आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात प्रवास म्हणजे त्रासच. आणि गच्च भरलेल्या बसमधून प्रवास म्हणजे हाय राम! दुपारी बारा-साडेबाराची वेळ. खिडकीतून येणा-या गरम झळा आणि बसची घरघर याने गोपाळराव जाम वैतागले होते. कधी एकदा हा प्रवास संपतो आणि घरी जाऊन पडतो, असं त्यांना झालं होतं.
त्यांच्या बाजूला बसलेल्या माणसाची सारखी चुळबुळ सुरू होती. तो डोकं खाजवायचा नाहीतर कानावर आलेले केस दाबून घट्ट बसवायचा. थोड्या वेळाने शर्ट नीट करायचा आणि शर्टाचा खिसा चाचपून पाहायचा. गोपाळराव हैराण झाले! हा माणूस शांत का बसत नाही, त्यांना कळेना. थोड्याच वेळात बस एका टपरीछाप हॉटेलजवळ थांबली. सगळ्या प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. कंडक्टर ओरडला, ‘बस दहा मिनिटं थांबेल हां. बिगिनं आटपा.’ बसमधल्या सर्वांनी आळोखेपिळोखे दिले.
इतक्यात त्या माणसांमधून वाट काढत एक लहान मुलगा बसमध्ये चढला. गच्च कुरळे केस, नकटं नाक, सुंदर काळ्या कपाळावर ठसठशीत पिवळं उभं गंध, जुनी विटकी निळी पँट व मळलेला पांढºया रंगाचा फुलाफुलांचा शर्ट. आत येताच त्याने जोरदार हाळी ठोकली, ‘उसाचा ताजा थंडगाऽऽऽर रस.’ लोकांच्या मधून हातातले उसाच्या रसाचे भरलेले ग्लास सांभाळत तो बसच्या शेवटच्या टोकाकडे निघाला. त्याला पाहताच पुढे बसलेल्या निर्मलाताई गुलाबरावांना म्हणाल्या, ‘काय विठ्ठलावानी पोर हाय हो!’
तो मुलगा चुळबुळरावांच्या सीटजवळ यायला आणि चुळबुळरावांनी कानावरच्या केसावरून हात फिरवायला एकच गाठ पडली आणि तो मुलगा जोरात किंचाळला. चुळबुळरावांच्या मांडीवर उसाचा रस सांडला होता! खाली पडणारा ग्लास त्याने आणि चुळबुळरावांनी मिळून सांभाळला होता. आधीच वैतागलेले प्रवासी आणि त्यात हा प्रकार. मागच्या बाकावर बसलेले जाकीटवाले म्हणाले, ‘एॅक कॉनफोटॉत मॉरा याच्या.’ मग खिडकीजवळ तोंड नेऊन त्यांनी तोंडांत तुंबलेल्या मुखरसाची लालभडक पिचकारी बाहेर मारली. आता तोंड मोकळं झाल्याने ते म्हणाले, ‘या पोराला काही अक्कल आहे का? दोन फटके दिल्याशिवाय याला अक्कल येणार नाही हां!’
गुलाबराव म्हणाले, ‘अरे ए, शाळेत जातो का रे तू, आंऽऽ?’ पुढच्या खिडकीत बसलेले टोपीवाले मागे वळून म्हणाले, ‘आता हे पाहा, याच्याकडून ही पँट धुण्याचे पैसे घ्या कसे?’ त्यांच्या पाठीमागेच बसलेले एक टकलू गृहस्थ म्हणाले, ‘हे पाहा मिस्टर, एक सांगतो. या मुलाने जर माझ्या पँटीवर उसाचा रस सांडला असता ना तर मी... मी... हाऽऽऽ हाऽऽ!’ ते एकटेच हसले आणि गप्प बसले.
गोपाळराव प्रचंड बेचैन झाले होते. पण ते काही बोलले नाहीत. ते मनातल्या मनात म्हणाले, ‘चूक कोणाची होत नाही? कुणाचीही चूक होऊ शकते! म्हणून त्या मुलाला मारणं तर अगदीच चुकीचं आहे! पाहू या काय होतं? आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या अंगावर रस सांडला आहे ते चुळबुळराव तर काहीच बोलत नाहीएत! कमालच आहे!’
आता जाकीटराव मागून पुढे आले. रणांगणावर एखादा शूर सेनापती येतो ना, त्याप्रमाणे. पण त्याच वेळी निर्मलाताई पण तिथेच आल्या. सदाशिवच्या पाठीमागे उभं राहत आणि दोन्ही हात कमरेवर ठेवत त्या म्हणाल्या, ‘काय हो मिस्टर, तुमचं नाव काय? आणि या मुलाचं तुम्ही काय करायचं ठरवलंय? काय ते नीट सांगा.’ चुळबुळरावांनी आवंढा गिळला आणि म्हणाले, ‘माझं नाव वामन तायडे. या मुलाचं काय करायचं हे मी काही ठरवलेलं नाही! पण माझं काय करायचं हे या मुलानेच ठरवायचं आहे!’
वामनरावांनी असं म्हणताच, गाडीतले सर्व जण एकदमच ओरडले, ‘म्हणजेऽऽऽ?’ वामनराव प्रसन्नपणे हसले आणि त्यांनी शर्टाच्या खिशातून कुठलंसं चपट्या डबीसारखं एक रंगीत मशीन बाहेर काढून दाखवलं. असली अनपेक्षित वस्तू पाहताच निर्मलाताई दचकून दोन पावलं मागे सरकल्या. बाकीचे सगळे जोरात ओरडले, ‘हेऽऽऽ काऽऽय?’
उजव्या कानावरच्या केसावरून हात फिरवत वामनराव म्हणाले, ‘होय सांगतो!’ त्यांनी उजव्या कानावरचे केस बाजूला केले आणि... गाडीतील सगळी माणसे आश्चर्यचकित झाली! वामनरावांनी कानाला श्रवणयंत्र लावलं होतं. श्रवणयंत्र कानाच्या मागे होतं आणि त्याची एक बारीक नळी कानात गेली होती.
वामनराव शांतपणे म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे, चूक त्या मुलाची नसून माझीच होती. बसचा धक्का बसून हे माझे कानातले मशीन सैल झाले. कानातले मशीन घट्ट करण्यासाठी मी हात वर नेला तेव्हाच नेमका सदाशिव ग्लास घेऊन जवळ आला आणि माझ्याच चुकीने माझ्याच पँटवर हा रस सांडला!’ हे ऐकल्यावर गाडीतली सगळी माणसे चुकचुकली. पण सदाशिव मात्र अवाक् होऊन वामनरावांकडे पाहत होता. सदाशिवच्या खांद्यावर हात ठेवून वामनराव पुढे बोलू लागले, ‘पण ज्या पद्धतीने तुम्ही या मुलाबाबत बोललात ते मला अजिबात आवडलं नाही. या जाकीटवाल्यांनी सदाशिवची अक्कल काढली, पण स्वत: मात्र खिडकीतून रस्त्यावर पचापचा थुंकताहेत! आता यांची अक्कल कोण काढणार? आणि हे या बिचाºया गरीब मुलाला गाढव म्हणत होते. मला सांगा, दुस-याला गाढव म्हटलं म्हणजे आपण शहाणे होतो का हो? लहान मुलांना असं बोलू नये, हे का मी त्यांना सांगायला पाहिजे?’ निर्मलाताई हसत-हसत म्हणाल्या, ‘मी ह्यांना आधीच म्हटलं होतं की हे पोर देवावानी हाय! हो किनई हो?’ सदाशिवला सोबत घेऊन वामनराव खाली उतरले. त्यांनी त्याची समजूत काढली. मग त्याने आणि गोपाळरावांनी त्यांना पँट धुवायला मदत केली. तिघे जण मिळून चहा प्यायले. बस हलली. वामनराव बाजूला सरकत हळूच म्हणाले, ‘अं... माझं काही चुकलं तर नाही ना गोपाळराव?’ ‘काहीतरीच काय वामनराव? अहो, त्याची काही चूक नाही...’ त्यांना मध्येच थांबवत दबक्या आवाजात वामनराव म्हणाले, ‘अहो, चूक खरं तर त्याचीच होती! सदाशिवची! पण समजा काही झालं असतं तर या मोठ्या माणसांनी त्या लहानग्याला दिलाच असता ना माझ्यासारखा दागिना! काऽऽय?’ भर दुपारी भूत बघितल्यागत गोपाळराव त्यांच्याकडे आऽऽ वासून पाहू लागले! त्यांची ती बिकट अवस्था पाहून कान कुरवाळत वामनराव म्हणाले, ‘अहो, अगदी असाच प्रसंग माझ्या लहानपणी घडला होता. माझे वडील फारच तापट आणि रागीट. त्यांनी माझ्या या कानाखाली झणकन आवाज काढला! आणि नंतर कुठलाच आवाज या कानाने ऐकूच येईना हो! वडलांनी समजावलं असतं, जरा धीरानं घेतलं असतं तर हा ‘दागिना’ आजन्म कानात घालण्याची पाळी माझ्यावर आली नसती हो! खरं सांगतो, मी लहानपणीच ठरवलं, मोठेपणी मुलांवर कध्धी म्हणजे कध्धी रागवायचं नाही! त्यांना मारायचं तर अजिबात नाही! अहो, शिक्षा करून नव्हे तर त्यांना सुधारण्याची संधी दिली ना की ती आपोआप सुधारतात. ही मुलं आपल्यासारखीच असतात हो प्रेमाची भुकेली! सदाशिवला हा कानातला दागिना मिळू नये, म्हणून म्हणून थोडंसं खोटं बोललो आज.’ वामनरावांचं हे बोलणं ऐकून गोपाळराव चकित झाले! त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून त्यांना खूप भरून आलं. त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं तर... वामनरावानी त्यांचा कानातला दागिना काढून खिशात ठेवला.
 rajivcopper@yahoo.co.in