आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या बहिणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा सुमनताई भेटल्या. वय वर्षं सत्तर. त्यांची मुलगी स्पेनला असते. म्हणून त्या स्पॅनिश भाषा शिकतात. मला म्हणाल्या, ‘नातवंडांना भेटल्यावर त्यांच्याशी गप्पा मारायच्या तर त्यांची भाषा तर यायला हवी ना? आता तसा वेळ ही असतो. म्हटलं, एक नवीन भाषा तरी शिकू.’
त्यानंतर त्यांनी एक नवीनच भुंगा माझ्यामागे लावला. त्या सांगत होत्या, ‘स्पॅनिश भाषा लगेचच शिकवत नाहीत, तर प्रथम एक महिना त्यांचे शिक्षक त्यांना स्पॅनिश संस्कृतीविषयी गोष्टी सांगतात. त्यांचे सण, त्यांचे उत्सव, त्यांचे खाद्यपदार्थ याविषयी माहिती देतात, फिल्म दाखवतात. आणि मग त्यांच्या संस्कृतीचा आधार घेत ते भाषेकडे वळतात.’ त्यांना खूप गोष्टी आधीच कळल्यामुळे त्यांना ती परकी भाषा सोपी वाटू लागली. त्या हसतच म्हणाल्या, ‘खरं सांगायचं तर, एक महिना संपला कधी आणि भाषेचा वर्ग सुरू झाला कधी हे आम्हाला कळलंच नाही.’
आणि मग त्यांनी मला तो भुंगा-प्रश्न विचारला, ‘आपण अमराठी लोकांना आपली भाषा शिकवताना अशीच शिकवतो का हो?’
माझी बोलतीच बंद झाली. मी कसंनुसं हसून वेळ मारून नेली; पण माझ्या मनात विचार आला, आपण आपल्या मुलांना भाषा शिकवताना तरी असा काही विचार करतो का? भाषा आणि संस्कृती यांचं नातं आपण मुलांसमोर अलगदपणे उलगडताना अधिक सजग राहिलं पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. नाही तर रामबाण, भीमटोला, गुढ्या उभारा, सोने लुटा, हर हर महादेव या शब्दांत लपलेले अर्थ मुलांना कधीच कळणार नाहीत.
भाषा आणि संस्कृती अगदी एकजीव झालेल्या आहेत. खरं तर या जुळ्या बहिणीच आहेत. भाषेशिवाय संस्कृती आणि संस्कृतीशिवाय भाषा शिकवताच येणार नाही, हे सत्य मला अचानकच उलगडलं.
मग शाळेतल्या पालक सभेत सुमनतार्इंनाच घेऊन गेलो. त्यांनी स्पॅनिश भाषा शिकतानाचे आपले अनुभव सांगितले. ते ऐकल्यावर सगळे पालक आणि शिक्षक उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘आपणही काही करूया.’ मग तिथेच एक समिती स्थापन झाली.
सहा महिने मुले, पालक व शिक्षक कसून मेहनत करत होते. वेगवेगळे वाक्प्रचार, म्हणी मुलांनी शोधून काढल्या. त्यावर आधारित काही चित्रं तयार केली. कोडी तयार केली. छोटे संवाद लिहिले.
आणि चक्क सहा महिन्यांनी मुलांनी शाळेतच शनिवार-रविवार मिळून दोन दिवसांची ‘भाषा जत्रा’ भरवली. अपेक्षेपेक्षा खूपच गर्दी झाली. म्हणींची, जोडशब्दांची कोडी सोडवताना, वेगवेगळ्या शब्दांचे आपल्या संस्कृतीशी संबंधित अर्थ शोधताना खूपच मजा आली.
रविवारी पालकांनी मुलांसाठी प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात त्यांनी पंचतंत्र, रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, आपला स्वातंत्र्यलढा अशा अनेक गोष्टींचा समावेश केला होता.
हे दोन दिवस हा-हा म्हणता भुर्रकन उडून गेले. शेवटच्या दिवशी सगळी आवराआवर झाली तरी कोपर्‍यात काही मुलांची कुजबुज सुरू होती. त्या कुजबुज घोळक्यात मी शिरलो तेव्हा मुले म्हणाली, ‘पुढच्या वर्षी आम्ही पालकांसाठी प्रश्नमंजूषा घेणार, पण भाषेबाबत नाही. गणित आणि संस्कृती याबाबत...’
माझा अचंबित चेहरा पाहून एक मुलगा म्हणाला, ‘म्हणजे आम्ही त्यांना विचारणार, दासबोधात किती समास आहेत आणि गीतेत किती श्लोक आहेत?’
मला ही कल्पना फार आवडली. मला आणखी एका जुळ्या बहिणीचा शोध लागला. ‘संस्कृतीची जुळी बहीण शोधू लागलात तर तुम्हाला तिचं अख्खं कुटुंबच सापडेल,’ ही चिनी म्हण म्हणूनच महत्त्वाची आहे. rajcopper@gmail.com