आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजाओ पेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालच बाबा प्रवासाहून आले. त्यांना रेल्वेच्या प्रवासात चहा पिण्यासाठी एक जाड कागदी पेला मिळाला होता. चहा संपल्यावर बाबांनी तो पेला धुऊन पिशवीत ठेवला. तो पेला मिहीरला देत ते म्हणाले, ‘हा काही साधासुधा पेला नाही बरं. हा मोठ्याने गाणारा पेला आहे!’ मिहीरला कळेना, म्हणजे काय? मिहीर म्हणाला, ‘हां समजलं. म्हणजे, मोठ्या माणसांनी गाताना या पेल्यात तोंड घालून गायचं. हो ना?’ हे ऐकताच अचानक तोंडावर पाण्याचा पेला सांडल्यासारखं बाबांचं तोंड झालं. बाबा म्हणाले, ‘मिहिरू, एक सेफ्टीपिन आणि एक दोर्‍याचा तुकडा घेऊन ये बरं. दाखवतो तुला पेल्याचा आवाज.’ मिहीर बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आणायला जाताना म्हणाला, ‘बाबा, दाखवतो नव्हे तर ऐकवतो आवाज असं म्हणा!’ हे ऐकताच आजी व आजोबा खुसूफुसू हसले.
बाबांनी सेफ्टीपिनच्या मदतीने पेल्याच्या मध्यभागी एक छोटंसं भोक पाडलं. सुमारे 40 सें.मी. लांबीचा दोरा कापून घेतला. या दोर्‍याचं एक टोक पेल्यातून ओवून घेतलं. या टोकाला एक मोठी गाठ मारली. या गाठीमुळे हा दोरा आरपार जाणार नाही. बाबा म्हणाले, ‘अब बजाओ पेला.’ आम्हाला कुणालाच काही कळलं नाही. मग बाबांनी एका हातात पेला गच्च धरला. दुसर्‍या हाताने दोरा ताठ ताणलेला ठेवून त्यावरून अंगठ्याचे नख जोरात फिरवायला सुरुवात केली. आणि काय मजा.... पेल्यातून मोठ्याने आवाज येऊ लागला. मिहीर म्हणला, ‘अरे व्वा! पेला गाऊ लागला.’
आता मिहीरने हातात पेला घेतला. मग पेल्याच्या आत हात घालून त्याने दोन बोटात गाठ पकडली आणि दोरा वर खेचला. आता पेला न वापरता त्याने एका हातात दोर्‍याचे एक टोक व दुसर्‍या हातात दुसरे टोक ताणून धरले. ताणलेल्या दोर्‍यावरून नख फिरवले. आम्ही सगळे लक्षपूर्वक पाहत होतो. पण या वेळी आवाज अगदी हळू आला. बाबांनी मिहीरकडे पाहात भुवया उंचावल्या. मिहीर म्हणाला, ‘बरोबरच आहे! त्या पेल्याचा गळा धरला की तो मोठ्याने गातो. त्याला मोकळं सोडलं की त्याचा आवाज आपोआप हळू होतो. हो ना?’

आता आजी पुढे आली. म्हणाली, ‘थांब. उत्तर सांगायची घाई करू नकोस.’ मी तुला आणखी एक गंमत दाखवते. आजीने स्वयंपाकघरातून दोन चमचे आणले. त्यातल्या एका चमच्याला टोकाला सुमारे 20 सेंमी लांबीची नाडी बांधली. आता नाडीचे दुसरे टोक मिहीरने कानाजवळ धरले व चमचा खाली लोंबकळत राहिला. आजीने त्या लोंबकळणार्‍या चमच्यावर दुसर्‍या चमच्याने हलकासा आघात केला. आणि काय चमत्कार... मिहीरच्या कानात एक वेगळाच मोठा आवाज गुंजत राहिला! आता उत्तर सांगायची घाई न करता, मिहीरने आणखी काही प्रयोग करायचं ठरवलं. मग त्याने त्या नाडीच्या टोकाला वेगवेगळ्या आकाराचे चमचे बांधले, लहानमोठी भांडी बांधली आणि त्यांचे भन्नाट विविध आवाज लक्षपूर्वक ऐकले. मग तो म्हणाला, ‘आजी, या नाडीच्या टोकाला कुठला चमचा आहे किंवा कुठलं भांडं बांधलंय, हे आता मी डोळे बंद करूनसुद्धा ओळखू शकेन. कारण प्रत्येक गोष्टीचा आवाज वेगळाच आहे. हो ना?’ मिहीरने प्रयोग करून निरीक्षणाअंती काढलेले हे उत्तर ऐकून आजी खुश झाली.

मिहीरला जवळ घेत ती म्हणाली, ‘अरे मिहिरू, त्या लोंबकळणार्‍या चमच्यावर दुसर्‍या चमच्याने आघात केला की तो चमचा कंप पावतो. मग त्यापासून निर्माण झालेल्या ध्वनिलहरी दोरीतून वाहत कानाजवळ पोहोचतात. आणि कानात तो आवाज वाढतो. आलं का लक्षात?’
मिहीर कुरकुरत म्हणाला, ‘पण आजी त्या पेल्याचा गळा सोडला की आवाज लहान का होतो, हे नाही लक्षात येत. पण जेव्हा बाबांनी पेला हातात धरून व दोरा ताणून त्यावर नख फिरवलं तेव्हा तर मला आजोबांच्या व्हायोलिनचीच आठवण आली. थोडासा तसाच आवाज वाटला तो.’
मिहीरला शाबासकी देत आजोबा म्हणाले, ‘तुला खूपसं उत्तर समजलंच आहे तरीपण नीट सांगतो. नखाने दोर्‍यामध्ये जी कंपनं निर्माण होतात ती दोरीच्या दुसर्‍या टोकाला म्हणजे पेल्यात पोहोचतात. त्यामुळे पेल्यातील हवेची पोकळी कंप पावते. मग त्या ध्वनिलहरी पेल्याच्या आतल्या भिंतीवर पुन्हापुन्हा आपटतात, परावर्तित होतात आणि सर्व लहरी एकत्र होऊन मग आवाज मोठा होतो. या संकल्पनेला ‘अनुनाद’असे म्हणतात. सतार, तंबोरा, एकतारी अशा प्रकारच्या संगीत वाद्यांमधे पोकळी वापरून निर्माण झालेल्या कंपनांचे वर्धन करतात. आता सहजच तुझ्या मनात एक प्रश्न तयार होईल, की ‘असं का करतात?’ हेच समजण्यासाठी तुला तुझ्या माहितीचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपल्या शाळेतल्या घंटेचा आकार हा थोडाफार पेल्यासारखाच असतो. म्हणजेच घंटेचा आवाज पेल्याच्या या विशिष्ट आकारामुळे वर्धित होतो. मग हा वर्धित आवाज मूळ आवाजात मिसळला की मूळ स्वराची प्रत सुधारते.’ आजोबांना पुढे बोलू न देता मिहीर म्हणाला, ‘हं, आता मला कळलं पेल्याचा गळा धरला की त्याला कसा मस्त ‘कंठ फुटतो’ आणि गळा सोडला की त्याचा आवाज का बसतो. उद्याच मी शाळेत हा प्रयोग सगळ्यांना दाखवीन.’
तुम्ही कधी करणार हा प्रयोग? कुठल्या कुठल्या वस्तू बांधणार तुम्ही नाडीला? मला कळवाल?

rajcopper@gmail.com