आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुका म्हणे द्रव्य घेती | देती तेही नरका जाती ||

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूरचा विठ्ठल, गरिबांचा देव. प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे यांनी त्याला, ‘एक महासमन्वय’ म्हटले आहे. ते म्हणतात, ‘विठ्ठल हा संतांच्या भावकोशात विष्णुकृष्णरूप मानला गेला असला तरी तो ‘चोविसावेगळा’ आणि ‘सहस्रांआगळा’ आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणजे, विष्णूच्या अवतारगणनेत आणि नामगणनेत विठ्ठलाचा कुठेही समावेश आढळत नाही.’ ढेरे यांनी विठ्ठलाचे अंतरंग उलगडून दाखविताना, तो ‘लोकदेव’ असल्याचे दाखले दिले. त्याचा वैष्णवीकरण ते वैदिकीकरणाचा प्रवासही आपल्यासमोर मांडला. सनातनी मंडळींच्या प्रभावाखाली काही वारकरी मंडळांनी वैदिकीकरणाचा हा कळस उंच उंच नेला. त्यामुळे मंदिरात सोवळ्या-ओवळ्यांचे प्रकार वाढत राहिले. ते दूर करण्याचे प्रयत्नही झाले. त्याला यशही आले. आता आपण सरकारी बडव्यांच्या माध्यमातून त्याच्या ‘तिरुपतीकरणाचा’ प्रवास अनुभवत आहोत. लाडू प्रसाद (१० रुपये), पाद्यपूजा २५०० रुपये (पूर्वी २१००), उटीपूजा १५ हजार रुपये (पूर्वी दोन हजार होते), नित्यपूजेसाठी ५१००० हजार रुपयांची ऐच्छिक देणगी, अशी त्याची अलीकडील उदाहरणे आहेत.

नामदेवांपासून गाडगेबाबांपर्यंतची संतपरंपरा नामस्मरण आणि समानतेच्या कृतिशील कार्यक्रमांमध्ये आपला विठ्ठल शोधते. संत ज्ञानेश्वर किंवा तुकारामांनी विठ्ठल मंदिरात येऊन महापूजा, सहस्र भोजनावळी घातल्याचे ऐकिवात नाही. मंदिर समितीचे यापूर्वीचे कारभारी संतपरंपरेचे पाईक नव्हते. त्यामुळे ते इतर श्रीमंत देवस्थांनाचा कारभार आदर्श मानून तो आपल्याकडे यावा, यासाठी प्रयत्नशील असायचे. सध्याचे कारभारी तोच मार्ग अनुसरत आहेत. नुकत्याच झालेल्या माघवारीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेसाठी ५१ हजार रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. देणगी देणार्‍या भाविकांसोबत दर्शन रांगेतील एका गरीब दांपत्याला पूजेला बसण्याचा मान मिळेल.

रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमात विठ्ठलाच्या नवसफेडीची ‘भारी’ पण कल्पित कथा आपल्यापुढे आली असली तरीही सिद्धिविनायक, तिरुपती, ख्वाजा गरीबनवाज (अजमेर) याप्रमाणे तो नवसाला पावणारा देव नाही.
विठ्ठल मंदिरात अलीकडच्या काळात, छोट्या पातळीवर उत्पन्नवाढीचे वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. चार वर्षांपूर्वी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शनासाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्यामुळे तो रद्द झाला. त्यानंतर मंदिर समितीने मोफत ऑनलाइन दर्शन बुकिंग सुरू केले. ‘लाडू’ हा विठ्ठलाचा प्रसाद नाही, पण तिरुपतीच्या धर्तीवर तो भाविकांच्या हातात ठेवण्यात येतो. यातून मंदिराला लाखो रुपये मिळतात. पाद्यपूजेला पूर्वी २१०० रुपये आणि आता २५०० रुपये आकारले जातात. उन्हाळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीला थंडावा मिळावा, म्हणून चंदन उटीचा लेप दिला जातो. दोन वर्षांपूर्वी दोन हजाराची देणगी देऊन एका भाविकाला ही पूजा करता यायची. आता प्रत्येकी १५ हजार रुपये देणारे पाच भाविक आणि त्यांचे कुटुंबीय या पूजेला हजर राहू शकतात. आता नित्यपूजेसाठी ५१ हजार रुपयांची देणगी आकारण्यात आली आहे. देणगी देणार्‍यांची संख्या वाढली की पूजा करणार्‍यांंचीही गर्दी वाढेल.

विठ्ठलाची उत्सवमूर्तीही तयार आहे. या संदर्भातील वाद संपला की ती बाहेर येईल. या उत्सवमूर्तीची पूजा करण्यासाठी वेगळी देणगी द्यावी लागेल. तिथे आणखी रांग वाढेल आणि गोरगरिबांचा विठ्ठल फक्त पैसेवाल्यांचा होऊन जाईल.
विठ्ठलाच्या पायावर चिमूटभर बुक्का, चार फुले, खडीसाखर वाहून त्याला अालिंगन देणे, ही दर्शनाची पद्धत आहे. आषाढी वारीला पायी येणारा वारकरी पदस्पर्श दर्शनासाठी १२ ते १४ तास दर्शन रांगेत थांबतो. गाभार्‍यात आल्यानंतर अवघ्या एक मिनिटासाठी त्याची आणि विठ्ठलाची भेट होते. नामदेव पायरी, कळसाचे दर्शन घेऊन जाणारे हजारो वारकरी असतात. त्यांना महापूजा, सोवळ्या-ओवळ्यांमध्ये रस नसतो. ज्यांना विठ्ठलाला देणगी द्यायची आहे, असे वारकरी हुंडीत पैसे टाकून जातात किंवा मंदिर समितीकडे रीतसर जमा करतात. अशा देणग्यांमधून मंदिर समितीकडे ५० कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

जमिनी, सोन्याचांदीच्या दागिन्यांचा एकूण हिशेब अब्जावधींच्या घरात आहे. देव गरिबांचा असला तरी देवस्थान बर्‍यापैकी श्रीमंत आहे. बडवे-उत्पातांची मक्तेदारी संपल्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न आणखी वाढल्याचे समितीचे पदाधिकारी छाती फुगवून सांगत आहेत. जाणकारांच्या मते, मंदिर समितीचा प्रशासकीय खर्चही फारसा नाही. मुळात उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. अशा वेळी विठ्ठलाचा लौकिक पणाला लावून पैसे मिळवण्याचा प्रयत्न का होत आहे, हा प्रश्न मंदिर समितीला पडत नसला तरीही, संत तुकारामांनी अशा प्रकारच्या वृत्तीवर ताशेरे ओढताना,
जेेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे।।१।।
बुका लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।२।।
तटावृषभासी दाणा। तृण मागो नये जाणा।।३।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।४।। ३०८४
असे आपल्या अभंगातून कधीच म्हटले आहे.

एक प्रथा मोडली, दुसरी रुजवली!
मंदिरे ही जितकी श्रद्धास्थाने आहेत, तितकीच आर्थिक व्यवहारांचीही प्रमुख केंद्रे आहेत, हे वास्तव उमगलं की, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीच्या ‘५१ हजार रुपयांचं देणगी शुल्क भरा, नित्यपूजेचा मान मिळवा’, या निर्णयाचा अर्थ उलगडतो. एरवी, देवदर्शनाची आस ही एकमेव गोष्ट सर्वसामान्य भाविकांना देवस्थानांकडे खेचून आणते. परंतु या भाविकांमध्ये काही खास भाविकही असतात, ज्यांच्याकडे पैसा, दागदागिने, मौल्यवान वस्तू आदींच्या रूपाने दान करण्याची क्षमता इतरांपेक्षा कैक पटींनी अधिक असते. हेच भाविक दान देऊन विविध मंदिर संस्थानांना झळाळी आणत असतात. रांग मोडून दर्शनाचा लाभही मिळवत असतात. आज एकट्या महाराष्ट्रात मुंबई-प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आदी मंदिर संस्थाने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने श्रीमंत या वर्गात मोडतात. या व्यवहारांतून गरजू आणि रुग्णांना मदतनिधी पुरवत परमार्थही साधला जातो, नाही असे नाही; पण त्या तुलनेत पंढरपूरचा विठ्ठल स्वत:चं म्हणून वेगळं अस्तित्व जपून असतो. तो जितका आध्यात्मिक चळवळींचा केंद्रबिंदू असतो, तितकाच तो सामाजिक चळवळींचंही निमित्त ठरलेला असतो.

युगे अठ्ठावीस उभा विटेवर असा हा विठ्ठल, भक्तांचा भुकेला असतो आणि भाविक विठ्ठलभेटीला आसुसलेले असतात. त्यांच्यातला व्यवहार मुख्यत: श्रद्धा आणि भक्तीच्या पातळीवरचाच असतो. नित्यपूजा हा विठ्ठल मंदिरातला महत्त्वाचा नि मानाचा घटक असतो. गरीब-श्रीमंत, सवर्ण-दलित या भेदाला निदान विठ्ठलाच्या दारी फारसे स्थान नसते. मात्र, यापुढे १९ फेब्रवारीपासून ही दैनंदिन नित्यपूजा भाविकांसाठी खुली होताना ५१ हजार इतके देणगी शुल्क देणार्‍यांना नित्यपूजेचा मान दिला जाणार आहे. हल्ली मॉलमध्ये ‘एकावर एक फ्री’ अशा स्वरूपाची लालूच दाखवण्याचा प्रकार होत असतो. बहुधा अशीच एक ऑफर देत मंदिर संस्थान त्या-त्या दिवशी दर्शन रांगेतील भाविकांपैकी एका भाविक पती-पत्नीला देणगीदारासोबत पूजेचा मान देणार आहे. याचाच अर्थ, एका पातळीवर श्रीमंत भाविकही धन्य होणार आणि प्रातिनिधिक पातळीवर ५१ हजार इतकी देणगी देण्याची क्षमता नसलेला सर्वसामान्य भाविकही तृप्त होणार आहे. वरवर हा निर्णय पुढारलेला, चालत आलेली परपंरा नाकारणारा आणि आर्थिकदृष्ट्या अपरिहार्य (समितीच्या नजरेतून) वाटत असला तरीही विठ्ठलभक्तीला पैशांत तोलण्याची एक नवी प्रथा या निमित्ताने रुजणार आहे. त्यामुळे ही गरज विठ्ठलाची होती, की त्याची व्यवस्था पाहणार्‍या समितीची? हा प्रश्न यापुढे विठ्ठलभक्तांना सतत छळत राहणार आहे.

हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा फरक
मंदिरातील कर्मचार्‍यांचे पगार, नियमित खर्च आणि मंदिराचे उत्पन्न वाढविण्यासाठी नित्यपूजेला ५१ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकांतील ठेवी काढून इतर कामे करायची आहेत. मंदिर समितीच्या निर्णयाकडे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पाहत असतो. हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा फरक आहे. - अण्णा डांगे, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
(संदर्भ : परिशिष्ट- ‘विद्रोही तुकाराम’, लेखक- डॉ. आ. ह. साळुंखे, लोकायत प्रकाशन)
rakeshkkadam@gmail.com