आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले लाजली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेतून घरी यायची वेळ झाली तरी मिहीर काही आला नाही. त्यामुळे आजोबांना काळजी वाटू लागली. आजोबा खिडकीत उभे राहून त्याची वाट पाहायला लागले. इतक्यात त्यांना लांबून येणारा मिहीर दिसला. लगबगीने जाऊन आजोबांनी दरवाजा उघडला. आणि ‘उशीर झाल्याबद्दल त्याला चांगला दम द्यायचा’ असं त्यांनी मनातल्या मनात ठरवलं.

दडादडा धावत मिहीर घरात शिरला आणि आता आजोबा त्याला ओरडणार इतक्यात मिहीरने त्यांच्या हातात निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ ठेवला. नातवाने आणलेली टवटवीत फुले पाहताच आजोबांचा राग मावळला. आजोबांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. अचानक मिळालेली ही सुंदर भेट पाहून त्यांना क्षणभर काही बोलताच येईना.
पाठीवरचं दफ्तर कॉटवर फेकत मिहीर म्हणाला, "आजोबा, ती फुलं जरा पाण्यात ठेवा ना. उद्या मला ती शाळेत घेऊन जायची आहेत.' हे ऐकताच आजोबांचा चेहरा जरा सुकायलाच लागला. मिहीर घरी येताच आजीने आपला मंत्र सुरू केला, 'आधी हात पाय धू. कपडे बदल. मग जेवायला चल.'
इतक्यात फोन वाजला. मिहीरचाच फोन होता. मिहीरने फोन घेतला आणि त्याचा चेहरा पण आजोबांसारखाच व्हायला लागला. त्याचं जेवणावरचं लक्षंच उडालं. तो तणतणत म्हणाला, "आजी सगळा घोटाळा झाला बघ. उद्या शाळेतल्या कार्यक्रमाला फुले घेऊन जायचं काम माझ्याकडे आहे. बाईंनी आम्हाला रंगीबेरंगी फुले आणायला सांगितली होती; पण मला ही पांढरीशुभ्र निशिगंधाची फुलं खूप आवडली. म्हणून मी ती घेतली. आत्ता जयेशचा फोन होता. तो म्हणाला, ‘फुलं रंगीतच हवीत. फक्त पांढरी नकोत.’ सांग ना आता मी काय करू?'
कढीचा भुरका मारत आजोबा म्हणाले, "मी सांगतो. एकदम सोपी आयडिया. तुला माहीतच आहे की ही निशिगंधाची फुलं मला खूप आवडतात. ही मस्त फुलं मी घेतो. तू नवीन रंगीत फुलं घेऊन ये! आणि हो. इतकी छान फुलं मला भेट दिल्याबद्दल तुझे आणि तुझ्या आजीचे मी मनापासून आभार मानतो!'
आजोबांचं बोलणं पुरं होण्याआधीच आजी म्हणाली, "आभार मानण्याची काही गरज नाही बरं!' हे ऐकल्यावर क्षणभर आजोबांचा चेहरा फुलासारखा फुलला! पण आजी पुढे म्हणाली, "ही पांढरी फुलंच आम्ही वेगवेगळ्या रंगात रंगवू.' आता मात्र आजोबांच्या चेह-याचा रंग सुकू लागला! आणि मिहीरच्या चेह-याचा रंग उजळू लागला!
आजीने काचेच्या चार बाटल्या घेतल्या. मिहीरने त्यात पाणी ओतलं. आजीने एका बाटलीत निळ्या शाईचे दहा थेंब टाकले. मग तिने स्वयंपाकघारतून खाण्याच्या रंगांच्या पुड्या आणल्या. मग त्यातलाच लाल, हिरवा आणि पिवळा रंग एकेका बाटलीत टाकला. मिहीरने मोठ्ठा चमचा घेऊन त्या बाटल्यातलं पाणी ढवळलं.
इतक्यात आजोबा हातात चाकू घेऊन आले. आजी समोर उभं राहून हातातला चाकू नाचवू लागले! हे पाहताच आजी म्हणाली, "हे काय? आर यू फूल?' खळखळून हसत आजोबा म्हणाले, "ओह! यू आर माय फूल! अगं माझ्या फुला, या फुलांचे देठ कापायला नकोत का? म्हणून आणलाय हा चाकू!'
"आजोबा तुम्ही फुलांचे डॉक्टर आहात! तुम्हीच कापा त्यांचे देठ,' असं मिहीरने म्हणताच आजोबा कामाला लागले. आजोबांनी फांदीच्या तळाशी दोन सेंमी अंतरावर चाकूने तिरका छेद घेतला. मग मिहीरने प्रत्येक बाटलीत पाच-पाच, सहा-सहा फुले ठेवली. उरलेली फुले त्याने आणखी एका बाटलीत साधं पाणी घेऊन त्यात ठेवली.
आजी आजोबांकडे पाहत म्हणाली, "चला आता. तुम्ही तुमचं काम करा. आणि फुलांना त्यांचं काम करू दे. आता त्यांना कुणी त्रास द्यायचा नाही.' आजोबा काही बोलण्याआधीच मिहीरने विचारलं, "आँ! फुलं काय काम करणार आता?' "अरे आता यांचा रंग बदलणार ना! बाष्पीभवन व केशाकर्षण या दोन तत्त्वांचा वापर करून बाटलीतले रंगीत पाणी गुरुत्वाकर्षणावर मात करून झाडाच्या सर्व भागात पोचेल. आणि ही बाटलीतली पांढरी फुलं रंगीत होतील!'
आजीचं बोलणं पुरं होण्याआधीच मिहीरने विचारलं, "पण मग या बाटलीतलं पाणी संपणार तर नाही ना? आणि एखादं झाड दिवसाला किती पाणी पितं?'
आजोबा हसून म्हणाले, "अरे, ही फुलांची फांदी आहे. ती एकाच वेळी नाही पिणार बाटलीभर पाणी. पण एक मोठे झाड कडक ऊन पडलेल्या दिवशी सुमारे ९०० लिटरपर्यंत पाणी शोषतं.'
"अगं बाई! हे ऐकून आता मलाच तहान लागली!' असं आजीने म्हणताच आजोबा म्हणाले, "हे फुला, तुला कुठलं पाणी हवंय. साधं की रंगीत?'
सगळे जणं खळाळून हसले.
आणि काय चमत्कार... त्याच वेळी बाटलीतली फुले लाजली अन् पांढरी फुले रंगली!