आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Tambe's Article About The Skill Of Not To Lost Hankerchief

रंगीत जोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातरुमाल हरवणं हा सगळ्यांचाच सार्वत्रिक अनुभव नाही का? असाच अनुभव मिहीर आिण त्याच्या बाबांचाही आहे. पण आजीनेही या वेळी रुमाल हरवू नयेत म्हणून एक युक्ती केलीय. काय बरं आहे ती युक्ती?

महिन्याला किमान दोन-तीन रुमाल तरी हरवायचेच. त्यामुळे आजोबा म्हणायचे ‘शाळा म्हणजे रुमाल हरवण्याचे ठिकाण.’ मिहीर म्हणायचा, ‘रुमाल हरवण्याचे ठिकाण म्हणजे बाबांचे ऑफिस.’ अशा वेळी आजी काही बोलत नसे. तेव्हा आजोबा म्हणत, ‘पदराला हात पुसणा-यांना कशाला हवाय रुमाल?’

मिहीर आणि बाबा या दोघांचेही रुमाल हरवायचे. आणि दोघांचेही रुमाल सारख्याच रंगाचे असल्याने नक्की कोण रुमाल हरवतं तेच कळत नसे. तसंच सकाळी रुमाल घेताना पण वादावादी व्हायची. बाबांना व मिहीरला रोज दोन रुमाल लागत. बाबांचे रुमाल मोठे आणि मिहीरचे जरासे छोटे. सकाळी रुमाल काढताना पिशवीतून एका मागोमाग जर मिहीरचे रुमाल बाहेर येऊ लागले तर बाबांना वाटे, ‘या रुमालामुळेच मला उशीर होतो.’ आणि मिहीरला वाटे, ‘बाबांनी एक दिवस माझा रुमाल घेतला, तर काय हरकत आहे? म्हणजे मग मला पण बाबांचा रुमाल वापरता येईल की!’ काही वेळा उशीर झाला, की बाबा आणि मिहीर हाताला येतील ते दोन रुमाल, खिशात कोंबून पळत असत. पण ही गंमत फक्त आजीलाच माहीत होती.

या वेळी आईने आयडिया केली. आईने बाबांसाठी मऊशार पांढरेशुभ्र रुमाल आणले. तर मिहीरसाठी सुंदर निळसर आकाशी रंगाचे रुमाल आणले. आणि तेसुद्धा एकाच आकाराचे. आणि भरपूर आणले. पांढरे आठ रुमाल व निळे आठ रुमाल. नेहमीप्रमाणे बाबांना मिहीरचे रुमाल अधिक आवडले तर मिहीरला बाबांचे!

बाबा हसतच म्हणाले, ‘बरं झालं खूप रुमाल आणले ते. आता कधी तरी जर मी एखादा निळसर आकाशी रुमाल घेतला तर... कुणाची अडचण होणार नाही. हो ना मिहीर?’
मिहीरने फक्त गाल फुगवले आणि आजीकडे पाहिलं. आजी काय ते बरोबर समजली.
आजी म्हणाली, ‘चला, मी तुम्हाला रुमालाच्या गणिताचं एक कोडं घालते. या कोड्याचं उत्तर देताना जो चुकेल त्यानं माझं ऐकायचं. कबूल?’
हे ऐकल्यावर सर्वांनी माना डोलावल्या. पण आजोबा चष्मा पुसत म्हणाले, ‘पण आधी मला एक सांग, पण जर मी उत्तर बरोबर दिलं तर?’
आजीने फक्त मान डोलावली. आजीने सगळे रुमाल एका पिशवीत घातले. आता त्या पिशवीत आठ पांढरे रुमाल व आठ आकाशी रुमाल आहेत. आजीने विचारलं, ‘बाबांना आणि मिहीरला एका वेळी दोन रुमाल लागतात. पण त्यांनी दोन वेगवेगळ्या रंगाचे रुमाल अजिबात वापरायचे नाहीत. एका वेळी त्यांनी दोन आकाशी किंवा दोन पांढरे रुमालच वापरायचे. सकाळी या पिशवीतून एका वेळी एकच रुमाल न पाहता बाहेर काढायचा आहे. तर मला सांगा कमीत कमी व जास्तीत जास्ती किती चान्समधे, समान रंगाचे दोन रुमाल आपल्याला मिळतील?’
एक क्षण पण न थांबता आजोबा म्हणाले, ‘सोळा चान्स! बरोबर ना?’
बाबा आणि आई मनातल्या मनात काही तरी आकडेमोड करत होते.
मिहीर भीत भीत म्हणाला, ‘कमीत कमी दोन चान्स!’
आजी म्हणाली, ‘एकदम बरोबर.’
आजोबा मिहीरला चिडवत म्हणाले, ‘हॅ! हे काय, कुणीही सांगेल. पण माझ्यासारखं पटकन उत्तर मात्र मीच सांगू शकतो. कारण...’
आजोबांचं वाक्य पुरं करत आजी म्हणाली, ‘कारण ते चुकलेलं असतं! आणि लक्षात ठेवा, लहान मूल नाउमेद होईल असं काही बोलायचं नाही.’
आजोबांचा चेहरा घुम्म झाला.
आजोबांचा हात धरत मिहीर म्हणाला, ‘चला, आपण करूनच पाहूया.’
मिहीरने हातात पिशवी घेतली. आजोबांनी पिशवीत हात घालून डोळे बंद केले. त्यांनी पहिला पांढरा रुमाल बाहेर काढला. दुस-या वेळी आकाशी रंगाचा रुमाल आला. आणि तिस-या वेळी... जमली जोडी.
आजोबांना धक्काच बसला.
तुम्हाला काय वाटतं? तिसरा रुमाल कुठल्या रंगाचा असेल तरच जोडी जमेल?
मी तुमच्या रंगीत ई-पत्रांची वाट पाहतोय.
rajcopper@gmail.com