आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील चित्रदृष्टी आणि आठवणींचा 'किल्ला'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांच्या सततच्या बदलीमुळे अविनाश अरुण, त्याची आई, दोघी बहिणी असे सर्व कुटुंबीय दर चार-पाच वर्षांनी एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जायचे. नव्या गावात गेल्यानंतर परिसर, शेजारी, मित्र असे सगळेच नवे असायचे. थोडासा अबोल, पण स्वभावाने बंडखोर असलेल्या अविनाशला नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेळ लागायचा. वडिलांच्या या सततच्या बदलीने अविनाशचे भावविश्व बदलत राहिले. या भावविश्वाच्या धाग्यातून ‘किल्ला’ची कथा जन्माला आली. तिचा संवेदनशील सिनेमा झाला. बर्लिन (जर्मनी), मामी (मुंबई), इफ्फी (गोवा) हे आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवून, या चित्रपटाने दोन मानाचे राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. शुक्रवार, २६ जून रोजी हा किल्ला महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.

दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर म्हणून ‘किल्ला’ हा अविनाशचा पहिलाच चित्रपट आहे. किल्ला ही सातवीत शिकणार्‍या मुलाची कथा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले, आईचीही सततच्या बदलीमुळे घालमेल होतेय. अशा परिस्थितीत त्याच्या मनात उमटणार्‍या भावना, ताणतणाव याचे चित्रण चित्रपटात आहे. अमृता सुभाष, श्रीकांत यादव, पार्थ भालेराव, अर्चित देवधर आदी मुख्य भूमिकेत आहेत.

अविनाश मूळचा सोलापूरचा. त्याचे वडील अरुण ढावरे सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये कामगार. ही मिल बंद पडल्यानंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. बीए. बीएड. पूर्ण करून पनवेलच्या शासकीय डी. एड. कॉलेजमध्ये रुजू झाले. या काळातच अविनाशचा जन्म झाला. १९८१ ते ९१ या काळात ढावरे कुटुंबीय रायगड जिल्ह्यातच होते; मात्र पनवेल, मुरुड-जजिंरा, खोपोली या भागात त्यांची बदली होत राहिली. घराचा परिसर, शेजारी, मित्र बदलत राहिले, तरी कोकणचा निसर्ग, इथला पाऊस नेहमीच त्यांच्यासोबत राहिला. अविनाशचे वडील अरुण ढावरे सांगतात, नव्या शाळेत गेला की, नव्या मित्रांबरोबर जुळवून घ्यायला त्याला जरा वेळ लागायचा. त्याच्या मनात प्रचंड घालमेल सुरू असायची. त्याच्या आईसोबत त्याची याबाबत कुजबुज सुरू असायची. पण, दर वेळच्या नव्या अनुभवातून तो शिकत गेला. कधी पावसात, कधी कोकणातल्या निसर्गात तो स्वत:ला शोधत राहिला... बालपणीच्या आठवणींचे हेच धागे गुंफत अविनाशने किल्ला साकारला आहे.

अविनाश उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे. एफटीआयमध्ये त्याने सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. एफटीआयमध्ये असताना त्याने केलेली ‘मान्सून मूड‌्स’ ही शॉर्टफिल्म आवर्जून पाहायला हवी. नात्यामधली लपवाछपवी त्याला मान्य नाही. एफटीआयआय माझे दुसरे घर आहे, असे तो वारंवार नमूद करतो. म्हणूनच ‘किल्ला’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना, तो एफटीआयआयचे नवनिर्वाचित प्रमुख गजेंद्र चौहान यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी आहे. एफटीआयआयच्या प्रमुखाला किमान जागतिक सिनेमाचे भान असावे, असे त्याचे मत आहे.

पटकावलेले पुरस्कार
- दोन राष्ट्रीय पुरस्कार
- बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘क्रिस्टल बेयर अवॉर्ड’
- मामी चित्रपट महोत्सव ‘सिल्व्हर गेट वे ऑफ इंडिया अवॉर्ड’
- मामी चित्रपट महोत्सव ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’
-(बर्लिन महोत्सवात स्थान मिळालेला किल्ला हा तिसरा मराठी सिनेमा आहे. यापूर्वी ‘सामना’ आणि ‘विहीर’ यांना हा मान मिळाला होता.)

इथे मी पण आहे...
‘किल्ला’च्या आजवरच्या वाटचालीबद्दल अविनाश म्हणाला, हा चित्रपट माझ्या बालपणीच्या आठवणींवर आधारित आहे, असे म्हणायला हरकत नाही. लहान मुलांचे विश्व फार मोठे नसते, पण त्यांच्या भावना आणि कल्पना लहान नसतात. त्याकडे आपण संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे, हे सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आमच्या वडिलांच्या सततच्या बदलीमुळे आमचे कुटुंब या शहरातून त्या शहरात फिरत राहिले. सभोवताल बदलत राहिला. नवे मित्रही मिळाले, पण मागील आठवणींचा गुंता सतत वाढतच गेला. यातूनच मला ‘किल्ला’ची कथा सुचली.
मी माझ्या पद्धतीने ती मांडली आहे. आजवर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. आता मला सर्वसामान्य प्रेक्षकांची मते ऐकून घ्यायची आहेत. त्यांना हा सिनेमा कसा वाटतो, हे पाहायचे आहे.
राकेश कदम
rakeshkkadam@gmail.com
बातम्या आणखी आहेत...