आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्नचा सामना विचारानेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिय बंडू अन् पिंकी,
काल आपल्या पक्षी निरीक्षणादरम्यान तुम्ही विचारत होतात की पॉर्न साइट्सवर बंदी घालावी का? मी निरीक्षणाच्या गडबडीत होतो त्यामुळे सविस्तर असे बोलणेच झाले नाही. आता सांगतो. मुळात बंदी घालून काही प्रश्न सुटणार नाही. उलट चोरट्या मार्गांना हिरवा कंदील दिल्यासारखे होईल. मुद्दलात चर्चा हवी की कामजीवनावर आधारित लिखित माध्यम, चित्र माध्यम, शिल्प माध्यम, चित्रपट, व्हिडिओ या माध्यमातून चित्रण हवे किंवा नाही? आणि नेमकी चित्रणाची दृष्टी कोणती असावी हे प्रश्न उपस्थित होतात. या उत्तरातून पॉर्न साइट्सबद्दलचे मत, विचार, त्यातील घातकता सांगता येईल. आज या चर्चेनिमित्त बहुसंख्य मांडळी संस्कृती प्रदूषित होते, मुलंमुली बिघडतात म्हणून बंदी आणा, अशी मागणी करीत आहेत. परत संस्कृती म्हणजे काय अन् कोणत्या संस्कृतीला धक्का लागतो, मुलंमुली बिघडतात म्हणजे नेमके कसे बिघडतात, हेसुद्धा प्रश्न उपस्थित होतात. वात्स्यायनाने त्या काळाच्या माहितीच्या मर्यादेत कामजीवनावर प्रकाश टाकला आहे, तर खजुराहोमधील शिल्पांनी त्यातील रंगत शिल्पबद्ध केली आहे. त्यातील अनेक शिल्पं वास्तवात अशक्यच आहेत हा मुद्दा वेगळा. कारण या दोन्ही माध्यमातून अनेक चुकीच्या संकल्पना रुजून बऱ्याच निरामय कामजीवनात अडचणी उत्पन्न झाल्यात व गैरसमज पसरले आहेत.

आपण वरील प्रश्नांच्या अंगाने पॉर्न साइट्सवर बोलूयात. आतील एखादा व्हिडिओ उघडून बघा. त्यात दोन, तीन वा चार पात्रं असतात. एक पात्र स्त्री, दुसरे पुरुष. स्त्रीपात्र वखवखलेले, अधाशी, व्हिडिओ संपला तरी वखवख शांत न झालेले. पुरुष पात्र आक्रमक, त्या स्त्रीची वासना सहज शांत करण्याचा आविर्भाव असलेला. तो ज्या पद्धतीने स्त्रीपात्राशी चाळे करतो ती स्त्रीची गरज असते हे ठसवणारे वर्तन त्या पुरुषाचे दाखवलेले असते. असा व्हिडिओ पाहण्यात आल्यावर (किंवा लिखित साहित्य वाचल्यावर) स्त्री व पुरुषाच्या मनात एक वैचारिक वादळ उत्पन्न होते. या वादळात सापडलेले आपण समवयस्क किंवा ज्याला आपण अनुभवी असा दर्जा दिलेला असतो अशांच्या संवादातून, लिखित साहित्यातून जे मार्गदर्शन मिळते ते ९९ % या व्हिडिओमधील ‘थीम’ला मान्यता देत असते.

बंडू अन् पिंकी, तुम्ही खुल्या दिलाने प्रश्न विचारलात याबद्दल तुमचे अभिनंदन. यातून आपले नाते किती खुले, मोकळे असे मैत्रीचे आहे याचा आनंद झाला. या व्हिडिओमधून जी ‘थीम’ स्त्री-पुरुषात रुजते ती अत्यंत घातक आहे व पती-पत्नी नात्यातील निरामयता उद्ध्वस्त करणारी आहे. १९८० पासून मी लैंगिक शिक्षण आणि १९८६ पासून एड्सवर कार्यशाळा घेत आहे. या कार्यशाळेत वय वर्षे १४ ते ४५, ५० अशा व्यक्ती येत असतात. त्यांनी आपले विचार, आपल्या शंका विचारल्यावर लक्षात येते की, त्यांचे उगमस्थान अशास्त्रीय साहित्य व व्हिडिअो, सिनेमे असतात.

बंडू, पिंकी, अरे अनेक पानं लिहिता येतील असल्या शंका मला स्त्री-पुरुषांनी विचारल्या आहेत. निरामय लैंगिक शिक्षण गरजेचे आहे. या साइट्सवर बंदी न आणता निरामय स्त्रीपुरुष समतेवर, सहमतीवर आधारित शास्त्रीय लैंगिक जीवनदृष्टीवर चर्चा करून यातील फोलपणा, घातकता सांगितली पाहिजे, या साइट्सपूर्वी आम्ही तरुण होतो तेव्हा पिवळे साहित्य आमचे विचारविश्व प्रदूषित करीत असे. त्यामुळे पॉर्न साइट्सचा वैचारिक सामना हाच तो एक मार्ग आहे.
(gadgilrajendra@yahoo.com)