आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगीत पाण्याचा डोंगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज संध्याकाळी आजोबांचे जुने मित्र त्यांना भेटण्यासाठी घरी येणार होते. आजोबा मिहीरला कौतुकाने म्हणाले, ‘माझ्या या जुन्या मित्राला काही तरी गंमत दाखव. त्याला बरं वाटेल. अं, काय दाखवशील? त्या घरगुती लिटमस कागदांचा रंग बदलवून दाखवशील? की लिंबाची शॉक ट्रीटमेंट? की त्यांना कागदाची मस्त फुलं करून देशील?’ चेहरा कसानुसा करत मिहीर म्हणाला, ‘खरं सांगू का आजोबा, आज मला कापा, चिरा, चिकटवा, भोकं पाडा या सगळ्या गोष्टींचा जाम कंटाळा आलाय. मी आजीला विचारतो आणि त्यांना काही तरी नवीनच आयडिया करून दाखवतो.’
आपण पाण्याची, शोभेची वस्तू करू!’ असं आजीने म्हणताच आजोबा हसायलाच लागले. ते म्हणाले, ‘अगं पाण्याची शोभेची वस्तू वाहून नाही का जाणार? त्यातून आपलीच शोभा होईल!’ हे ऐकून आजी फक्त भुवया उडवत हसली. आजी मिहीरला म्हणाली, ‘चल, पटापट चार ग्लास घे. तुझ्या रंगपेटीतले चार वेगवेगळे जलरंग घे. एका वाटीत मीठ घे. एक छोटा व एक मोठा चमचा घे. तो कपाटात ठेवलेला काचेचा उंच ग्लास पण घे. तोपर्यंत मी पाणी गरम करते.’ मिहीर कामाला लागला. आजी नेमकं काय करणार आहे, याचा आजोबांना काही अंदाज येईना. आजोबा भीत भीत आजीला म्हणाले, ‘अगं, आमच्यावर तर काही प्रयोग करणार नाही ना? नाही म्हणजे, आम्हाला भरपूर गप्पा मारायच्या आहेत. पण तुमच्या या प्रयोगाच्या तयारीवरून मला असं वाटतंय, की बहुधा आम्हाला तोंडात मिठाच्या पाण्याची गुळणी घेऊनच बसायला लागणार आहे. सांगा तरी तुम्ही काय करणार आहात.’

आजी हसत हसत भुवया उडवत म्हणाली, ‘आम्ही पाण्याचा रंगबिरंगी डोंगर करणार आहोत! कळलं?’ आजोबांना काहीच कळलं नाही, त्यांनी फक्त मान हलवली.

आजीने दोन ग्लासांत थंड पाणी व दोन ग्लासांत गरम पाणी ओतलं. तोपर्यंत मिहीरने लाल, हिरवा, पिवळा व निळा असे चार जलरंग आणलेच होते. मग आजीने एका थंड पाण्याच्या व एका गरम पाण्याच्या ग्लासात दोन-दोन चमचे मीठ ठाकलं. मिहीरने पाणी ढवळलं. मग आजीने ते ग्लास क्रमवार लावले. एक नंबरला थंड खारट पाण्याचा ग्लास. त्यानंतर थंड साधं पाणी, मग गरम खारट पाणी व सर्वात शेवटी गरम साधं पाणी. आजी म्हणाली, ‘हं, आता तुझ्या आवडीचे रंग प्रत्येक ग्लासात टाक.’ मिहीरने पहिल्या ग्लासात निळा, दुसऱ्या ग्लासात पिवळा, तिसऱ्या ग्लासात लाल व चौथ्या ग्लासात हिरवा रंग टाकला. आता मदतीला आजोबापण आले. त्यांनी तो काचेचा उंच ग्लास फडक्याने स्वच्छ पुसून घेतला. आजी म्हणाली, ‘चला करूया पाण्याचा रंगीत डोंगर.’ आजीने उंच ग्लासात निळ्या रंगाचं पाणी एक इंच उंचीपर्यंत सावकाश ओतलं. आता यावर पिवळं पाणी घायचं आहे. आजीने मोठ्या चमच्यात पिवळं पाणी घेऊन ते ग्लासाच्या कडेवरून आत सावकाश सोडायला सुरुवात केली. आत पाणी सोडत असताना, तळाचे निळे पाणी अजिबात हलणार नाही याची काळजी आजीने घेतली. पिवळ्या पाण्याचा थर एक इंच उंचीचा झाल्यावर आजी थांबली. आजी म्हणाली, ‘आता प्रत्येकाने एकेक इंच पाणी या उंच ग्लासात याच पद्धतीने घाला बरं.’

मग याच पद्धतीने आजोबांनी पण तळातली दोन पाणी न हलवता, पिवळ्या पाण्यावर सावकाश लाल पाणी सोडले. आता मिहीरची पाळी होती. मिहीरने हिरव्या पाण्याचा ग्लास जवळ घेतला. मोठ्या चमच्यात हिरवं पाणी घेतलं. उंच ग्लासाच्या कडेवरून ओघळत त्याने ते हिरवं पाणी हळूहळू आत सोडलं. या वेळी तळातली तीन पाणी अजिबात हलणार नाहीत याची त्याने काळजी घेतली.

आता आजोबा आणि मिहीर तोंडाचा ‘आ’ करून पाहू लागले. उंच ग्लासात निळं, पिवळं, लाल आणि हिरवं पाणी एकमेकांत अजिबात मिसळलं नव्हतं तर, रंगीत पाण्याचे एकमेकावर एक थर तयार झाले होते! उंच ग्लासात पाण्याचा रंगीबेरंगी डोंगरच झाला होता. एकमेकांना टाळ्या देत आजोबा व मिहीर आनंदाने ओरडले, ‘वॉव! सही आयडिया!’

‘मीठ घातल्यावर पाण्याची घनता वाढते. पाण्याचे तापमान वाढले की पाण्याची घनता कमी होते. दोन वेगवेगळ्या घनतेचे पदार्थ ग्लासात सावकाश ओतले तर जास्त घनतेचा द्रव तळाशी जातो आणि कमी घनतेच्या द्रवाचा थर वरती राहतो,’ आजीला थांबवत मिहीर म्हणाला, ‘पण आजी, समजा आपल्याकडे मीठच नसेल तर, वेगवेगळ्या तापमानाचे रंगीत पाणी घेऊनसुद्धा हा प्रयोग करता येईल ना?’

मिहीरला थांबवत आजोबा म्हणाले, ‘इतकंच काय, पण एकाच तापमानाचे पण वेगवेगळ्या प्रमाणात मीठ घातलेले रंगीत पाणी घेऊनसुद्धा असाच डोंगर करता येईल ना?’
आजी समाधानाने हसली. या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हालाही कळलं असेल, ‘करून पाहा म्हणजे समजेल!’ मिहीर आणि आजोबा आणखी दोन रंगीत डोंगर तयार करायच्या कामाला लागले. तुम्हाला काय वाटतं, त्यांचे डोंगर झाले असतील?
(rajivcopper@yahoo.co.in)