आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइनवुमन उषाताई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसंग एक : नवीन वीज जोडणी मागण्यासाठी ग्राहक महावितरण कार्यालयात आलेला. साहेब सांगतात, ‘अर्ज आणि डिपॉझिट भरा, आमचा माणूस येऊन लाइट जोडून देईल.’ ग्राहकाने त्यानुसार प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतर दोनचार दिवसांत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी वाटेल अशी युवती संबंधित ग्राहकाच्या घरी येते. विजेच्या तांत्रिक बाबीची माहिती देऊन वीज कनेक्शन जोडून देते. एका मुलीने धाडसाने विद्युत खांबावर चढणे आणि सहजपणे लाइट जोडून देणे, हे त्या ग्राहकांसाठी तसे नवीनच असते.

प्रसंग दुसरा : महावितरण कार्यालयात फोन येतो, आमच्या भागात बराच वेळ लाइट नाही. महावितरणमधील हीच युवती इतर कर्मचाऱ्यासोबत त्या भागातील डीपीची दुरुस्ती करते आणि वीजपुरवठा सुरळीत होतो.
 
प्रसंग तिसरा : महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी दारात आलेले. थकबाकीदाराला त्याच्याकडील थकबाकीचा तपशील दिला जातो. जोवर बिल भरणार नाही तोवर विद्युतपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले जाते. आणि या कर्मचाऱ्यांमधील एकमेव महिला कर्मचारी उषा जगदाळे ही तरुणी सरसर पोलवर चढते आणि लीलया कनेक्शन कट करते.
 
पोलवर चढून दुरुस्ती करणे किंवा फ्यूज बसवणे यांसारख्या तांत्रिक कामात महावितरणचे पुरुष कर्मचारी काम करताना पाहणे तसे नवीन नाही. पण याच कामात त्यांची बरोबरी करून आपणही कुठे कमी नसल्याचे महावितरणच्या बीड कडा येथील महिला कर्मचारी उषा जगदाळे यांनी दाखवून दिले आहे.

उषाताई विजेच्या खांबावर चढून वीज कनेक्शन देणे, डीपीच्या फ्यूज नादुरुस्त असतील तर त्या काढून दुरुस्त करणे यांसारखी कामे सहज करतात. महावितरणमध्ये आतापर्यंत अशी कामे सहसा पुरुष कर्मचारी करत होते. उषाताई बीड जिल्ह्यातील पहिल्या लाइनवुमन आहेत.

आपल्या या वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्या आष्टीपासून जवळ असणाऱ्या देवीगव्हाण या गावाच्या रहिवासी. वडील भाऊसाहेब जगदाळे, आई आणि एक बहीण व दोन भाऊ असा त्यांचा परिवार. शेतीवर उपजीविका असल्याने आईवडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र त्यांनी प्रसंगी मोलमजुरी केली पण या भावंडाना शिकवले.

‘माझे आणि माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे. भाऊ शिक्षण घेताहेत. तवलवाडी हे माझे सासर. सासूसासरे अणि पती असा सासरचा परिवार. मी जामगावच्या शाळेत असताना खोखो खेळाडू होते. खोखोमध्ये मी अकरा वेळा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. दहावीनंतर काही काळाने माझे लग्न झाले. माझे पती शेतीच करतात, मात्र त्यांनीही मला कायम शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकले.’ उषाताईंनी सांगितले. 

२०१३मध्ये उषाताई बँकेत खेळाडूसाठीच्या जागेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एका संगणक संस्थेत गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना महावितरणमध्येही कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी जागा रिक्त असल्याचे समजले. ‘मी दोन्हीसाठी अर्ज केले. माझी महावितरणमध्ये निवड झाली. खोखोतील नॅशनल चॅम्पियन असण्याचा मला फायदा झाला. सुरुवातीला मला आष्टीतील मुख्य कार्यालयात लिपिक वर्गातील काम मिळाले. या काळात मी आयटीआयमधून वायरमनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. माझी तांत्रिक पदावर निवड झाल्याने मला हा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे होते. खेळाडू म्हणून निवड झाली असली तरी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तेवढी सवलत देण्यात आली होती. 

मी विद्युत पुरवठ्याचे तांत्रिक काम शिकल्याने आष्टीतील इतर कर्मचाऱ्यांसोबत जाऊन फ्यूज बसवणे, पोलवर चढून वीज कनेक्शन जोडणे किंवा तोडणे यांसारखी कामे करत होते,’ असे उषाताई म्हणाल्या.
‘नोकरीच्या दोनच वर्षांत माझी वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून पदोन्नती झाली आणि मी कडा येथे रुजू झाले. मी इतर कर्मचाऱ्यांसोबत जेव्हा वीज बिल वसुलीसाठी जाते, थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी पोलवर चढते, तेव्हा लोक अचंबित होऊन बघतात. एखाद्या मुलीने खांबावर चढणे त्यांच्यासाठी कदाचित आश्चर्याचे असेल, मला मात्र हा माझ्या कामाचा एक भाग वाटतो,’ असं त्या स्पष्ट करतात.

- राजेश राऊत, बीड
rajeshraut05@gmail.com
बातम्या आणखी आहेत...