आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Tambe Article About How To Entertain Kids During Summer Vacation

सुटीतले घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुटीची चाहूल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात.
एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं?
दोन, व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करूया.
यातले ‘पालक वारे’ कुठले व ‘मूल वारे’ कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल.
‘सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो, त्याला कुठल्या तरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात.
आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडीनिवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे.
सुटी ही एक संधी आहे, मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची पण सक्तीने शिकविण्याची नव्हे.
विनोबांनी म्हटलं आहे, ‘शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.’ मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररूपात वापरणार आहोत.
मुलांना सुटी आहे, तर मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करणे शक्य आहे ते पाहूया.
पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपणही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तोही न चिडचिडता.
हे सगळे उपक्रम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत.
मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत.
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करू दे.
यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे.
आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो हा विश्वासही त्यांच्या मनात रुजू दे.
तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच, पण चुकांतून शिकण्याची उमेद ही त्याच्या मनात चेतवा.
पण कृपया.. .. तुमच्या इच्छेखातर व तुम्ही ठरवले आहे तेच तुमच्या मुलांना ‘शिकवण्याचा प्रयत्न’ करू नका, किंबहुना तसा अट्टहासही करू नका.
1. आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करूया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहीत असू शकते. पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करून द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?
2. आई/बाबांच्या मदतीने ‘आमच्या रेसिपी’ नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने ‘मामाज रेसिपी बुक’ किंवा ‘अंकल्स रेसिपी’ अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.
3. घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणे योग्य
नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणे गरजेचे आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा / कपडे धुण्याचा अनुभवसुद्धा मुलांनी घ्यायला हवा.
4. एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जा. तेथील निरनिराळ्या साड्या, त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, त्यांची अनोखी खासियत याची मुलांना ओळख करून द्या. (यासाठी त्या वेळी नवीन साडी विकत घेण्याची गरज नाही. हे तुम्ही ओळखले असेलच.)
5. त्याचप्रमाणे पँट, शर्ट व ब्लाऊज यांना कशा प्रकारे इस्त्री करावी लागते याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रत्येक कपड्याची घडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते याची त्यांना जाणीव करून द्यावी. घड्या करण्याचा सराव द्यावा. त्यातील बारकावे दाखवावेत. उदा. साडीची घडी करताना आधी हातात फॉल धरावा लागतो. साडीच्या नि-या कशा करतात, याबाबतची त्यांची उत्सुकता चाळवावी. त्यांना प्रयत्न करू द्यावा.
6. कपडे धुतल्यानंतर हँगरवर लावायची पद्धत व कपड्यांना इस्त्री केल्यावर ते हँगरवर लावायची पद्धत वेगवेगळी आहे, याबाबत त्यांना सजग करणं.
7. मनोरंजक पण तरीही डोक्याला चालना देणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुले अशा खेळांशी फार वेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हाच आवडीने मुले त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.
8. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. मुलांच्या मदतीने जर का त्याचे वाचन केले तर त्यातील प्रयोग मुले स्वत:हून करू शकतील.
ही यादी आणखी पण वाढवता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढवता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो.
मी जरी तुम्हाला 8 गोष्टी सुचवल्या असल्या तरी यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची खात्री आहे. आणि यासाठी काहीही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी तुमच्या सोबतच आहे. मी तुमच्या शंभर नंबरी पत्रांची वाट पाहतोय.
rajcopper@gmail.com