगद अडकित्ता काढून घेतला.
भांडं पुन्हा तरंगू लागलं.
‘आता या भांड्यात चमचे टाकायचे का?’ असं मिहीरने विचारताच आजीने फक्त खुणेने मान हलवली.
आजी आता एकेक चमचा भांड्यात टाकू लागली.
भांडे हळूहळू बुडू लागले.
पाच चमचे टाकल्यानंतर भांडं ‘त्या’ खुणेजवळ आलं.
आता आजीने एक लहान चमचा टाकला आणि भांडं ‘त्या’ खुणेपाशीच थांबलं.
आता आजी काही बोलण्याआधीच मिहीर आनंदाने नाचत म्हणाला, ‘कळलं! मला कळलं! आता आपण जर या चमच्यांचं वजन केलं तर आपल्याला त्या अडकित्त्याचं वजन समजेल! हो ना आजी?’ आजीने समाधानाने हसत मान डोलावली.
‘अरे, पाण्यामध्ये वस्तू टाकली की ती पाण्याला बाजूला सारते. आता तरंगणार्‍या पदार्थाचा जो भाग पाण्याखाली बुडालेला असतो, त्या भागाने बाजूला सारलेल्या पाण्याचं वजन त्या तरंगणार्‍या पदार्थाइतकं असतं. आहे किनई गंमत?’ छोटा वजनाचा काटा घेऊन मिहीरने त्या चमच्यांचं वजन केलं आणि अडकित्त्याचं वजन एकोणपन्नास ग्रॅम असल्याचं जाहीर केलं.
‘हत्तीचं वजन कसा करता येईल? हेसुद्धा मी सांगू शकेन.’
डोकं खाजवत आजोबा म्हणाले, ‘पण एवढे चमचे कोण आणणार?’ खुसूखुसू हसत आजी म्हणाली, ‘अहो, कमालच आहे तुमची! चमचे कशाला हवेत? तुमच्यासारखी माणसं आणि मिहीरसारखी मुलं घेतली की झालं काम!’ मिशा फेंदारून आजोबा ओरडणार इतक्यात मिहीर म्हणाला, ‘हत्तीला एका मोठ्या होडीत उभं करायचं. होडी किती बुडते त्या जागी खूण करायची. मग हत्तीच्या जागी माणसांना व मुलांना उभं करून त्या खुणेपर्यंत होडीला बुडू द्यायचं.
‘मग त्या होडीतल्या माणसांचं व मुलांचं वजन करून त्यांची बेरीज केली की आपल्याला हत्तीचं वजन समजेल!’ या पद्धतीने तुम्हाला कशाचंही करता येईल का वजन?
मला कळवाल?
(rajcopper@gmail.com)