आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठं मन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘यश-अपयश’ हा तसा कठीणच विषय आहे. कारण मुलांच्या अपयशात पालकांचा कसा यशस्वी (सिंहाचा) वाटा असतो किंवा स्वत:ला यशस्वी समजणारे पालक त्यांच्या शहाण्या मुलांना स्वत:च्या हट्टाखातर अपयशाच्या घसरगुंडीवर कसे बसवतात, असं जर मी काही सांगायला सुरुवात केली, तर मला काही दिवस वेषांतर करूनच घराबाहेर पडावे लागेल.
आमच्या शाळेतली ही खरीखुरी गोष्ट.
इंग्रजीसाठी शाळेत जादा वर्ग चालतात. त्याच्या परीक्षांचा रिझल्ट लागला होता. (आता पुढे काय घडणार आहे ते सुज्ञ वाचकांनी ओळखलंच असेल.) दोनच दिवसांनी एक पालक तणतणत घरी आले. रागाने फणफणले होते ते. ते काय बोलणार याची कल्पना असल्याने मी इतरच बोलत होतो. पण एका क्षणाला त्यांचा स्फोट झाला आणि ते म्हणाले, ‘तुम्हाला काय वाटलं, मी काय तुमच्याकडे गप्पा मारायला आलोय? आम्ही मुलांना शाळेत कशाला पाठवतो? त्यांची प्रगती व्हावी म्हणून ना? त्यांना जादा वर्गाला का पाठवतो? त्यांनी आणखी शिकावं म्हणून ना? पाहिलीत का आमच्या चिरंजीवांची प्रगती? त्याला 50 पैकी 20 मार्क मिळाले आहेत. आणि त्याचे सर्व मित्र 40च्या पुढे आहेत. मला बाहेर तोंड दाखवायला लाज वाटते. कुणी विचारलं तर काय सांगायचं? तोंडाला काळं फासल्यासारखा मी घरात बसून आहे. आता काय करायचं? सांगा ना? गप्प का तुम्ही?’
‘तुम्ही मला एकाच वेळी खूपच प्रश्न विचारले आहेत. मी तुमच्या शेवटच्या प्रश्नापासून उत्तरं द्यायला सुरुवात करतो.
तर, तुमच्या तोंडाला काळंबिळं काही लागलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण जर तुम्हाला तसं वाटतंच असेल तर तुम्ही गरम पाण्याने साबण लावून तोंड धुवावं. नंतर फेअरनेस क्रीम लावावं, चांगलं असतं.’
ते माझ्यावर खेकसत म्हणाले, ‘मी तुम्हाला गंभीरपणे विचारतो आहे, आणि तुम्ही माझी टिंगल करत आहात?’
मी नम्रपणे म्हणालो, ‘अजिबात नाही. आता हे पाहा, तुम्ही इथे आलात. रस्त्यात तुम्हाला कुणी काही विचारलं का? रागावू नका, पण मला वाटतंय तुमचा स्वत:विषयीच काही गैरसमज झालाय. तो आधी दूर करूया. मग मुलाचं पाहूया.’ हे ऐकल्यावर ते जरा दचकलेच.
जरा घुश्श्यातच त्यांनी विचारलं, ‘कुठला गैरसमज?’
‘तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुलाची प्रगती जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. तर असं काही नाही. आणि तुमच्या मुलाला कमी मार्क मिळाले म्हणजे तुमच्या तोंडाला काळं लागलं असं तर अजिबात नाही. हो ना?’
त्यांनी माझी नजर चुकवत मान हलवली.
‘मुलाला कमी मार्क पडले किंवा त्याला काही अपयश आलं तर अशा वेळी त्याच्यासमोर त्याला जाब विचारायला उभं राहायचं नाही तर त्याच्या सोबत राहायचं. त्याला त्याच्या अपयशातून वर उसळी मारून येण्यासाठी मदत करायची. आपल्या मुलाच्या अपयशात आपणही वाटेकरी असतो याचं भान ठेवायचं. हो ना?’
काहीतरी पुटपुटत त्यांनी मान हलवली.
‘आपल्यालाही खूप वेळा अपयश आलं. आपणही हरलो काही वेळा. पण आपण रडत नाही बसलो. आपण लढलो, धडपडलो आणि इथपर्यंत पोहोचलोच ना? आपण मुलांना हे शिकवायला पाहिजे.
मुलाला कमी मार्क पडले तर त्या मुलावर ओरडून ते मार्क वाढतील असं वाटतंय तुम्हाला? का कमी मार्क पडले ते दोघं मिळून शोधा. यासाठी कुणाची मदत होऊ शकते त्यांना भेटा. काय प्रयत्न करायला पाहिजेत ते ठरवा आणि कामाला लागा.
मुलांवर ओरडून, डाफरून आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवून आपण त्यांना अपयशाच्या खाईत लोटत असतो. त्याची पुढे जाण्याची उमेदच आपण यातून नकळत ठेचून टाकत असतो. एखादं अपयश म्हणजे तो मुलगा पूर्णत: कुचकामी असं नव्हे.
खरं सांगतो, अशा वेळी मुलांना आपल्या आधाराची, आपल्या प्रोत्साहनाची नितांत गरज असते. कारण आपलं काय चुकलं आहे हे त्यांना कळलेलंच असतं. सतत चुका दाखवून प्रश्न सुटत नाही.
मुलांच्या अपयशातला आपला वाटा मान्य करून, त्यांना चुकांतून सुधारण्याची संधी देऊन त्यांनी भरारी घेण्यासाठी आपण त्यांना अवकाश मोकळं करून देत असतो.
प्लीज, मुलाला शिक्षा करू नका. अशा वेळी मुलं प्रेमाची भुकेली असतात.
माझं बोलणं पुरं होण्याआधीच ते डोळे टिपत निघून गेले.
‘मुलाने जर छोटीशी चूक केली तर तुमचं मन खूप मोठं करा. त्याला चुकांतून शिकण्याचं बळ द्या आणि नवीन चूक करण्याची संधी द्या,’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.
मला सांगा, घरात मुलाने चूक केली तर तुम्ही काय करता?
आणि तुमच्या हातून एखादी चूक झाली तर इतरांनी तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं? मला कळवाल?
मी तुमच्या ‘मन-मोठ्या’ पत्रांची वाट पाहतो आहे.