आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणिक मोहापायी भरकटलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभर घोकंपट्टी करूनही आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कधीच पडत नव्हते (हल्ली टाकले जातात, शाळा चालाव्यात म्हणून). कुठे तरी चुकायचंच. अगदी चार पर्याय असतानासुद्धा. कारण योग्य पर्यायाची निवड करता येत नव्हती. एखादा प्रश्न आला नाही किंवा चुकीचा लिहिला, याचं वाईट वाटण्यापेक्षा तो चुकल्याने जे दोन मार्क कमी पडले त्यानं मेरिट हुकली किंवा नापास झालो, याचंच जास्त दु:ख असायचं. माणसाच्या आयुष्यात काल घेतलेला निर्णय आज चुकीचा वाटायला लागतो. आपलं कधीच चुकत नाही किंवा आपलंच कसं बरोबर, हा खोटा अहं फक्त मूर्खच बाळगू शकतात. मी तर म्हणतो, दिवसभराच्या दहा निर्णयांपैकी चार-दोन तरी चुकलेले असतात. आयुष्यभराचं गणित तर आणखीच वेगळं. फक्त जास्तीत जास्त निर्णय जर बरोबर असतील तर जगणं थोडं सोपं होतं.

आपलं आणि आपल्या अवतीभवती असलेल्या समाजाचंही. माझ्या एखाद्या चुकीच्या निर्णयानं समाजाचं नुकसान व्हावं, एवढा समाज माझ्यावर अवलंबून नक्कीच नाही. किंवा मीही तेवढा मोठा नाही. माझे बरेच निर्णय चुकले असतील, ते माझ्याच जगण्यावर परिणाम करणारे ठरतात. त्यामुळे माझ्या वागण्या-बोलण्यात झालेल्या बदलाने समाजाला जर त्याची झळ पोहोचली, तर ती गोष्ट निराळी. तर अशाच अगणित चुकलेल्या निर्णयातला एक नमुन्यादाखल निर्णय मी आपल्याशी शेअर करतो. मला नाटकाच्या मुख्य प्रवाहात आणणारे नंदू माधव. तसेच नाटकातून विचार पेरायला सांगणारे शेतकरी नेते लक्ष्मण वडले (तात्या). माझ्या नाटकात शेतकरी आणि ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब विचारांसहित यावे, यासाठी ते मार्गदर्शन करीत. मी बारावी नापास झाल्यानंतर शेतकरी संघटनेत काम करायला लागलो. अर्थात, तात्यांच्या मार्गदर्शनाखाली.

त्या वेळी ते जिल्हाध्यक्ष होते. माझी लेखनाची आवड पाहून त्यांनी मला नाटकातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर लिहायला सांगितले. मीही ते लिहीत गेलो. त्याचंच प्रॉडक्ट म्हणजे माझं ‘काय दिलं स्वातंत्र्यानं’ हे नाटक. नाटकाचे प्रयोग आम्ही पोलिस संरक्षणात सादर करायचो; पण माझं नुसत्या प्रयोगानं समाधान होत नव्हतं. मला ते पुस्तकरूपाने यावं, अशी अपेक्षा होती. त्यासाठी मी चार-दोन प्रकाशकांचे उंबरे झिजवणं सुरू केलं; पण मला त्यांच्याकडून पैशाची मागणी येत होती. शेतकरी संघटनेत काम करणारे आम्ही सगळे भणंग होतो. आणि मला पुस्तकाची थोडी जास्तच आस लागली होती. तात्यांनी मला थोडा धीर धरायला सांगितलं. पण माझं वय धीर धरण्याचं नव्हतं. आम्हाला नाटकाच्या प्रयोगाला पैसे लागत नसत; पण प्रकाशनासाठी पैसे आवश्यक होते. घरूनही ते मिळण्याची काही सोय नव्हती. आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, ती काही पगारी नोकरी नव्हती. माझे सगळे मित्रही माझ्यासारखेच, शेतीमालाला रास्त भाव मागणारे. ‘भीक नको, घेऊ घामाचे दाम’ मागणारे. मागणारे का, तर मिळत नव्हते म्हणून. त्यामुळे खिशात पैसे असण्याचा संबंधच नव्हता. मला तर पुस्तक आणण्याची अति घाई झाली होती. खरं तर नाटककारानं किंवा कलाकारानं नाटकाच्या प्रयोगावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण मला कसली ओढ लागली होती, काही कळत नव्हतं. ती पाच-सहा वर्षे सलग संघटनेत निरपेक्षपणे काम करत होतो. अर्थात, त्या वयात पैशाच्या फार अपेक्षा नसतात. एक काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असते. मी त्यातून मार्ग शोधत होतो. पुस्तक हे त्याचाच भाग असावं कदाचित.

त्यानंतर एका मित्रानं सल्ला दिला, ‘आमच्याकडचे एक राजकारणी आहेत, तू त्यांच्या पक्षात प्रवेश कर. आपण त्यांच्याकडून पुस्तक छापून घेऊ.’ माझ्या डोक्यात ते बसलं. तो पर्याय समोर आल्यानंतर मी रात्रभर झोपलोच नाही आणि ठरवलं, जाऊन तात्यांना सांगायचं की, मी संघटना सोडतोय. त्याची सगळी कारणंही जुळवली. ती सगळी पुस्तकाच्या भोवती फिरणारी होती. दुसर्‍या दिवशी मी तात्यांकडे गेलो. मी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये लहान असल्याने ते मला खूप जीव लावायचे. माझा रोखठोकपणाही त्यांना आवडायचा. चार-पाच वर्षं त्यांनी मला लहान भावासारखं सांभाळलेलं. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, मी शेतकरी संघटना सोडतोय. मग शेतकरी संघटनेत काम करणं कसं कटोरं घेण्यासारखं आहे, तेही सांगितलं. लेकीसारखं मला खुशी खुशी वाटे लावा, असं बोललो.

मग मित्राला घेऊन थेट ‘त्या’ साहेबांच्या बंगल्यावर गेलो. तिथे कळलं की, भेटीसाठी आधी चिठ्ठी पाठवावी लागते. कुणाची भेट घ्यायची आहे, कशासंबंधी वगैरे वगैरे. कागद हातात घेतला. कुणाला भेटायचे तो रकाना सराईतपणे भरला. कोण भेटणार, तेही न लाजता लिहिलं; पण भेटीचे कारण लिहिताना लाज वाटू लागली. तोच मित्र ओरडला, लवकर लिहून काढ... लिहायला पेन घेतला, पण पेनातली शाई संपली होती. परत फिरलो. काही विचार केला. थोडा प्रकाश पडला. प्रकाशनाचा विचार डोक्यातून काढला. पण तात्या... ज्यांनी मला विचार दिला, विश्वास दिला, त्यांना मी एका झटक्यात तोडायला कसा निघालो... हा विचार मात्र सतत बोचत राहिलाय. काल, आज आणि उद्या...