आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिराफाची मान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मिहीर शाळेतून घरी आला आणि आजीने नेहमीचा मंत्र म्हणायच्या आत त्याने आपणहून हातपाय धुतले. कपडे बदलत तो म्हणाला, ‘चला जेवायला बसूया.’
'मिहीरकडे पाहत आजोबा म्हणाले, ‘अरे वा! आज आजीने तुझ्यासाठी बटाटा पापड तळले आहेत, हे तुला कळलंय वाटतं? तरीच इतकी जेवायची घाई...’
‘नाही हो आजोबा. आज मला जेवल्यावर तुमची हाडं मोजायची आहेत. म्हणून मी जेवायची घाई करतोय...’
आजोबा घाबरून ओरडले, ‘अरे, तुझं डोकंबिकं फिरलं की काय? हाडं कशाला मोडायची? आणि या वयात जर तू माझी हाडं मोडलीस तर मी राहीन का जिवंत? अगं ए आजे, या तुझ्या नातवापासून मला वाचव.’
‘अहो, नीट ऐका तरी. मिहीर म्हणतोय, तुमची हाडं मोजायची आहेत त्याला. उगाच पराचा कावळा करताय.’
आजोबा हसतच मिहीरकडे पाहत म्हणाले, ‘हं, मग ठीकाय.’
पटापट जेवून तिघं जण समोरासमोर बसले. आजोबा ढेकर देत म्हणाले, ‘अरे, जर तू माझी लहानपणी हाडं मोजली असतीस तर ती तुला आत्तापेक्षा जास्त दिसली असती.’ हे ऐकताच आजी खो-खो हसू लागली. कसंबसं हसू आवरत ती म्हणाली, ‘कमालच आहे तुमची. अहो, तुमच्या लहानपणी मिहीरच काय पण मीसुद्धा नव्हते, तुमची हाडं मोजायला.’ ‘अहो, पण आजोबा लहानपणी म्हणजे किती लहानपणी?’
आजी तोंडाला पदर लावत म्हणाली, ‘म्हणजे आपलं वय एक महिन्याचं असतं तेव्हाची गोष्ट सांगताहेत आजोबा.’ हे ऐकून मिहीर पण हसू लागला.
आजोबा करवादून म्हणाले, ‘हे पाहा, हसू नका. आत्ता आपली हाडं असतात 206, पण लहान मुलाची हाडं जर मोजली तर ती असतात 300 ते 350.’
‘म्हणजे जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी आपली हाडं कमी होतात? मग ही एवढी शंभरेक हाडं जातात तरी कुठे?’ मिहीरने भीतभीत विचारलं.
‘अरे, जाणार कुठे? ती आतच असतात.’
हे ऐकताच मिहीर घाबरून कुजबुजला, ‘म्हणजे हे एवढे हाडांचे तुकडे आपल्या शरीरात फिरत असतात? की त्या हाडांचा चुरा होऊन तो रक्तात मिसळला जातो?’
आता मात्र आजोबा हसू लागले आणि मिहीर भांबावला. आजोबांना थांबवत आजी म्हणाली, ‘अहो, त्याला नीट काय ते सांगा. हसताय काय?’
‘मुलं जसजशी वाढू लागतात तसतशी यातली काही हाडं एकमेकांत मिसळून जातात. ती अशी काही जोडली जातात की त्यांचं एकच एकसंध हाड बनतं. आपल्या कवटीच्या हाडांमधे ही प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात व चटकन होते. आपल्या कमरेच्या हाडात ही अशी सांधेजोड होत असते.’
मिहीरचा प्रश्नार्थक चेहरा पाहून आजी म्हणाली, ‘मेंदूला सुरक्षित ठेवणार्‍या कवटीचा जो भाग असतो त्यात जन्मत: 22 हाडं असतात; पण मूल 4 वर्षांचं होईपर्यंत यातली बरीचशी हाडं सांधली जाऊन डोक्याच्या कवटीत फक्त 8 हाडं राहतात. कळलं?’
‘पण आजी, सगळ्यांना काही सेम-सेम हाडं नसणार? कारण आमच्या वर्गातल्या अर्णवला तर एका हाताला 6 बोटं आहेत.’
‘खरंय तुझं. काही जणांच्या शरीरात अतिरिक्त फासळ्या असतात. काही जणांच्या हाताला, पायाला किंवा दोन्हींना सहा-सहा बोटं असतात. त्यांच्या हाडांची संख्या साहजिकच जास्ती भरते.’
‘आजोबा, आपल्या शरीरात सर्वात जास्त हाडं कुठे असतात हो?’ मिहीरकडे रोखून पाहत त्यांनी विचारलं, ‘सांग बरं कुठे असतील?’
मिहीरने हळूच आजीकडे पाहिलं. आजीने आजोबांच्या नकळत उजव्या हाताची आणि उजव्या पायाची बोटं हलवली.
मिहीर आनंदाने ओरडत म्हणाला, ‘आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये सर्वात जास्त हाडे असतात. आता कशी असतात ते तुम्ही सांगा आजोबा.’
‘अरे मिहिरू, एका बोटामधे 3 हाडं असतात. आणि ही बोटं तळहाताला ज्या सांध्यानं जोडली जातात त्यात आणखी हाडं असतात.’
‘म्हणजे आजोबा, एका हातात किंवा एका पायात 30-30 हाडं असतात. म्हणजे या चार अवयवांची मिळून 120 हाडं झाली की. आणि पुन्हा आपल्या छातीच्या 24 फासळ्या आणि त्यांना जोडणारं ते मधलं हाडं मिळून 25 होणार. बापरे, हीच संख्या 145 झाली.’
‘मणके विसरलास. माकडहाडापासून मानेपर्यंत 26 मणके असतात. म्हणजे झाली 171 हाडं.’
‘आजोबा आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं हाड कोणतं?’
‘अरे अगदी सोपं. नीट पाहा बरं माझ्याकडे. आलं का लक्षात? आपल्या शरीरातलं सर्वात जास्त लांब हाड असतं मांडीचं. हे हाड आपल्या एकूण उंचीच्या पावपट असतं. आता मिहीर मला सांग, आपल्या शरीरातलं सगळ्यात लहान हाड कुठलं?’
आजीने हळूच उजवा कान खाजवला आणि मिहीर काय ते समजला.
‘मला वाटतं सर्वात लहान हाड आपल्या कानातलं.’
‘अगदी बरोबर. हे कानातलं हाड केवळ 2.5 मिलिमीटर लांबीचं असतं; पण हे हाड नसेल तर आपल्याला ऐकूच येणार नाही. हे हाड लहान, पण काम महान.’
‘जिराफाची मान आपल्या मानेच्या दहापट लांब असते. मला सांगा कुणाच्या मानेमध्ये जास्ती हाडं असतील, आपल्या की जिराफाच्या?’
पलंगावर आडवं पडत आजोबा म्हणाले, ‘आता माझाच जिराफ व्हायची वेळ आली आहे. मान लांब असली तरी दोन्हींमध्ये हाडांची एकूण संख्या.’
मिहीर जोरात ओरडला, ‘सारखीच असते!’
अर्धवट डोळे बंद करून आजोबा पुटपुटले, ‘शाबास जिराफा!’
(rajcopper@gmail.com)