राजकारण हा मराठी माणसाच्या वितंडवादाचा हक्काचा विषय. तो टाळून सहसा कुणी पुढे जात नाही किंवा तो चर्चेला आला तर त्याचा किस पाडल्याशिवाय कुणी राहात नाही. परंतु, नाक्यावरच्या चर्चा आणि आक्रस्ताळी आदळआपट टाळून राजकीय घटना-प्रसंगांबाबतचे आकलन विस्तारणारे हे सदर…
पठाणकोट हल्ल्याबाबत बराच खल सुरू आहे. पण त्यातल्या एका वक्तव्याकडे लोकांचे दुर्लक्ष झालेसे वाटले.
केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षि यांचे ते वक्तव्य होते. या कारवाईत भारताचे सात जण का बळी पडले, ते का झाले, असा प्रश्न होता. याचा नीट तपास व्हायला हवा, असे सावध उत्तर यावर मेहर्षि यांनी द्यायला हवे होते. पण मेहर्षि म्हणाले, ‘अतिरेकी भरपूर दारूगोळा आणि शस्त्रे घेऊन आलेले होते. त्यामुळे अशा चकमकींमध्ये चार-दोन माणसे मारली जाणारच.’
हे धक्कादायक होते. कारवाईत आपले सैनिक व अधिकारी मरणे ही मेहर्षि यांना मोठी हानी वाटत नव्हती. बाजारात गेल्यानंतर पाच-पन्नास रुपये इकडेतिकडे खर्च होणारच, असं सामान्य लोक बोलतात. मेहर्षि तसेच बोलत होते. माणसांचे जीव जाणं याला फार किंमत देण्याची गरज आहे, असे त्यांना वाटत नव्हते.
चकमकीत सात जण मारले गेले. यात पाच जवान होते. एक ‘अतिप्रशिक्षित’ ब्लॅक कॅट कमांडो पथकाचा लेफ्टनंट कर्नल होता. आलेले अतिरेकी केवळ सहा जण होते. ते घुसले होते, तो इलाखा नागरी नव्हता. पठाणकोट ही देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी वा कँटोन्मेंट आहे. पाकिस्तानी सरहद्दीपासून ती अगदी जवळ आहे. तिथल्या यंत्रणा सदैव युद्धसज्ज असणार, हे गृहीत आहे.
अतिरेक्यांच्या येण्याची पूर्वसूचना मिळाली होती. कमांडोंचे पथक दिल्लीहून दाखल झाले होते. म्हणजे, सहा अतिरेकी विरुद्ध भारताची लष्करी ताकद, अशी ही लढाई होती. तरीही आपले इतके लोक कसे मारले गेले? याचा अर्थ, डावपेचात किंवा निर्णय घेण्यात गफलत झाली होती. सैनिक ही नोकरीच अशी आहे की, मरण कबूल करूनच तिच्यात शिरावे लागते. त्यासाठीच जगभरची सरकारे सैन्ये पोसतात. पण विकत घेतला म्हणून सैनिकाचा जीव वाटेल तसा फुंकून टाकला जात नाही. प्रगत देशांमध्ये एकेका सैनिकाबाबत तेथील यंत्रणा दक्ष राहतात.
पॅरिस किंवा लंडनमधील अतिरेकीविरोधी कारवाईत एकही पोलिस मारला जाणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. ऑस्ट्रेलियातील अलीकडचे ओलिसनाट्य आठवा. त्यात एका कॅफेत माणसे अडकली होती. अनेकांचा बळी जाऊ शकला असता. पण तेथील कमांडोजनी अत्यंत कौशल्याने हानी टाळली.
सर्व प्रकारची दक्षता घेणे, हे या देशातील यंत्रणांमध्ये वरपासून खालपर्यंत भिनलेले असते. भारतात असे घडते का, अशी शंका घ्यायला जागा आहे. अशी काळजी करण्याचा भाग आपल्या यंत्रणेच्या जाणिवेत बहुधा कमी असतो. सरकारला अशी फिकीर नाही, असाच मेहर्षि यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो.
मेहर्षि हे १९७८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते अर्थखात्यात सचिव होते. साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते तेथून निवृत्त होणारच होते. अचानक त्यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती झाली. थोडक्यात, ते मुलकी सेवेत सदैव वरच्या पातळीवर वावरलेले बाबू आहेत.
दुसरा एखादा अधिकारी असे बोलला नसता. जवानांचा मृत्यू टाळता आला नाही, याबद्दल किमान तोंडदेखले दुःख त्याने दाखवले असते. शक्यता अशी आहे की, साठाव्या वर्षी मिळालेल्या एक्स्टेंशनमुळे असा तोंडदेखलेपणा करायची गरज आहे, असे मेहर्षिंना वाटत नसावे. ते निर्ढावलेपणे बोलले. सरकार नावाच्या यंत्रणेची विचार करण्याची पद्धत त्यातून उघड झाली.
सरकारी यंत्रणा ही बहुतेकदा बनचुकीच असते. जबाबदारी अंगाबाहेर टाकण्याची उपजत खोड तिच्यात असते. कुपोषणाविषयी बोंबाबोंब झाली, तर गेल्या वर्षीच्या एक हजारऐवजी यंदा साडेनऊशेच मुले मेली आहेत, असे ती सांगते. मुलीच्या लग्नात शेतकरी फार खर्च करतात आणि म्हणून आत्महत्या होतात, असा अहवाल ती तयार करते.
पण हा दोष एखाद्या अधिकाऱ्याचा वा सरकारी यंत्रणेचा नाही. मुळात, भारतात माणसाच्या जिवाला काहीही किंमत नाही. समाजातच ती नाही. त्यामुळे ती सरकारातही नाही. त्यामुळे मेहर्षिंच्या बेपर्वा वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया येत नाही.
भारतात रोज हजारोंनी माणसे मरतात. एकेकट्याचे नैसर्गिक मृत्यू वेगळे. ते होणारच. पण घाऊक मृत्यू आपल्याकडे फार आणि सर्रास होत असतात. चेन्नईत पूर येतो. कोलकात्यात इस्पितळाला आग लागते. आंध्र प्रदेशात पर्वणीच्या वेळी चेंगराचेंगरी होते. सहज दोन-पाचशे किंवा पाच-सात हजार माणसे मरतात.
भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटींच्या वर आहे. त्यापुढे काहीशे किंवा काही हजार ही संख्या काहीच नव्हे. मेलेल्यांचे आप्तस्वकीय आणि परिसरातले लोक हादरतात. पण एकूण देशात जेमतेमच चलबिचल होते. लोक काही तासात, हे प्रकार विसरून जातात. जिवाच्या कराराने एकेक जीव जपावा, या संकल्पनेबाबत भारतीय समाज बधीर आहे. हकनाक वा स्वस्तात कोणाचाही बळी जाणं ही गोष्ट प्रगत समाजात गंभीर मानली जाते. आपल्या समाजाला ते तसे वाटत नाही. परिणामी चूक करणाऱ्याला जाब विचारला जात नाही.
भोपाळमध्ये वायूगळती होऊन तीन हजार लोक मेले. कित्येक जण जन्माचे अपंग झाले. पण गळतीला जबाबदार नेमके कोण, हे काही सरकारी यंत्रणेला सिद्ध करता आले नाही. संभाव्य गुन्हेगार सुखनैव सुटून गेले. घाऊक मृत्यू पुन्हा पुन्हा होत राहतात. ते टळावेत, यासाठी आपण काहीही हालचाली करीत नाही. उत्तराखंडमध्ये अजूनही बिनधास्त बांधकामे चालू आहेत. पुन्हा ढगफुटी झाली, तर मागच्याइतकेच लोक मरतील.
२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात मुंबईचे पोलिस प्राणपणाने लढले. त्यांना बुलेटप्रूफ जाकिट्स आणि चांगल्या बंदुका मिळायला हव्यात, असे सर्वानुमते ठरले. त्याची नीट अंमलबजावणी झालेली नाही. खरेदीत भ्रष्टाचार झाला. शस्त्रे गंजत पडली. परिणामी, पुन्हा हल्ला झाला तर मुंबईत वेगळे काही घडेल, अशी शक्यता नाही.
भारतीय समाज हा प्रचंड भोंगळ आणि ढिसाळ आहे. बिनचूकपणा, काटेकोरपणा, चोखपणा इत्यादी गुणांशी त्याचे वावडे आहे. ‘उन्नीस-बीस’ हा आपला परवलीचा शब्द आहे. एखादे काम करताना गोष्टी मागेपुढे होणारच, असे आपण गृहीत नव्हे तर अपेक्षित धरतो. या मागेपुढे होण्यामध्ये आपण बहुधा माणसाच्या जिवालाही गृहीत धरतो. मेहर्षि तेच म्हणाले, चार-दोन लोक मरणारच.
पठाणकोटवर चालून आलेले अतिरेकी बोलूनचालून आत्मघातकी होते. आपण हमखास मरणार, हे त्यांना ठाऊक होते. पण दुसऱ्या बाजूला असलेले आपण हेही बहुधा तितकेच आत्मघातकी आहोत. माणसे असोत की सैनिक की कमांडोंचा नेते, दोन-चार बळी जाणारच, अशीच आपली भूमिका असावी.
आपला समाज असा फिदायीन राहणं हे पलीकडून येणाऱ्या फिदायीनांसाठी सोयीचंच आहे.
(satherajendra@gmail.com)