आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहूब रविशंकर (राजेंद्र साठे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्येजवळच्या गावात राजाराम मिश्रा नावाचा एक मुलगा होता. लहानपणापासून तो आध्यात्मिक प्रवृत्तीचा होता. एका कुंभमेळ्यामध्ये त्याने रीतसर संन्यास घेतला. तीस की चाळीस वर्षे, तो एका गुहेत राहिला. या मुलाला लोक स्वामी ब्रह्मानंद सरस्वती म्हणू लागले. १९४१मध्ये हे स्वामी ज्योतीर्मठाचे- जो उत्तराखंडमध्ये चमौलीजवळ आहे- शंकराचार्य झाले. डॉक्टर राजेंद्रप्रसाद, राधाकृष्णन असे नेते त्यांना मानत. अनेकदा भेटत. पण स्वामींनी अध्यात्म सोडून फार इतर भानगडी केल्या नाहीत. मठाच्या इमारती बांधल्या, देवळे बांधली, तेवढीच.
महेशप्रसाद वर्मा(श्रीवास्तव) हे त्यांच्या पुढे गेले. त्यांनी १९४२मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवी घेतली. शंकराचार्य झालेल्या स्वामी ब्रह्मानंद सरस्वती, यांचे ते साहाय्यक झाले. वैदिक संस्कृतीवर भाषणे देऊ लागले. पट्टशिष्य खरे, पण ब्राह्मण नसल्याने ते शंकराचार्य मात्र होऊ शकले नाहीत. मग ते अमेरिकेत गेले. योगासने आणि ध्यानधारणा यांचे जबरदस्त मार्केटिंग केले. ते महर्षी महेश योगी नावाने विख्यात झाले. त्यांच्या नावाने शाळा, कॉलेजे, संस्था निघाल्या. युरोप-अमेरिकेत तरुणांमध्ये त्यांचा मोठा पंथ तयार झाला. ‘बीटल्स’चे तमाम बंडखोर संगीतवाले एक काळ त्यांच्या भजनी लागले होते.

महेश योगींचे स्वतःचे हेलिकॉप्टर होते. त्यांच्या संस्थांची मालमत्ता पाचशे कोटी डॉलरची होती, असे म्हणतात. म्हणजे, अध्यात्माच्या शिकवण्या घेत असले तरी धंद्याला ते जबरी होते. नाव आणि पैसा यांचा उपयोग करून त्यांना सत्तेच्या राजकारणातही घुसायचे असावे. अमेरिकेत त्यांच्या प्रेरणेने ‘नॅचरल लॉ पार्टी’ नावाचा पक्ष स्थापन झाला होता. या पक्षाने दोन-तीनदा अध्यक्षीय निवडणूक लढली होती. भारतात त्यांच्याच चेल्यांनी ‘अजेय भारत’ नावाचा पक्ष काढला होता. यथावकाश तो डब्यात गेला. शीतयुद्धाच्या काळात जगभरात ‘विश्वशांती’ हा परवलीचा शब्द होता. विश्वशांतीसाठी काम करतो, असे म्हणणाऱ्यांना कुठूनकुठून पैसे मिळत. महेश योगी यांनी हा शब्द आपलासा केला होता. साहजिकच त्यांनादेखील अधिक नाव आणि पैसे आपलेसे करता आले. महर्षी महेश योगींचे दोन शिष्य विशेष मान्यता पावले. एक दीपक चोप्रा. हा आपल्याशी स्पर्धा करतो, असे महेश योगींना वाटे. त्यामुळे त्यांनी दीपक चोप्रा यांची हकालपट्टी केली, असे म्हणतात. आयुर्वेद, स्पिरिच्युअल हिलिंग वगैरेंचा वापर करून आता तो अमेरिकेतला मोठा गुरू झाला आहे.

दुसरे श्री श्री रविशंकर. हे तामीळनाडूत जन्मले. लहानपणापासून हे फार देवपूजा करीत. पण यांचे शिक्षण कॉन्वेंट शाळा-कॉलेजातून झाले. रविशंकर यांनी पदवी विज्ञानाची घेतली; पण लोकांना ध्यानधारणा शिकवणे, हेच उद्योग ते करू लागले. नंतर महर्षी योगींसाठी वैदिक सायन्स वगैरे विषयांवर भाषणे देत ठिकठिकाणी फिरले. त्यातून महर्षींच्या व्यापाची त्यांना कल्पना आली असावी. १९८१मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ नावाची संस्था काढली. महर्षींचे उद्योग अचूकपणे पुढे चालवायला ते सज्ज झाले.

श्वासोच्छवासाच्या व्यायामांचे एक मोठे तंत्र करणे, त्याला अनेक समस्यांवरचे एकमेव वा अक्सीर इलाज म्हणणे, हे रविशंकर यांच्यासारख्यांचे कसब होय. शिवाय ते इंग्रजीत बोलतात. शास्त्रीय परिभाषा वापरतात. त्यामुळे हा अगदीच गावठी प्रकार वाटत नाही. जसा तो रामदेवबाबाच्या बाबतीत वाटतो. किंबहुना म्हणूनच गुजराती, मारवाडी व्यापारी, कंत्राटदार, अडते इत्यादी बिनसफाईदार लोक रामदेवबाबाकडे जातात. तर रविशंकर यांचे बहुतेक शिष्यगण हे आयटीवाले, फायनान्सवाले किंवा ‘एक्झिक्युटिव्ह’ प्रकारातले लोक आहेत. रविशंकर यांचे मुख्यालय बंगळुरुत आहे, हादेखील अगदीच योगायोग नसावा.

अशाच उद्योगांमधून महर्षींनी देशोदेशी आपले कोट्यवधी भगतगण तयार केले. नंतर तो प्रभाव वापरून आंतरराष्ट्रीय नेतेगिरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो फार यशस्वी झाला नाही. आता रविशंकर यांना महर्षींच्याही पुढे उडी मारायची आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कोट्यवधी ग्राहक तर आहेतच. शिवाय जगभर भूकंप, पूर, दुष्काळ वगैरे आपत्ती आल्या, की तिथे यांचे लोक जातात. प्रचार भरपूर होतो. यांच्या एका एनजीओचे मुख्यालय मुळी जीनिव्हा इथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर भागीदारी करायला आणि पैसे उभे करायला त्यामुळे सोपे जात असणार. आंतरराष्ट्रीय भानगडींमध्ये मध्यस्थी करणे, हा प्रतिमा-निर्मितीचा दुसरा मार्ग दिसतो. उदाहरणार्थ, कोलंबियामधल्या बंडाळीत मध्यस्थी करण्यात यांची भूमिका होती, असे गुगलवरची माहिती सांगते. दक्षिण अमेरिकेतील कोलंबियात गेली पन्नास वर्षे यादवी चालू आहे. तेथील डाव्या बंडखोरांनी अमेरिकाधार्जिण्या सरकारशी सतत सशस्त्र लढा चालू ठेवला आहे. यात लक्षावधी लोक मारले गेले आहेत. अलीकडे बंडवाले आणि सरकार यांच्यात बोलणी झाली व करार होणार होता, हे खरे; पण रविशंकर यांच्यापर्यंत पोहोचले कसे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. (भानगडबाज तांत्रिक गुरू चंद्रास्वामीदेखील असल्याच मध्यस्थीच्या गोष्टी करायचा, याची काहींना आठवण येऊ शकते.) पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. याच धर्तीवर इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया इत्यादी देशांमध्ये श्री श्री गेले आहेत. पेरू वगैरे देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाले आहेत. आता ब्रिटिश संसदेत बोलण्यासाठी त्यांच्या पंतप्रधानांनी यांना निमंत्रण धाडले आहे. त्यामुळे जागतिक नेतेगिरीच्या आघाडीवर रविशंकर महर्षींच्याही पुढे चालले, असे दिसते. आता इथून पुढचा टप्पा नोबेल पारितोषिकाचा असावा. किंबहुना, त्याचसाठी सर्व काही चालू असावे.

महर्षी परदेशात भटकत राहिले. रविशंकर यांनी मात्र भारत धरून ठेवलेला दिसतो. हजारे-केजरीवाल आंदोलनात, ते योग्य वेळी योग्य प्रमाणात फोटोत दिसले. विदर्भ किंवा आंध्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपदेशांचे कार्यक्रम ते करतात. काश्मीर प्रश्न, नक्षलवाद यामध्ये आपल्याला मध्यस्थी करायला आवडेल, असे ते सुचवतात. पण म्हणजे त्यांच्याकडे फार मोठे राजकीय तत्त्वज्ञान वा तोडगे आहेत, असे नव्हे. हिंसा नको, एकमेकांवर प्रेम करा, असे हे सदैव गोलगोल गुळमुळीत बोलत असतात. पण गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून अखलाख किंवा तशाच कोणा मुसलमानाला ठेचून मारण्याच्या प्रकाराचा हे कधी झटून निषेध करीत नाहीत. मुसलमान किंवा ख्रिश्चनांविरुद्ध विद्वेष पसरवण्याचे राजकारण बंद करा, असे भाजपला सांगण्याची कधी शक्यता नाही. शनी शिंगणापूरला महिला प्रवेश आंदोलनात हिंदू गुरूच्या भूमिकेतून मध्यस्थी करायला ते पुढे आले. पण असल्या खुळचट धर्मश्रद्धांचा सणसणीत निषेध करतो, असे काही त्यांच्याने म्हणवले नाही. एकीकडे त्यांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये पैशांनी फुगलेली आधुनिक गिऱ्हाइके हवी आहेत; पण त्याच वेळी सनातन हिंदू धर्मवाद्यांचे नेतृत्वही यांना हवे आहे.

नरेंद्र मोदी, आजचा भाजप आणि संघ यांना आज हुबेहूब रविशंकर यांच्यासारख्यांचीच गरज आहे. ज्यांच्याकडे सांगायला स्वामी ब्रह्मानंद सरस्वतींसारख्यांचे कूळ आहे. ज्यांचा वावर जगभर आहे, पण जे हिंदुत्ववादाची चौकट ओलांडणार नाहीत. ज्यांच्याकडे पैसे अमाप आहेत आणि जे सोशल मीडियात एकदम बोलबच्चन आहेत. ज्यांचे भक्त तपकिरी फुलपँटी घालणार नाहीत, पण मते मात्र हमखास मोदींना देतील. परिवाराने कितीही खुनाखुनी केली, तरी त्यांची प्रतिष्ठा कायम ठेवतील.
बातम्या आणखी आहेत...