‘माझा अभ्यास झाल्यावर मी खेळू का,’ असं मिहीरने विचारताच आजोबांनी मान डोलावली. आणि नेहमीप्रमाणे पुढच्या पाचच मिनिटात अभ्यास झाला. अभ्यासाचा पसारा बाजूला ढकलून मिहीर आता खेळायला बाहेर पळणार, इतक्यात आजोबा ओरडले, ‘दुपारी उन्हाचं बाहेर जायचं नाही. घरातच खेळायचं.’ मिहीर कुरकुरला, ‘पण घरात कसं काय क्रिकेट खेळणार?’ आजोबांनी प्रश्नाचं उत्तर न देता फक्त डोळे गरगर फिरवले.
मग मिहीरने खेळण्याच्या कपाटातून छोटा पिंगपाँगचा बॉल काढला. हे पाहून आजोबांनी समाधानाने मान हलवली. आजोबा पेपर वाचायला बसणार तोच घरभर टकटक टकाटक टकटक टकाटक आवाज घुमू लागला. या विचित्र एकसुरी आवाजाने आजोबांचे कान किटले. ते वैतागून ओरडले, ‘बंद कर तो आवाज. हा कुठला खेळ?’ ‘याचं नाव भिंत-टेनिस! टेबल टेनिस खेळताना जे
आपण टेबलावर करतो ते इथे भितींवर करायचं. सॉलिड मजा येते. तुम्हाला शिकवू? तुम्हाला पण आवडेल हा टकटक टकाटक खेळ.’
कपाळावर हात मारत आजोबा म्हणाले, ‘अरे मिहीरू, त्या आवाजाने माझं डोकं टकटकलंय! मला सांग त्या टकाटक बॉलला हात न लावता कुठला खेळ खेळता येईल का?’ त्यावर चटकन आजी म्हणाली, ‘आहे की तसा खेळ. त्याचं नाव ‘बाटली टेनिस.’ हे ऐकताच आजोबांचे डोळे मोठे झाले आणि केस ताठ झाले. डोकं खाजवत ते म्हणाले, ‘म्हणजे मग, गादी टेनिस, उशी टेनिस किंवा पांघरूण टेनिस असले प्रकार पण तुम्हाला माहीत असतील की? काय?’
‘तुमच्या अटीत बसणारा आहे हा बाटली टेनिस,’ असं म्हणत आजीने टेबलावर तो पिंगपाँगचा चेंडू ठेवला. त्याच्या बाजूला रुंद तोंडाची बाटली ठेवली. आता आजोबा आणि मिहीर सरसावून बसले. आजी म्हणाली, ‘हं. आता हा पिंगपाँगचा चेंडू या बाटलीत ठेवायचा. पण या चेंडूला अजिबात हात लावायचा नाही. आणि पायसुद्धा! कळलं? आप का समय शुरू होता है अब.’ ‘हॅ! अगदीच पकाव आहे हे बाटली टेनिस! बाटली आडवी करायची आणि नाकाने चेंडू आत ढकलायचा की बस्स!’ यावर आजी म्हणाली, ‘अहं! या चेंडूला शरीराचा कुठलाही भाग लावायचा नाही. कळलं?’ मिशांवर हात फिरवत आजोबा म्हणाले, ‘अगं, तू तुझ्या नव-याला काय समजलीस काय? बाटली आडवी ठेवून नुसत्या मिशा फिरवल्या तरी चेंडू आत जाईल! पण मी तसं करणार नाही. आडवी बाटली मी पकडेन व मिहीर जोरात फूक मारेल. तो फिर हो गया बाटली में टेनिस! हा हा हा.’ आजी वैतागून म्हणाली, ‘अहो फूकसुद्धा मारायची नाही. आणि बाटली आडवीसुद्धा करायची नाही! थांबा मीच दाखवते.’
आजीने त्या पिंगपाँगच्या चेंडूवर बाटली पालथी ठेवली. आणि म्हणाली, ‘हं, आता हा चेंडू या बाटलीत वरवर गेला पाहिजे.’ ‘तुझं हे वरवर बोलणं ऐकून आता माझं डोकं गरगर गरगर फिरू लागलंय,’ असं आजोबांनी म्हणताच मिहीर जोरात ओरडला, ‘आजी, बॉल गरगर फिरवूया.’
मिहीरकडे कौतुकाने पाहत आजी म्हणाली, ‘बरोबर आहे तुझं. पण थोडीशी चूक झाली सांगण्यात. आधी ही बाटली गरगर फिरवूया म्हणजे मग हा चेंडूपण आपोआप गरगरायला लागेल. आणि मग त्यामुळे काय होईल ते करूनच पाहूया.’ चेंडूवर ठेवलेली पालथी बाटली आजीने गोलगोल वेगात गरागरा फिरवायला सुरुवात केली. चेंडू प्रथम बाटलीच्या कडेशी गोल गोल फिरू लागला. आजीने बाटलीचा वेग वाढवला तसा चेंडू वरच्या दिशेने उसळू लागला. आजोबा तर चेंडूला हातवारे करत खुणावू लागले. आजीने बाटली पटकन उचलली. चेंडू बाटलीत गरगरत होता. आजोबा खुश होऊन म्हणाले, ‘कमालच आहे!’ खुसूकुसू हसत आजी म्हणाली, ‘यात कुठली कमाल? बाटलीच्या कडा गोल असल्याने चेंडू गोल फिरू लागतो. त्यामुळं निर्माण झालेलं केंद्रगामी बल चेंडूला गोलातच फिरत ठेवतं आणि बाटलीच्या दिशेने वरवर चढायला उद्युक्त करतं...’ ‘त्याच वेळी बाटली उचलली की आपोआप बाटलीत टेनिस! हो ना आजी?’ मिहीरने विचारलं.
‘सांगा ना आजोबा, आपण काय खेळूया, बाटली टेनिस की भिंत टेनिस?’ तुम्हाला काय वाटतं? आजोबा काय खेळले असतील? आणि का?