आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakesh Kadam Article On Painting Artist Shashikant Dhotre

रंगसंपन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रं काढून कुठं पैसे मिळतात का? दोन-चार लोक वा-वा म्हणतात, त्यानं पोट भरत नाही. वडा-याच्या पोरानं बापाबरोबर खाणीवरचे दगड फोडायला गेलेलंच बरं. फारच मोठं व्हायचं असेल तर एखाद्या खाणीवर दगड फोडण्याचे कंत्राट मिळवावं. हा पोरगा उगाच नसते धंदे करतोय... अशाच नकारात्मक वातावरणात वडार समाजातील शशिकांत वामन धोत्रे वाढला. जन्माने वडार असल्यामुळे खाणीवर, रस्त्याच्या कामावर दगड फोडण्याचे काम त्याच्याही वाट्याला आले. चित्रपटांमध्ये नायकाचा कष्टप्रद जीवनाचा एक फ्लॅशबॅक असतो. शशिकांतच्या आयुष्याचा खाणीतल्या काळ्या दगडांप्रमाणे एक फ्लॅशबॅक आहे. छिन्नी आणि हातोड्याच्या साहाय्याने वडार दगडाला एक विशिष्ट आकार देतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशाच पद्धतीने दगड फोडणा-या शशिकांतने पेन्सिलच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाच्या जीवनाला आकार दिला... रंगांच्या मदतीने स्वत:चे भाग्य घडवले...
शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) या गावी 1982मध्ये शशिकांतचा जन्म झाला. शशिकांतच्या जन्मावेळी वडील वामन धोत्रे दगड फोडण्याची कंत्राटे घ्यायचे. पण ते व्यसनाच्या आहारी गेले. हातात येणारे चार पैसेही वाया जाऊ लागले. शशिकांतचे बालपण दगडधोंडे फोडणे आणि रानोमाळ भटकून उंदीर, घुुशी पकडून खाणे यातच गेले. आश्चर्य म्हणजे, वडलांच्या खिशात हिशेबाची एक डायरी असायची. या डायरीला चार रंगांच्या रिफिलचा पेन होता. या रिफिलच्या साहाय्याने वडील डायरीमध्ये पाने, फुले, पक्षी यांची चित्रे रेखाटायचे. ही चित्रे शशिकांतच्या चित्रकलेच्या शिक्षणाचा पहिला संस्कार. तेच पेन घेऊन शशिकांतही कागदांवर चित्रे रेखाटून रंगसंगती साधायचा. शाळेतल्या शिक्षणाकडे त्याचे फारसे लक्ष नव्हते; मात्र शाळेतल्या फळ्यांवर, भिंतींवर चित्रे रेखाटणे हा त्याचा छंद होता. शाळेतल्या एका शिक्षकाने घरी येऊन एकदा तक्रारही केली होती. पुढे आठवीत गेल्यानंतर रानोमाळ भटकणे, नदीत मासेमारी करणे असे गावाकडच्या पोरांसारखे छंदही त्याला लागले. ही भटकंती करताना त्याची निसर्गाशी एक अनोखी मैत्री जडली.
शशिकांत आणि त्याचे मित्र ‘टाइमपास’ करण्यासाठी सोलापुराला यायचे. येथील चित्रपटगृहांवर ‘यल्ला-दासी’ बंधूंनी रेखाटलेली मोठमोठी पोस्टर्स असायची. या चित्रांनी त्याच्यावर प्रभाव टाकला. चित्रपटगृहाबाहेर विक्रीला असलेली कलाकारांची पोस्टर्स, वर्तमानपत्रांमध्ये येणा-या चित्रपटांच्या जाहिराती, चित्रे हुबेहूब रेखाटण्याचा प्रयत्नही त्याने केला. चित्रकलेविषयी जिज्ञासा वाढत असताना शाळेकडे मात्र त्याचे साफ दुर्लक्ष झाले. परिणामी, तो दहावीच्या परीक्षेत नापास झाला. इकडे वडलांचे व्यसन वाढत चालले होते. आई काबाडकष्ट करून सहा लेकरांचा सांभाळ करीत होती. शशिकांतलाही आता कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी काम करणे गरजेचे होते. तो पुन्हा रस्त्याच्या कामासाठी दगड फोडणं, ट्रकमध्ये वाळू भरणं आदी कामे करू लागला. निवांत वेळेत चित्रे काढत बसलेला शशिकांत दिसला की लोक टोमणे मारायचे, ‘चित्र काढून पोट भरत नाही, त्याला मोठं व्हायचं असेल तर बापासारखे दगड फोडून एखाद कंत्राट मिळवावं. असले छंद आपल्यासारख्या लोकांना काय कामाचे!’ तरीही शशिकांतची कलेवरची निष्ठा काही कमी झाली नाही. सोलापुरातील विविध मित्रांनी आणि कला शिक्षकांनी त्याला मार्गदर्शन केले. कशीबशी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने हरिभाई देवकरण प्रशालेतून इंटरमिजिएट परीक्षा दिली. बिगारी कामातून मिळालेले अर्धे पैसे तो पेंटिंगचे साहित्य, पुस्तके खरेदीसाठी तर उर्वरित पैसे कुटुंबाच्या चरितार्थासाठी देऊ लागला. या दरम्यान, त्याच्या कलेला एक तांत्रिक अंग येऊ लागले होते. 2002मध्ये पुन्हा काही मित्र आणि कलाशिक्षकांंच्या मदतीने त्याने मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टची प्रवेश परीक्षा दिली. पहिल्या लिस्टमध्ये त्याचे नाव आले. त्याने प्रवेशही घेतला. मुंबईत वर्षभर राहता येईल, एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. शशिकांत मुंबईला गेला म्हटल्यावर कुटुंबाकडे लक्ष देणारे कोणी नव्हते. कुटुंबाची गैरसोय, पैशाची अडचण यावर तोडगा न निघाल्याने तो एका महिन्यानंतर सोलापूरला परतला.
सोलापुरात पुन्हा अंगमेहनतीची कामे सुरू झाली. त्यासोबत छोटी-छोटी पोर्ट्रेट तयार करून विकणेही सुरू झाले. 2003 मध्ये 50 रुपये, 150 रुपये एवढे मानधन घेऊनही त्याने अनेक पोर्ट्रेट्स विकली. थोडे पैसे जमा झाल्यानंतर त्याने 2005मध्ये पुण्यात ‘अ‍ॅनिमेशन’ करण्याचे ठरवले. पुण्यात गेल्यानंतर त्याला नेमके किती पैसे लागतील, याचा अंदाज आला आणि पुन्हा सोलापुराला परतणे एवढाच मार्ग राहिला. शशिकांतची ही धडपड गावातील, परिसरातील अनेक मंडळी पाहात होती. गावचे तत्कालीन सरपंच आणि शशिकांतचे मित्र प्रकाश काळे, नंदकुमार फाटे यांनी त्याला मानसिक आधार दिला. काळे यांनी तालुक्याचे पुढारी विजयराज डोंगरे आणि शशिकांतची भेट घडवून दिली. या मंडळींच्या सहकार्याने शशिकांतने पुण्यात अ‍ॅनिमेशन पूर्ण केले. यानंतर त्याने व्यवसायासाठी मुंबई गाठली.
शशिकांत सांगतो, पुण्यात शिक्षण घेताना मी पेन्सिलने चित्र रेखाटण्यावर लक्ष केंद्रित केले. 2007मध्ये मी सहा महिने ‘चिल्ड्रन्स रुम डेकोरेशन’ करायचो. लहान मुलांच्या रुममध्ये कार्टुन, निसर्गचित्र काढायचो. यातून मिळणा-या पैशांतून राहण्याचा खर्च आणि चित्रकलेचे साहित्य खरेदी करायचो. उर्वरित पैसे गावाकडे पाठवायचो. याच काळात विविध रंगांच्या पेन्सिल हे माझ्या चित्रांचे साधन बनले. 2008मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले. मला आर्ट ऑफ इंडियाचा पुरस्कार मिळाला. माझे एक चित्र 18 हजार रुपयांना विकले गेले.
2009मध्ये बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीचा गर्व्हनर ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांनी माझा आत्मविश्वास आणखी वाढला. 2009नंतर चित्रांची किंमत वाढू लागली. खरं तर 2009 पूर्वी मी काढलेली अनेक चित्रे 50 रुपयापासून 1000 रुपयांपर्यंत विकली गेली. त्या चित्रांची आताची किंमत लाखात आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील सीईओंनी माझ्या काही चित्रांची खरेदी करणे हा माझ्यासाठी एक टर्निंग पाइंट होता. टाटा, रिलायन्स, अ‍ॅटलास या उद्योग समूहातील सीईओंनी आपल्या कलेक्शनमध्ये माझी चित्रे ठेवली. या लोकांना कलेचा अंदाज आणि त्याची किंमत याबद्दल चांगली माहिती असते.
शशिकांत म्हणतो, माझ्यासमोरचा काळ झपाट्याने बदलत गेला. माझा भूतकाळ कठीण होता, वर्तमानात मला त्याची जाणीव आहे. नव्या वर्षात मी एक राज्यस्तरीय आणि एक देशपातळीवरचा ट्रॅव्हल शो करण्याच्या विचारात आहे. एका चित्रपटाच्या कथेवर काम चालू आहे. भविष्यात चित्रपट निर्मितीकडे माझे लक्ष असेलच. त्यासाठी युरोपमध्ये एक जागा घेण्याचा विचारही मी करतोय. काही दिवस टाटा सफारी वापरत होतो. गाड्यांची आवड असल्यामुळे मी ‘बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज-एलडी’ घेतली. आता ऑडी घेण्याच्या विचारात आहे. यातून मला मिरवायचे नाही, समाजाचा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. उपेक्षित वर्गातून पुढे आलेला, हालअपेष्टा सहन केलेला मुलगा चित्रकार होऊ शकतो; अभिजनांचे वर्चस्व असलेल्या कलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवू शकतो. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण आपले जगणे सुंदर करू शकतो, हा संदेश मला त्यातून द्यायचा आहे.