आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिकले केस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अगं आजी, आज आमच्या शाळेत परदेशी पाहुणे आले होते. त्यातल्या एकांचे केस सुळसुळीत सोनेरी होते. त्यांनी मस्त टोपी घातली होती. आमच्या वर्गात आल्यावर लगेच त्यांनी टोपी काढली. रोहन म्हणाला, ‘केस पिकू नये म्हणून ही माणसं टोपी घालतात. ऊन लागलं की केस तापतात आणि मग पिकतात.’ यावर प्रीती म्हणाली, की ‘कुणाचेच केस कधी सोनेरी नसतत. ते त्यांनी रंगवले असतील. आणि रंगवलेले केस काही पिकत नाहीत.’ आजी असतात ना सोनेरी केस?’ मिहीरचा बोलण्याचा धबधबा थांबवत आजी म्हणाली, ‘अरे, एका वेळी किती

प्रश्न विचारशील? आधी कपडे बदल. हातपाय धू. मग जेवताना यावर गप्पा मारू.’
मिहीरचं बोलणं आजोबा ऐकत होतेच. जेवायला बसल्यावर ते म्हणाले, ‘अरे मिहिरू, नुसते केसच नाही तर डोकं तापलं किंवा डोकं भडकलं तरीसुद्धा केस पिकत नाहीत बरं.’
‘आँ... मग कसे काय पिकतात केस?’
‘अरे, सोनेरी केसांचं काय घेऊन बसला आहेस तू. काहीजणांचे केस सोनेरी असतात इतकंच काय माझी रशियन मैत्रीण मार्थाचे केस तर लालसर आहेत.’
‘हो. जगभरात सर्वांचे केस काही फक्त काळेच नसतात. ते सोनेरी, लालसर, भुरे किंवा फिकट तपकिरीपण असतात.’
‘म... मग ते पिकल्यावर त्यांचे रंगही वेगवेगळे होत असतील. म्हणजे सोनेरी केस पिकल्यावर पिवळसर तर लालसर केस पिकल्यावर चॉकलेटी होत असतील ना आजी?’
‘नाही रे. केसांचा मूळचा रंग कोणताही असो. सर्वांचे केस पिकल्यावर पांढरेच होतात. आणि केस रंगवले किंवा नाही रंगवले तरी वेळ आली की ते पिकतातच.’
‘पण आजी, मला सांग ही केस पिकायची वेळ कधी येते? म्हणजे ही वेळ आता आली आहे, हे आपल्याला समजतं कसं?’
ठो ठो हसत आजोबा म्हणाले, ‘अरे, ‘अहो, तुमची केस पिकायची वेळ आली’ असं कुणी येऊन सांगत नाही. केस पांढरे व्हायला लागले की समजतंच ना रे?’
‘हो... हो पण ते कधी होतात पांढरे? आणि कसे होतात पांढरे?’
‘व्वा! हा चांगला प्रश्न विचारलास.’
‘पण मला वाटतं केस पांढरे का होतात याआधी केसांना त्यांचा रंग कसा मिळतो, हे आधी समजून घे म्हणजे आपोआपच तुला तुझं उत्तर मिळेल.’

‘आजोबा म्हणाले ते खरंय. आपल्या डोक्यावरच्या त्वचेच्या आतल्या भागात छोटे-छोटे कोष असतात. यांना फॉलिकल असं म्हणतात. या कोषांतूनच केसांची वाढ होते. या कोषामधील पेशी मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याची निर्मिती करत असतात. आपल्या कातडीचा रंगसुद्धा या मेलॅनिनच्या प्रमाणावर ठरत असतो. केस वाढत असताना हे मेलॅनिन त्यात मिसळलं जात असतं. आणि त्यामुळेच केसांना रंग मिळत असतो. जोवर या कोषातील पेशी काम करत असतात म्हणजेच केसांना मेलॅनिन पुरवत असतात तोपर्यंत केसांचा रंग टिकून असतो. पण हळूहळू य पेशी थकतात. झिजतात. काही-काही नष्ट पावतात. मग मात्र...’
‘मी सांगतो, मग मात्र, वाढणा-या केसांना होणारा मेलॅनिनचा पुरवठा बंद होतो. त्यामुळे केसांना रंगच मिळत नाही म्हणून ते पांढरे पडतात. हो ना?’
‘शाबास मिहीर! तू बरोबर ओळखलंस.’
‘अं... पण ही वेळ येते कधी? केव्हा? ते सांग ना.’
‘अरे मिहिरू, म्हणजे ‘या वर्षी या दिवशी, झिजणार तुमच्या पेशी’ असं नाही सांगता येत बरं.’
‘पण का?’
‘अरे, केस पांढरे होण्याची पद्धत जरी सगळ्यांची सारखी असली तरी प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळीच असते. त्यामुळे काहींच्या पेशींची झीज लवकर होते तर काहींची उशिरा होते, तर काहींची खूप-खूप उशिरा होते. कळलं?’
‘पण मला सांगा...’
‘आता मला काहीसुद्धा विचारू नकोस, नाही तर माझ्या डोक्यातल्या फॉलिकल कोषातील पेशींची झपाट्याने झीज सुरू होईल.’
खुसुफुसू हसत आजी म्हणाली, ‘मिहीर, खरंय त्यांचं. म्हणून तर रोज दुपारी जेवल्यावर उशीवर डोकं ठेवून...’
‘हो... हो! म्हणून तर अजून माझे केस काळेकुळकुळीत आहेत. म्हणजे जेवढे आहेत तेवढे!’
हे ऐकल्यावर मात्र सगळेच हसले आणि हात धुवायला उठले.
सांगा पाहू ते शेवटचं वाक्य कोण बोललं असेल?
(rajcopper@gmail.com)