आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टु द पॉईंटः मोदींचे छान चालले आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म आणि राष्ट्रवाद हे भाजपच्या खेळण्याचे रिंगण आहे. परंतु, या रिंगणाबाहेर येऊन देशव्यापी लढाई पुकारू शकणारा एकही नेता विरोधी पक्षांत नसल्याने मोदींचे छान चालले आहे... चालत राहणार आहे...

नरेंद्र मोदी सत्तेत येऊन सव्वादोन वर्षे झाली. परदेशातील काळा पैसा, खात्यात १५ हजार रुपये याबद्दल आता कोणी बोलत नाही. काँग्रेसचे कोणीही मंत्री तुरुंगात गेलेले नाहीत. रॉबर्ट वड्रा आजही आरामात फिरत आहेत. (उलट मध्यंतरी ते भाजपच्या जवळ जात असल्याच्या बातम्या होत्या.) पाकिस्तानला कायमचा धडा वगैरे काही शिकवला गेलेला नाही. राज्यपालांच्या नियुक्त्या काँग्रेसच्या पद्धतीनेच चालू आहेत. राम नाईक, किरण बेदी, नजमा हेपतुल्ला या ‘असून अडचण, नसून खोळंबा’वाल्यांची व्यवस्थित सोय लावण्यात आली आहे. उत्तराखंड, अरुणाचल इत्यादींमध्ये काँग्रेसी सरकार उलथून टाकण्याचे प्रयोग झाले आहेत. नंतर न्यायालयाकडून मारही खाऊन झाला आहे. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तर बहुधा त्यांचे कोर्टमार्शलच होईल, असे २०१४मध्ये वाटत होते. पण, तसे काही झालेले नाही. उलट एखाद्या एकनाथ खडसे यांचा अपवाद वगळता, वसुंधराराजे, सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान यांच्यापासून ते पंकजा मुंडे, गिरीश बापट इत्यादींपर्यंत सर्व जण सुखाने राज्य करीत आहेत. खुद्द खडसे यांच्याविरुद्धही काँग्रेसवाले नेमायचे, तसा चौकशी आयोगच नेमला गेला आहे. त्या आयोगाचे काय चालले आहे, हे माध्यमांमधून तरी कळत नाही. खुद्द मोदींच्या गुजरातेतील दलित व पटेल अशांत आहे. पोरबंदर जिल्ह्यातले दलित अत्याचाराच्या भयाने स्थलांतर करत आहेत. फडणवीस, गडकरी, मोहन भागवत इत्यादींच्या नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे.
पण हे सगळे असले तरी, प्रत्यक्ष मोदींचे छान चालले आहे. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. कोणत्याही सरकारचा हनिमून पीरियड सहा महिने ते वर्षभर चालतो. पण मोदी सरकारचा हनिमून अजूनही चालूच आहे. अनेक प्रश्नांबाबत मोदी आणि भाजप यांच्यावर टीका होते. माध्यमे, विरोधी पक्ष थोडेफार प्रभावी मुद्दे मांडतात. शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यासंबंधीचा कायदा किंवा महाराष्ट्रातला अलीकडचा अंतर्गत सुरक्षा कायदा प्रस्ताव, पठाणकोट हल्ल्यासारखे प्रसंग, पटेल आंदोलन इत्यादींमध्ये मोदी किंवा भाजप यांची कोंडी झाल्यासारखी वाटते. विरोधकांनी आरोप व टीका केल्याचे समाधान मिळते. प्रसंगी सरकारला पाय मागे घ्यावा लागतो. पण ते तेवढ्यापुरतेच राहते. त्यामुळेच आता निवडणुका झाल्या तर भाजप आघाडीला तीनशेच्या वर जागा मिळतील, असा अंदाज आला आहे.
सर्व राजकारण आपल्या तंत्राने चालावे, असे कोणत्याही सत्ताधीशाला वाटते. तो त्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. भाजपही तेच करत आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय राजकारणाचा बहुतांश खेळ हा भाजपला हव्या त्या रीतीने त्यांच्याच रिंगणात आणि त्यांच्याच नियमांनी चाललेला आहे. भाजपला आणि मोदींना सोईस्कर असतील, असेच मुद्दे वारंवार पुढे आणून त्याभोवतीच चर्चा खेळती ठेवण्यात आली आहे. घरवापसी, धर्मांतर, गोरक्षा, देशद्रोह असे हे मुद्दे आहेत. भाजपने वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनी स्वतःचा भक्तगण वर्ग तयार केला आहे. या मुद्द्यांबाबत भाजपला विरोध करणारा हा धर्मद्रोही वा देशद्रोही, हे त्या वर्गाच्या डोक्यात भक्कमपणे घुसवण्यात आलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही तर्कशुद्ध मुद्दे मांडले वा पुरावे दिले, तरीही हा वर्ग ते आपल्या अंगाला लावून घेत नाही.
पठाणकोटमध्ये भारताने पाकिस्तानी चौकशी पथकाला येऊ दिले. परंतु भारतीय पथकाला मात्र पाकने प्रवेश नाकारला. या हल्ल्याला स्थानिकांची मदत झाल्याचाही संशय होता. भाजप विरोधात असता, तर या मुद्द्यांवर काँग्रेस कायमची देशद्रोही ठरली असती. आज भाजप सत्तेत असूनही त्याला मात्र दोष लागू होत नाही. कारण, भाजप हा देशभक्त व चारित्र्यवान लोकांचा पक्ष आहे, ही प्रतिमा त्याच्या भक्तगणांतच नव्हे तर इतरही बहुसंख्य लोकांमध्ये खोल रुजलेली आहे. असे अनेक वाद पचवण्याची ताकद भाजपने यातून कमावली आहे. पीडीपीने २००८मध्ये काश्मीरसाठी स्वतंत्र चलन असावे, इत्यादी अनेक देशद्रोही ठरवता येतील अशा मागण्यांचा जाहीरनामा काढला होता. याच पीडीपीसोबत आज भाजप खुलेआम सत्तेत आहे. दोन वर्षे केंद्रीय सत्तेत राहून आणि असंख्य तडजोडी करूनही खरेखुरे राष्ट्रवादी ही आपली प्रतिमा अबाधित ठेवणे, हे मोदी व भाजपचे मोठे यश आहे. पूर्वी काँग्रेसने असेच यश मिळवले होते. काँग्रेस हा दलित, मुस्लिम व गरिबांचा पक्ष ही प्रतिमा अलीकडेपर्यंत कायम होती. राममनोहर लोहियांचे समाजवादी चेले आणि कम्युनिस्ट या गरिबांच्या कैवाऱ्यांनी जोरदार हल्ले करूनही काँग्रेसची ती प्रतिमा अभंग होती. इंदिरा गांधींनी बांगलादेशची लढाई जिंकली. पंजाबच्या अतिरेक्यांनी त्यांना मारले. पुढे राजीव गांधीही तामीळ अतिरेक्यांकडून मारले गेले. भाजपकडे देशासाठी बलिदान करणारे असे कोणीही नाहीत. तरीही काँग्रेस हिंदू राष्ट्रवाद्यांची मने जिंकू शकली नाही. दुसरीकडे तिने सेक्युलॅरिझमसाठीही खऱ्या अर्थाने कधीही लढाया केल्या नाहीत. काँग्रेसने बाबरी मशीद पडू दिली. त्यापूर्वी व नंतरही काँग्रेसला जातीय दंगली रोखता आल्या नाहीत. गुजरातमध्ये स्वतःचा खासदार जिवंत जाळला जाऊनही, तो पक्ष थंड बसला. त्यामुळे धर्म, राष्ट्रवाद हे काँग्रेसच्या खेळण्याचे रिंगण नव्हे. बलुचिस्तानच्या प्रश्नावरून मोदींना विरोध करण्याबाबतचा गोंधळ किंवा संघवाल्यांनी गांधींना मारले,यावरून राहुल गांधींची उडालेली फे फे ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.
काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. पण इतर पक्षांचीही हीच स्थिती आहे. समाजवादी पक्ष लोहियांचे नाव सांगतो व स्वतःला मुस्लिमांचा तारणहार मानतो. पण १९९१मध्ये कारसेवकांवर गोळीबार करण्यात आपली चूक झाली, अशी कबुली मुलायमसिंह यादव यांनी नुकतीच दिली. अशीच कबुली त्यांनी पूर्वीही दिली आहे. भाजपच्या रिंगणात खेळण्यात मुलायम यांचादेखील घामटा निघत असल्याचे, हे लक्षण आहे. तिकडे बिहारमध्ये गोरक्षणाच्या मुद्द्यावर यादवांचे नेते लालूप्रसाद आणि दुसरे समाजवादी नितीशकुमार शांत आहेत. भाजपच्या राष्ट्रवाद-केंद्रित राजकारणाला केरळच्या कम्युनिस्टांनी टक्कर दिली आहे. पण देशातील इतर ठिकाणची त्यांची निष्क्रियता आणि निष्प्रभता डोळ्यात भरणारी आहे.
गुजरातेतील दलितांच्या १५ ऑगस्टच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यामुळे मोठी उलथापालथ घडवता येईल, असे काहींना वाटते. पण जाणकारांनी ती शक्यता पूर्ण खोडून काढली आहे. असंतोष संघटित झाल्यासारखा वाटला तरी, त्याला मोठा आकार येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. तो यायला हवा असेल, तर काँग्रेससह सर्व विरोधकांना संघर्षाच्या नव्या जागा शोधाव्या लागतील. या जागा धर्म आणि राष्ट्रवादाच्या परिघापलीकडच्या असाव्या लागतील. लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असाव्या लागतील. काँग्रेसचा प्रश्न असा आहे की, त्यांना यासाठी कोठून सुरुवात करावी, हे ठाऊक नाही. आजवर सदैव सत्तेत राहिल्याने निव्वळ नवनवीन योजना आणणे म्हणजेच गरिबांचे प्रश्न सोडवणे, अशी त्यांची कल्पना आहे. भाजपच्या रिंगणाबाहेर येऊन अशा देशव्यापी लढाईची उभारणी करू शकणारा एकही नेता काँग्रेसकडे वा अन्य पक्षांकडे आज नाही. भविष्यात तो निर्माण होईल, असे दिसत नाही. थोडक्यात, मोदींचे छान चालले आहे आणि बराच काळ ते तसे चालणार आहे.

satherajendra@gmail.com
पुढे पाहा, फटो...
बातम्या आणखी आहेत...