आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची रेघ मोठी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिरासारखे प्रश्न आले की देशात दंगली माजणार, तणाव वाढणार. धंदेवाले अस्वस्थ होणार. परकीय लोक बिथरणार. ते थांबवायचे तर मंदिरवाल्यांना दाबावे लागणार. त्यांची रेघ पुसून जाईल, इतकी दुसरी मोठी रेघ काढावी लागणार. नेहरूंनी ते केले. कारण त्यांना ते करायचेच होते. मोदी काय करतील ?
१९५० मध्ये भारतीय प्रजासत्ताक स्थापन झाले. पंडित नेहरू या प्रजासत्ताकाचे नेते होते. पुढे चौदा वर्षे त्यांनी राज्य केले. नेहरूंचे प्रजासत्ताक बराच काळ भारलेल्या अवस्थेत होते. स्वातंत्र्य मिळाले. आता सर्व प्रश्न सुटणार, असे वातावरण होते. राजकारणात काँग्रेसचे पाशवी बहुमत होते. विरोधी समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष दुबळे होते. मात्र त्यांचे कृपलानी, लोहिया, डांगे इत्यादी नेते मोठ्या उंचीचे व लोकप्रिय होते. नेहरूंच्या प्रजासत्ताकाला फाळणीची पार्श्वभूमी होती. फाळणीमुळे हिंदूंची माथी भडकलेली होती. मुसलमानांच्या विरोधात लढणे, ही एक आकर्षक वाटू शकणारी बाब होती. गोळवलकर गुरुजी संघाच्या नेतेपदी होते. १९४७मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे खरे नव्हे, अशी त्यांची भूमिका होती. रामायणातील दाखला देऊन, ही सुलोचना आहे, सीता नव्हे, असे ते म्हणत.
विनायक दामोदर सावरकर यांनी ‘हिंदुत्ववाद’ हा शब्द आणि संकल्पना रूढ केली. सावरकरांभोवती स्वातंत्र्यवीर म्हणून मोठे वलय होते. हे सावरकर १९६६ पर्यंत हयात होते. ‘हिंदू महासभे’ला डॉक्टर, व्यापारी इत्यादी पांढरपेशांचा पाठिंबा असे. काँग्रेस सेक्युलर पक्ष होता. पण मनाने हिंदू असलेले अनेक लोक त्यात होते. वल्लभभाई पटेल यांची काही वक्तव्ये संदिग्ध होती. भारतात हिंदूंचे संघटन करण्यास हरकत नाही.’ अशी त्यांची भूमिका होती. संघ ही देशभक्तांची संघटना आहे, असे त्यांनी म्हटले होते.

गांधीहत्येनंतर पटेलांनी संघावर बंदी आणली. पण हिंसाचार सोडला तर एरवी ही संघटना भली आहे, असे पटेलांचे मत झालेले दिसत होते. मशीद हलवून सोरटी सोमनाथाचे नवे देऊळ उभारण्यात आले. कन्हैयालाल मुन्शी नावाचे काँग्रेसवाले, त्यात आघाडीवर होते. नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. देवळाच्या उद‌्घाटनाला राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद गेले. त्यांनी तसे जाऊ नये, असे नेहरूंना वाटत होते. पण त्यांचे काहीही चालले नाही.

गोहत्याबंदी हा विषय सतत चर्चेत येई. हिंदू साधू मोर्चे काढत. संघ किंवा हिंदूमहासभावादी त्यांना उचकावत. पण अनेक काँग्रेसवाल्यांचाही या मागणीला पाठिंबा असे. असे अनेक विषय होते. एकूणच देशात हिंदूवादी राजकारण करायला भरपूर अवसर होता. पाकिस्तान जर मुसलमानांचा असेल, तर हिंदुस्थान हिंदूंचा आहे, ही भूमिका पटवायला तशी सोपी होती.
पण तसे झाले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक नगण्य संघटना राहिली. मुख्य राजकीय प्रवाहात तिला हस्तक्षेप करण्यास वाव मिळाला नाही. ही स्थिती जवळपास १९७० पर्यंत कायम होती. हिंदूवादावर आधारलेला जनसंघ नावाचा पक्ष काढण्यात आला. पण त्यालाही यश आले नाही. १९५२च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाला जेमतेम तीन टक्के मते आणि तीन जागा मिळाल्या होत्या. १९६२पर्यंत ही टक्केवारी सहापर्यंत गेली. जागा १४ मिळाल्या.

सावरकर स्वातंत्र्यानंतर असून नसल्यासारखेच राहिले. ते राहात असलेल्या दादर भागातसुद्धा त्यांच्या ‘हिंदू महासभे’ला निर्विवाद यश मिळाले नाही. हिंदूवादी राजकारण किरकोळ राहिले. याचे मोठे श्रेय नेहरूंचे राहिले. देशाच्या विकासासाठी आधुनिकीकरणाची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्यामुळे अनेक उद्योग उभे राहिले. संस्था निर्माण झाल्या. वाढल्या. नेहरूंभोवती स्वातंत्र्य आंदोलनाचे वलय होतेच. पण त्यांची नंतरची दिशा स्पष्ट व ठाम होती. लोकांना ती पटली. बिरबलाच्या गोष्टीतल्याप्रमाणे नेहरूंनी मोठी रेघ ओढली. त्यापुढे हिंदूवादी राजकारणाची रेघ दिसेल, न दिसेल, अशी राहिली.

२०१६चे प्रजासत्ताक मोदींचे आहे. आता हिंदूवादी रेघ प्रबळ आहे. काँग्रेस क्षीण आहे. राहुल तिचे नेते आहेत. एकूण पोरासोरी कारभार चालू आहे. इतर पक्षांची नावे, तीच जुनी आहेत. समाजवादी, कम्युनिस्ट. पण ते नेहरूंच्या काळातल्या इतकेच दुबळे आहेत. हिंदूवादी रीतसर निवडणुकीतून सत्तेत आले आहेत. लोकसभेत त्यांना पूर्ण बहुमत आहे. म्हणजेच, त्यांच्या विचारांचा देशात विजय झाला आहे. लोकशाहीत तसेच मानले जाते. यापुढे सरकारने केवळ हिंदूंच्या हिताच्या गोष्टी कराव्यात, असे हिंदूवाद्यांना वाटते. हिंदू सोडून या देशात मुख्यतः मुसलमान आणि ख्रिश्चन हे दोन धर्मीय राहतात. या दोघांना नगण्य करून टाकावे, असे हिंदूवाद्यांना वाटते. यातल्या मुसलमानांसोबत तर हिंदूवाद्यांचे खास भांडण आहे.
मुसलमानांना धाकात ठेवायला हवे, अशी त्यांची भावना आहे. ते कसे, याबाबत त्यांच्या विविध कल्पना आहेत. उदाहरणार्थ, बीफवर बंदी आणा. समारंभ किंवा उत्सवांमध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी करा. त्यांना कोणीही घरे किंवा दुकाने विकू नका. मशिदी पाडून देवळे बांधा. इतिहासातून त्यांचे उल्लेख काढून टाका. इत्यादी. त्यासाठी सरकारने आपल्याला मदत करायला हवी, असे ते मानतात. नव्हे तसे ते गृहीत धरतात.

मोदी या लोकांच्यातूनच पुढे आले आहेत. आज ते सरकारचे नेते झाले आहेत. हिंदूवाद्यांना सरसकट मदत करणे शक्य नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यांना हे अलीकडेच कळले असेल, असे नव्हे. मोदी हे दिल्लीत अलीकडे आले. पण, त्यापूर्वी ते गुजरातेत बारा-तेरा वर्षे राज्य करीत होते. गुजरातेत बोहरा आणि शिया धंदेवाले मोठ्या प्रमाणात आहेत. एकाएकी त्यांच्यावर वरवंटा फिरवता येत नसतो, हे तिथे त्यांना कळले असणारच. दिल्लीतल्या सत्तेवर तर अमेरिकेपासून सौदी अरेबियापर्यंत सर्वांचे लक्ष असते. देशातले लोक निवडून देतात, हे ठीक; पण म्हणून ती सत्ता सार्वभौम नसते. वाटेल, त्या गोष्टी करता येत नाहीत.

नेहरू प्रागतिक होते. त्यांचा हिंदूवाद्यांना मनापासून विरोध होता. त्यांनी पक्षातील हिंदूवाद्यांना कह्यात ठेवले. बाहेरच्या हिंदूवाद्यांना नामोहरम केले. मोदींचे तसे नाही. ते त्यांच्या राजकीय जन्मापासून हिंदूवादी आहेत. नेहरू प्रदीर्घ काळ लोकप्रिय होते. त्यांनी एखाद्या राजासारखे हिंदुस्थानवर राज्य केले. मोदींना तसेच राज्य करायचे आहे. तसेच लोकप्रिय असायचे आहे. पण नेहरूंची भूमिका प्रामाणिक होती. मोदींचे आत एक आणि बाहेर एक, असे आहे. ही भानगडीची भूमिका आहे. हिंदूवादाची भूमिका पुढे नेण्यासाठीच मोदी सत्ता वापरणार, हे स्पष्ट आहे. पण तसे उघडपणे करता येणे अवघड आहे, हेही तितकेच स्पष्ट आहे. अशा वेळी काय भूमिका घ्यायची, हा त्यांच्यापुढचा पेच आहे.
राममंदिराचा प्रश्न बघा. ‘मंदिर बांधणे हीच अशोक सिंघल यांना श्रद्धांजली ठरेल.’ असे मोहन भागवत म्हणाले. ‘मंदिर या वर्षअखेरी होईल.’ असे सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले. आज खरे तर देशाची अर्थव्यवस्था नाजूक आहे. निर्यात उणे पाच टक्के आहे. परदेशी गुंतवणूक रोडावली आहे. तेलाचा भाव २८ डॉलर प्रतिबॅरल इतका खाली येऊनही, त्याचा देशाला फायदा नाही. उत्पादन वाढत नाही. मंदिरासारखे प्रश्न आले की देशात दंगली माजणार, तणाव वाढणार. धंदेवाले अस्वस्थ होणार. परकीय लोक बिथरणार. ते थांबवायचे तर मंदिरवाल्यांना दाबावे लागणार. त्यांची रेघ पुसून जाईल, इतकी दुसरी मोठी रेघ काढावी लागणार. नेहरूंनी ते केले. कारण त्यांना ते करायचेच होते. मोदी काय करतील? त्यांना खरेच काय करायचे आहे??
satherajendra@gmail.com
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....