आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Tambe Article About Learning Science At Home, Madhurima

जी भरके जियो... पेट भरके पियो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेतून दडादडा धावत यायचं. घरात आल्यावर कॉटवर दप्तर फेकायचं. हातपाय न धुताच स्वयंपाकघरात जायचं. आणि फ्रिज उघडून घटाघटा थंड पाणी प्यायचं. या सा-या गोष्टींचा आजीला प्रचंड राग होता. हज्जार वेळा मिहीरला सांगितलं असेल. पण प्रत्येक वेळी तो म्हणायचा, “आजी फक्त आजचा दिवस. उद्यापासून नाही.’ आणि हा उद्या काही उजाडायचा नाही.
आज आजी नि आजोबा दोघांनी ठरवलं होतं, ‘आज मिहीरचं काही ऐकायचं नाही.’ मिहीर यायच्या वेळेला दोघेजण फील्डिंग लावून बसले. नेहमीप्रमाणे तो आला. वातावरण पाहून
सावध झाला. त्याने सावकाश दप्तर ठेवलं. हातपाय धुतले. आणि आता तो फ्रिजकडे वळणार इतक्यात आजी म्हणाली, “अरे बाळ मिहीर, फ्रिजमधलं हवं तेवढं थंड पाणी ढसाढसा पी, पण आजोबा सांगतील तसंच पी.’ मिहीर आजोबांकडे पाहू लागला.
आजोबा म्हणाले, “हं. नाकाने श्वास घे. श्वास सोड. शाबास. आता लक्षात ठेव जेव्हा तू नाकाने श्वास घेशील तेव्हाच पाणी प्यायचं. नाकाने श्वास घेणं आणि पाणी पिणं या दोन्ही क्रिया एकाच वेळी व्हायला पाहिजेत. चलो. जी भरके जियो, पेट भरके पियो.’
मिहीरने ऐटीत फ्रिज उघडला. थंड पाण्याची बाटली काढली. त्याने जोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. इतक्यात आजोबा म्हणाले, “आं... आं... आं... जरा माझ्यापासून लांब उभा राहून पी पाणी आणि जरा जपून बरं.’
मिहीरने तोंडात गारेगार पाणी घेतलं. मान मागे करून भुवया उंचावून विजयी मुद्रेने आजोबांकडे पाहिलं. मग जोरात खोल श्वास घेत तोंडातलं पाणी गिळण्याचा प्रयत्न केला आणि... घरभर पाण्याचा फवारा उडाला. आजोबा मिशीतल्या मिशीत हसत म्हणाले, “मिहीर, तू पाणी पीत राहा. मी पुसत राहीन.’
मिहीर तणतणत म्हणाला, “आजोबा, तुम्ही मला चिडवू नका हं. मी तुमचं आता अजिबात ऐकणार नाही.’ त्यावर आजोबा म्हणाले, “ठीक आहे. मग तू आता आजी सांगेल तसं पाणी पी, म्हणजे तर झालं?’ मिहीरने नाक पुसत मान हलवली. आजी तयारीतच होती. आजी म्हणाली, “हं. आधी ताठ उभा राहा. तोंडात पाणी घे. मग कमरेतून थोडं पुढे वाकून मान खाली कर. आणि गळगटप्, पाणी पिऊन टाक.’
मिहीर म्हणाला, “हे सोपं आहे. ते श्वास घेऊन गिळताना फवारा उडतोच!’
मिहीरने तोंडात पाणी घेतलं. कमरेतून पुढे वाकून मान खाली केली. आणि आता तोंडातलं पाणी गिळण्याचा तो प्रयत्न करणार तोच त्याच्या तोंडातून पाण्याचं कारंजं उडालं. घरभर पाणी झालं. मिहीरला नवलच वाटलं.
मिहीर वैतागून म्हणाला, “कमालच आहे! आजोबांचं ऐकलं तर फवारा उडतो. आजीचं ऐकलं तर कारंजं उडतं. पाणी काही पोटात जातच नाही. आता मी मला पाहिजे तसंच पाणी पिणार. म्हणजे कारंजं आणि फवारे न उडवता पाणी पिणार.’
आजोबा म्हणाले, “तू पाणी जरूर पी. पण त्याआधी हे फवारे आणि कारंजी का उडतात हे तर समजून घे.’ मिहीरने मान हलवली. आजोबा म्हणाले, “फवारा का उडाला? कारण पाणी गिळता आलं नाही म्हणून. मुख्य म्हणजे श्वास घेणे किंवा गिळणे यापैकी कुठलीतरी एकच क्रिया एका वेळी करता येते.’ आता यावर मिहीर काय प्रश्न विचारणार ते ओळखून आजी म्हणाली, “कारण नाक आणि घसा एका लहान नलिकेने जोडलेले असतात. आणि ही नलिका अशा प्रकारे जोडलेली असते, की श्वास घेणे व गिळणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी करताच येणार नाहीत.’
“कारंज्याचं मी सांगतो. तोंडात पाणी घेऊन कमरेत पुढे वाकल्यावर, तोंडाची पातळी पोटाच्या खाली असल्याने पाणी प्यायला जमत नाही. पण घशाच्या स्नायूंनी थोडासा जोर लावला तर थोडंसं पाणी पिणं जमू शकतं बरं. बरोबर ना?’ असं म्हणून मिहीर डोळे मोठे करून दोघांकडे पाहू लागला.
आजी शाबासकी देत म्हणाली, “एकदम बरोबर. बिलकूल सही!’
आजोबा मिहीरला थोपटत म्हणाले, “हं. आता पी पाणी. पी.’
“नको नको! आता मी श्वास घेतोय!’ असं मिहीरने म्हणताच घरात हास्याची कारंजी उसळली.