आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टु द पॉइंट : भ्रमाचा भोपळा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साठपैकी २४ महिने तर संपले. या काळात खरे तर ‘विकास का दुसरा नाम मोदी’ अशी काहीतरी घोषणा पुढे यायला पाहिजे होती. पण अशी घोषणा देण्याचे धाडस आज भाजप दाखवू शकले नाही. यामुळे ते बिचारे आपल्या जुन्याच घोषणेकडे वळलेले दिसतात...
नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले त्याला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. २०१४मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा भाजपला २८२ जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांची लोकप्रियता चारशे जाग मिळालेल्या पक्षाएवढी होती. ‘मोदी, बस नाम ही काफी है’ अशी जणू तेव्हाही भाजपची अवस्था होती. मोदी अजूनही गर्दी खेचत आहेत. इतर विरोधी नेत्यांच्या तुलनेत ते अजूनही अधिक लोकप्रिय आहेत. पण त्यांच्या जादूच्या कांडीविषयी मात्र लोकांच्या मनात बऱ्याच शंका निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसला साठ वर्षांमध्ये जे जमले नाही. ते आपण ६० महिन्यात करून दाखवू, असे ते म्हणत होते. त्या साठपैकी २४ महिने तर संपले. या काळात खरे तर ‘विकास का दुसरा नाम मोदी’ अशी काहीतरी घोषणा पुढे यायला पाहिजे होती. पण अशी घोषणा देण्याचे धाडस आज भाजप दाखवू शकले नाही. यामुळे ते बिचारे आपल्या जुन्याच घोषणेकडे वळलेले दिसतात - भारतमाता की जय!
१९८४-८५ मध्ये राजीव गांधी प्रचंड बहुमतानं पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनीही जगाचे दौरे केले. पंजाब, आसाममध्ये शांतता करार केले. "मि. क्लीन' अशी ओळख मिरवत स्वच्छ कारभाराच्या गोष्टी केल्या. पण त्यांच्या एकविसाव्या शतकात जाण्याच्या घोषणेचेच खरे दृश्य परिणाम दिसले. देशात वेगाने कॉम्प्युटर घुसला.१९९१ मध्ये नरसिंह राव अल्पमताच्या उंबरठ्यावर होते. आपण पंतप्रधान होऊ असे खुद्द त्यांनाही कधी वाटले नव्हते. पण त्यांनी आर्थिक उदारीकरण आणले परकीय गुंतवणूक धो धो वाहायला लागली.
राजीव किंवा राव यांची धोरणे कितपत योग्य होती, हा प्रश्न वेगळा. पण त्यांचे वेगाने परिणाम दिसू लागले. मोदींनी दहा दिशांना दहा वार केले. अनेक घोषणा केल्या. पण त्यांचे दृश्य परिणाम दिसलेले नाहीत त्यांना युरोप किंवा सिंगापूरप्रमाणे भारत स्वच्छ करायचा होता. पण आपला देश आहे तसाच घाणेरडा आहे. भाजप हा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अत्यंत कडव्या निष्ठावंतांची फौज आहे. पण खुद्द मोदीदेखील या दोन संघटनांना कामाला लावू शकलेले नाहीत.
आर्थिक आघाडीवरही हेच घडले आहे. मोदींच्या डोळ्यांपुढे एकेकाळी प्रचंड वेगाने प्रगती केलेल्या जपानचे उदाहरण असावे. पण प्रगतीचा तसा झंझावात ते निर्माण करू शकलेले नाहीत.

रेल्वेमार्ग, रस्ते किंवा पूल इत्यादींच्या उभारणीत चीन राक्षसी वेगाने काम करतो. मोदींना तसे करायचे असावे. पण या क्षेत्रांमधली आपली गती पूर्वीइतकीच राहिली आहे. अलिकडेच ‘मेक इन इंडिया’ची प्रचंड जाहिरात करण्यात आली. पण त्यातून काय साध्य होणार याविषयी अनेक जाणकारांनी शंका व्यक्त केली आहे.

खरे तर मोदींनी केलेल्या घोषणांनुसार एकेक कार्यक्रम राबवला गेला असता, तर भाजपचे कार्यकर्ते, नेते आणि मंत्री यांना इतर कशाहीकडे लक्ष देण्याइतका वेळही उरला नसता आणि तशी गरजही पडली नसती. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. देशाच्या प्रगतीची गती आहे, तशीच मंद आहे. परकीय गुंतवणूक येते आहे. पण ती पूर्वीइतकीच किंवा कमीच आहे. शेतमालाला पूर्वीइतकाच भाव मिळतो आहे. आत्महत्या तशाच चालू आहेत. भाजप(आणि संघाच्या) कार्यकर्त्याना मोदींमुळे बदलांचा अमुकतमुक झंझावात निर्माण झाला, असे सांगायला नक्कीच आवडले असते. पण त्यांना तशी निमित्तेच मिळालेली नाही. एक सत्ताधारी म्हणून आम्ही हे हे केले,असे सांगण्याच्या मनोभूमिकेत ते शिरू शकलेले नाहीत. त्यामुळे या कार्यकर्त्यांपुढे एक मोठी पोकळी आहे. परिणामी, इतक्या वर्षांपासून सवयीची असलेली त्यांची विरोधकांची भूमिका पुढे चालू आहे.

एरवी, अशी विरोधकाची भूमिका जनतेच्या फायद्याचीच ठरली असती. मोदी सरकारवर आपल्याच कार्यकर्त्यांचा अंकुश राहिला असता. पण विरोधकाच्या मनोभूमिकेत असले तरी भाजप कार्यकर्तेच सरकारच्या धोरणांच्या वा नोकरशाहीच्या विरोधात नाहीत. त्यांनी विरोधासाठी देशद्रोही नावाची एक जमात शोधून काढली आहे. विद्यापीठांमध्ये हक्कांसाठी भांडणारे विद्यार्थी, बाहेर आंदोलने करणारे कार्यकर्ते, मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते पत्रकार इत्यादी लोक या जमातीत सामील आहेत.

पण हे देशद्रोही प्रकरण थोडेसे अडचणीचे होते. रोहित वेमुला प्रकरणामुळे सगळे दलित भाजपच्या विरोधात जातात की काय अशी भीती निर्माण झाली. शेवटी मग ती थोर भारतमाता यांच्या मदतीला धावून आली. किंवा खरे तर ओवेसीच यांच्या मदतीला आले.
"भारतमाता की जय' हे म्हटलेच पाहिजे, असा आग्रह धरणारे मोहन भागवत कोण,असा ओवेसी यांचा खरा सवाल होता. किंवा तो तसा असायला हवा होता. पण ओवेसींना घाणेरडे राजकारण करायचे आहे त्यामुळे गळ्यावर सुरी ठेवली तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे सांगून त्यांनी हेतूपुरस्सर आग पेटवली. भाजपच्या लोकांना पोकळी भरायचीच होती . त्यांची घोषणा बाजी सुरू झाली.

मोदी सोडून भाजपच्या केंद्र आणि राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी या पेटवापेटवीत काडी टाकली आहे. स्मृती इराणी वगैरे सोडाच, पण राजनाथसिंग सुद्धा भारतमाता की जयवर बोलतायत. बजेटची चर्चा सोडून अरूण जेटली म्हणाले की, देशभक्तीवरच्या वादातली पहिली लढाई भाजपने जिंकली आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,त्यांना मुख्यमंत्रीपद गेले तरी चालेल, पण मी मरेपर्यंत भारतमाता की जय म्हणणारच.

या पेटवापेटवीवरून बाहेरून कोणाचा असा समज व्हावा की भारतमाता की जय, हा या देशातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना अशी घोषणा देणारे आणि न देणारे यांच्यात जणू युद्ध चालू आहे. फडणवीस यांच्या बोलण्यावरून तर असे वाटते की,भारतमाता की जय या घोषणेवर बंदी या देशात बंदी आहे आणि देवेंद्र हे एखाद्या झंुजार स्वातंत्र्यसैनिकासारखे या बंदीच्या विरोधात लढायला उभे राहिले आहेत.

रोहित वेमुला किंवा जेएनयूमधला कन्हैयाकुमार आणि त्यांचे साथीदार जे बहुसंख्य हिंदू किंवा दलित होते. त्यांना देशद्रोही ठरवून मारामारी करण्यात भाजपला फारशी राजकीय गंमत येणार नव्हती. रोहित किंवा कन्हैय्याकुमार हे देशप्रेम -देशद्रोह यावर तात्विक मुद्दे घेऊन बोलत होते. त्यात हिंदू (देशप्रेमी) विरुद्ध मुसलमान (देशद्रोही) अशा धार्मिक भांडणाची संधी नव्हती. त्यामुळे गोष्टी त्या भांडणाकडे कशा ढकलता येतील, याचे प्रयत्न चालू होतेच. त्याचवेळी ओवेसी कामी आले. मुसलमान धर्माचा देशप्रेमाला विरोध असतो,असा संदेश त्यांच्या बोलण्यातून अचूक गेला. त्यातून पुढे आता सगळे मुसलमान देशद्रोही इथपर्यंत हेतूत: हा संदेश भिडवण्यात आला आहे.

असे म्हणतात की आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ‘भारतमाता की जय’ वरच आपला प्रचार बेतण्याची तयारी भाजपवाल्यांनी चालवली आहे. गुजरातेत पटेल बिथरलेले आहेत. त्यांना आवरण्याची कोणतीही तरकीब सर्वशक्तिमानअमित शहा यांच्यापाशीदेखील नाही, असे दिसते. कारण राज्यात नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देशद्रोह याच गोष्टीची चर्चा झाली. बडोद्यात आनंदीबेन पटेल यांनी एक शेतकरी मेळावा घेतला. पण ितथे आधी एक फिल्म दाखवली गेली. ती शेती किंवा मोदी सरकारचा कारभार यावर नव्हती. तर जेएनयूसारख्या विद्यापीठांमुळे देशद्रोह कसा वाढत चालला आहे, यावर ती होती. हाच प्रकार उत्तर प्रदेशातही चालू आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे. मोदी या नावावर किंवा त्यांच्या कारभाराच्या आधारावर लोक आपल्याला मते देतील याचा भाजपवाल्यांना खात्री वाटेनाशी झाली आहे. देशात विकासाचे नवे पर्व आणण्याची भाषा करणाऱ्या पक्षाची अवघ्या दोन वर्षात अशी अवस्था व्हावी हा प्रकार केविलवाणा आहे.

दुसरीकडे "भारतमाता'ची घोषणा आपल्याला तारून नेईल हाही भ्रमच ठरण्याची शक्यता आहे. कारण, जिकडेतिकडे देशद्रोही फार माजले आहेत असा भाजपला वाटत असले तरी आम जनतेला तसे वाटत नाही.सामान्य लोक दुष्काळ, पाणी, कापसाचा भाव, खराब रस्ते, गायब वीज अशाच प्रश्नांविषयी बोलत आहेत. मुस्लिमांविषयी तिरस्काराने बोलायचे आणि म्हणून आपण सर्व हिंदू एक असे म्हणायचे, ही संघाची जुनी पद्धत आहे. पूर्वी तिला थोडे यश मिळाले असेल. पण तेव्हा संघ विरोधात होता. आता भाजप स्वत:च सत्तेत आहे. शिवाय आयसिस आणि पाकिस्तानातील तालिबान्यांच्या रोजच्या लढाया बघून मग जगातले सगळे मुसलमान आतून एकच असतात,असे हिंदूना पटवणे देखील कठीण आहे. पण जुन्या सवयीने आणि दुसरे काहीच करता येत नसल्याने भाजपने पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जनतेतून त्यांना कोणताही प्रतिसाद नाही. भारतमातेचा पुढचा टप्पा म्हणून या वर्षाअखेरीस राममंदिर बांधायला सुरुवात होईल. असा प्रचार सुरू झाला आहे. त्यातून भाजपचा उन्माद वाढेल पण मते वाढतीलच असे नव्हे.
राजेंद्र साठे
satherajendra@gmail.com
बातम्या आणखी आहेत...