आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्‍या गोड गोड गोष्‍टी ( राजेंद्र साठे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडील काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट किंवा आंबेडकरी अशा इतर कोणत्याही चळवळी वा संघटनांमध्ये प्रत्येक काळात मोठमोठे वाद झालेले दिसतात. लोकमान्य टिळकांच्या काळातील जहाल-मवाळ वाद, गांधींच्या काळातील सुभाषचंद्र बोस व गांधींचा संघर्ष, चिनी आक्रमणानंतरचा कम्युनिस्टांनंतरचा वाद, आंबेडकरी चळवळीतील ढाले-ढसाळांचा व्यक्तिकेंद्रित वाटणारा पण खरे तर कम्युनिस्ट विरुद्ध रिपब्लिकन भूमिकेचा वाद, अशी अनेक उदाहरणे याबाबत सांगता येतील. याखेरीज कितीतरी तत्कालीन धोरणे, निर्णय, भूमिका यांच्याबाबत त्या त्या पक्षात व बाहेरही प्रचंड चिकित्सा झालेली दिसेल. कार्यकर्त्यांनीच नव्हे तर सामान्य लोकांनीही अशा वादांमध्ये हिरिरीने भाग घेतलेला दिसेल. राज्यघटना स्वीकारते वेळी हिंदू कोड बिल, समान नागरी कायद्याचा प्रश्न, औद्योगिक धोरण, चीनबाबतची भूमिका इत्यादींवरून खुद्द नेहरूंनाही काँग्रेसमध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. फाळणी आणि नंतर स्वातंत्र्याबाबत काय भूमिका घ्यायची, याबाबत कम्युनिस्ट नेत्यांमध्ये बरेच वादंग झाले. याबाबतची अनेक कागदपत्रे, पुस्तके, भाषणे सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना वा त्रयस्थ निरीक्षकांना त्यांचा अभ्यास करून आपापले मत ठरवता येते. विश्लेषण करता येते. अंतर्गत संघर्षातून अनेकदा त्या त्या चळवळी वा पक्ष फुटले. नेते बाजूला पडले. नवे नेते उदयाला आले. संघर्षांमुळे हाणामाऱ्या वा कटू प्रसंगही घडले. पण तरीही वादांपासून कोणी मागे हटले नाही, त्यांच्याविषयी लपवाछपवी केली नाही. याबाबत संघाची स्थिती मात्र बरोबर विरुद्ध आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणखी दहा वर्षांनी शंभर वर्षांचा होईल. पण या शतकभराच्या काळात संघात विविध राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक प्रश्नांच्या संदर्भात काय विचारमंथन झाले, विविध मतमतांतरे व्यक्त झाली, विशिष्ट निर्णय घेण्यापूर्वी काय विचारविनिमय झाला, याचे कोणतेही सार्वजनिक वा संघाच्या पोतडीतील दस्तऐवज उपलब्ध नाहीत. टिळक-गांधी-नेहरूंचा किंवा काँग्रेसचा इतिहास संगतवार पुराव्यांनिशी मांडता येतो. त्याची उलटसुलट तपासणी करता येते. संघाच्या बाबतीत मात्र असे घडू शकत नाही. कारण तिथला सर्व कारभार गुप्तपणे, पडद्याआड चालतो.

गंगाधर इंदूरकर यांनी संघावर एक पुस्तक लिहिले आहे. ते स्वतः स्वयंसेवक होते. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे दिल्ली प्रतिनिधीही होते. त्यामुळे त्यांच्या लिहिण्याला एक वजन आहे. पण त्यांनी दिलेल्या इतिहासातही, ‘असे कानावर आले, असे बोलले जाते, असे म्हटले जाई’, अशी सांगोवांगीची भाषा अधिक आहे. अंडरवर्ल्ड किंवा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये असाच सर्व तोंडातोंडी कारभार चालतो. त्यामुळेच बहुधा संघाचे टीकाकार त्याला एक सांस्कृतिक टोळी म्हणतात.
अशी ही टोळी म्हणा किंवा संघटना म्हणा, तिच्यात एक बंड उफाळून आले आहे. आणि जसा तिचा एरवीचा कारभार तशीच तिच्यातल्या बंडाची अवस्था आहे. बंडासाठी दिली जाणारी कारणे यथातथाच आहेत. प्रत्यक्षात हा सर्व वैयक्तिक अहंकाराचा मामला आहे. गोव्यातील सुभाष वेलिंगकर यांनी कोकणी आणि मराठी शाळांची बाजू घेऊन संघनेतृत्वाला आव्हान दिले आहे. त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण, संघाची आजवरची भूमिका इत्यादींची कोणतीही सखोल चर्चा ते करीत नाहीत. त्यासाठी कोणतेही जनआंदोलन उभारण्याची भाषा करीत नाहीत. किंवा आम्ही सत्तेत येऊन हा प्रश्न सोडवू, अशी भाषा ते करीत नाहीत. उलट आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करणे, हे एकमेव उद्दिष्ट असल्याचे ते स्पष्ट सांगतात. त्यानंतर आपण निवृत्त होणार, असे ते म्हणतात.
दुसरीकडे संघ परिवारातील लोकही वेलिंगकरांच्या निमित्ताने मातृभाषेतील शिक्षण, इंग्रजीचा प्रभाव रोखणे इत्यादीविषयी चर्चा करताना दिसत नाहीत. संघाने आजवर या प्रश्नी कोणती भूमिका घेतली व काय काम केले, हे परिवारातील कोणीही जबाबदार नेता स्पष्टपणे सांगत नाही वा त्याविषयी लिहीत नाही. हे असे होते, याची दोन कारणे. एक म्हणजे, संघाने याविषयी तोंडदेखली राष्ट्रीय भाषा रक्षणाची भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्याविषयी काहीही केलेले नाही. दुसरे म्हणजे, अशा मुद्द्यांवर सर्व बाजूंनी जाहीर चर्चा होऊ द्यावी व संघाच्या लोकांनी त्यात हिरिरीने भाग घ्यावा, अशी पद्धतच संघाला मानवत नाही.

वेलिंगकर हे काही संघातील पहिले बंडखोर नव्हेत. यापूर्वी असे अनेक फुटाफुटीचे प्रकार घडले आहेत. त्यातही गोळवलकर गुरुजींच्या कारभाराला वैतागलेल्या लोकांनी अशी बंडे अधिक केली. फाळणीला विरोध करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी काहीही केले नाही, यावरून असंख्य स्वयंसेवक नाराज होते. १९४७च्या त्या स्फोटक काळात संघ निष्क्रिय का आहे, असा प्रश्न त्यांना पडत होता. पुढे पुण्याची ‘ज्ञानप्रबोधिनी’ स्थापन केलेले अप्पा पेंडसे, सांगलीचे मधू देवल, बाळासाहेब देवरस हे संघापासून या काळात दूर गेले.

संघाविषयी ममत्व असूनही खुद्द इंदुरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘संघात एकदा एखाद्याला चढवायचे ठरवले, की त्याला सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले जाते. त्या माणसात सर्व काही गुणच गुण दिसतात. पण एकदा का नेतृत्वाची त्याच्यावर नाराजी झाली, की त्याला पाताळाच्याही खालच्या जागी नेऊन टाकले जाते.’ या संदर्भात त्यांनी वसंतराव ओक यांचे उदाहरण दिले आहे. दिल्लीतील संघाचा विस्तार ओक यांनी केला. पण संघाने सांस्कृतिक संघटना म्हणून न राहता इतरही क्षेत्रात, विशेषतः राजकारणात पसरावे, असे जेव्हा ओक म्हणू लागले तेव्हा त्यांना बहिष्कृत करण्यात आले. इतकेच नव्हे तर १९५७च्या निवडणुकीत जेव्हा ओक जनसंघाच्या तिकिटावर दिल्लीतून उभे राहिले, तेव्हा त्यांना पाडण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला. आता वेलिंगकरांना आडवे करण्यासाठी भाजप आणि संघ अशाच रीतीने सर्व ताकद लावतील, यात शंका नाही.

वेलिंगकरांचे काय होते, ते वर्ष-दोन वर्षात कळेलच; पण या निमित्ताने संघातील अंतर्विरोध वाढत्या प्रमाणात समोर येतील. यापूर्वी सत्तेत आल्यानंतर आपण देशप्रेमाच्या आग्रहाने वाटेल त्या गोष्टी करू शकू, असे संघातील लोकांना वाटे. राष्ट्रभाषेच्या आग्रहाची भूमिका त्यातूनच घेतली गेली होती. पण आता गोव्यातच नव्हे, तर देशात कोठेही इंग्रजी शाळा बंद करण्याचे पाऊल उचलायचे धाडस संघात वा भाजपमध्ये नाही. तसे केले तर संपूर्ण मध्यमवर्ग त्यांच्या विरोधात जाईल. दोन वर्षांपूर्वी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन खुद्द मोहन भागवतांनी केले होते, पण ते वाऱ्यावर विरून गेले. स्वयंसेवक किंवा भाजपची सरकारे यापैकी कोणीच त्याला कवडीइतकीही किंमत दिली नाही. उद्या भागवतांच्या आदेशाचा दाखला देऊन, चिनी वस्तूंच्या विरोधात कोणा स्वयंसेवकाने आंदोलन करायचे म्हटल्यास भाजप आणि संघाची पंचाईत होऊन जाईल. आजवर हे झाले नाही, पण इथून पुढे अशा पंचायती होणार आहेत.
संघ हे एक कुटुंब आहे आणि या परिवारात कायम गोड गोडच गोष्टी होतात, अशा कल्पना करायला संघवाल्यांना आवडते. प्रत्यक्षात साने गुरुजींच्या गोष्टीतसुद्धा असा सदैव गोड गोडपणा नसतो, हे वयाबरोबर बुद्धी वाढलेल्या कोणाही माणसाला कळण्यासारखे आहे. संघ परिवाराला आता बहुधा वेलिंगकर प्रकरणानंतर हे कळू आणि वळू लागेल.
satherajendra@gmail.com
बातम्या आणखी आहेत...