आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारी वारी जन्म-मरणाची वारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पाठी महर्षि येणे आले। साधकाचे सिद्ध झाले। आत्मविद थोरावले। येणेचि पंथे।’ वारीच्या याच मार्गावरून महर्षी आले. साधक सिद्धावस्थेला गेले. हा मार्ग स्वच्छ आहे. शुद्ध आहे. निर्मळ आहे...
संत ज्ञानेश्वरांच्या या शब्दांची प्रचिती पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकालाच येते. मात्र, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा हा संस्कारप्रवाह वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याची तितक्याच प्रौढीने तमा बाळगतो का?
या संस्कार प्रवाहाशी नाते सांगणारे लोक, वारी संपल्यानंतर मागे राहिलेले मलमूत्र वाहून नेणाऱ्या मेहतर समाजातल्या बाया-माणसांची, त्यांच्या व्यथा-वेदनांची दखल घेतात का? किंबहुना, असा एक समाज आधुनिक काळातही मैला उचलून तो वाहून नेत असल्याची बोच सत्ताधीशांना, धोरणकर्त्यांना आणि वारीत सहभागी होणाऱ्या- न होणाऱ्यांना असते का ?

विठुरायाचे पंढरपूर आणि पंढरपुरातली मेहतर कॉलनी... गुजरात कॉलनी अशीही तिची ओळख... या कॉलनीत वस्तीला असलेल्या ७० वर्षीय कमुलती लक्ष्मण गोयल. सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्या सांगतात, पूर्वी चंद्रभागा घाटावर, मठामध्ये ‘टोपली संडास’ असायचे. गावाच्या बाहेर एका ठिकाणी मोठी टाकी असायची. संडासचा डबा भरला की, आम्ही तो डोक्यावर घेऊन त्या टाकीत टाकायचो. आषाढीला अनेकदा पाऊस यायचा. डोक्यावर डबा घेऊन जाताना वाटेत पावसाने गाठले की, सगळी घाण अंगावर पडायची. पाऊस कमी झाला की, वाटेतच एखाद्या ठिकाणी अंग पाण्याने झटकून पुन्हा डबे उचलून टाकीकडे निघावे लागायचे. अनेक वर्षे असेच काम सुरू होते. आपल्या पोरांनी असले काम करू नये, म्हणून त्यांना शिकवले. पण शिकून मोठा झाल्यानंतर तोही हेच काम करतोय...

नुकत्याच झालेल्या चैत्री वारीदरम्यान राजू मेहडा (वय २४) हा कर्मचारी उघड्यावर पसरलेल्या विष्ठेवर औषध फवारणी करीत होता. फवारणी पंपाचे पाते त्याच्या दोन्ही पायांना लागले. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. नगरपालिकेचे अधिकारी त्याला पाहण्यासाठी दवाखान्यात गेले होते, परंतु दवाखान्यात उपचार घेत असतानाही नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याला सुटी मंजूर केली नाही. या दिवसांचा पगार घेण्यासाठी त्याला झगडावे लागले. नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात कशाला गेला? असे बोलणेही त्याला नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून ऐकावे लागले...
जया सुरेश वाघेला. १९८३ पासून पंढरपूर नगरपालिकेत काम करतात. त्या सांगतात, आजही आम्ही डोक्यावरून मैला वाहतो हे खरं आहे. खराट्याने सफाई केल्यानंतर सगळी घाण एकत्र करताना, टोपल्यातच भरावी लागते. ते टोपले डोक्यावर ठेवूनच दुसऱ्या जागेवर टाकावे लागते. सगळी घाण एका जागेला गोळा झाल्यानंतर ती ट्रॉलीत भरून नेली जाते. आता या कामाची सवय झालीय. ज्या हाताने वारकऱ्यांची विष्ठा काढायची, त्याच हाताने घरात जाऊन स्वंयपाक करायचा, जेवण करायचे. पोटासाठी हे सगळे करावे लागते...

मेहतर कॉलनीत गेल्यानंतर असे एका पाठोपाठ एक अंगावर शहारे आणणारे अनुभव कानावर पडतात आणि ते ऐकताना आपल्याला आपलीच लाज वाटू लागते...
१८५५मध्ये पंढरपूर नगरपालिकेची स्थापना झाली. नगरपालिका १८७८ पर्यंत स्थानिक लोकांच्या मदतीने शहरातील, चंद्रभागा घाटावरील स्वच्छतेची कामे करून घेत होती. वारकऱ्यांच्या गर्दीमुळे उघड्यावर मैला पसरत होता. स्वच्छता करायला माणसेही मिळत नव्हती. त्यामुळे नगरपालिकेने चंद्रभागा घाट, तसेच पंढरपुरातील काही भागांत ‘टोपली संडास’ उभारण्याचे काम सुरू केले. टोपल्यांत जमा झालेला मैला उचलायचा कुणी? असा प्रश्न त्या काळीही पडला होता. काही मोजके स्थानिक लोक हे काम करायला तयार होते, पण ते पुरेसे नव्हते. १८८०मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील जवळपास १०० कुटुंबाना पंढरपुरात आणण्याचा निर्णय नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला. गावच्या बाहेर त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्री अशा गर्दीच्या वेळी मेहतर समाजातील महिला, पुरुष हजारो वारकऱ्यांचा जमा झालेला मैला ‘टोपली संडास’मध्ये डोक्यावर वाहून नेण्याचे काम करू लागली. त्या घटनेला १२५ वर्षे उलटून गेली तरीही पंढरपुरात आजही हा अमानवी प्रकार थांबलेला नाही. ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात दबलेल्या या आवाजाकडे सामाजिक संस्थांमुळे लक्ष गेले असले तरी, त्याबद्दलची अनास्था कायम आहे. न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था नसल्याने आम्ही हे काम करून घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले आहे.

पंढरपुरात यात्रा काळातील मैला स्वच्छता, हा प्रश्न खूपच गंभीर आहे. नगरपालिकेकडे सध्या ३५४ कायम स्वच्छता कर्मचारी आहेत. यातील मेहतर समाजाच्या ११५ कर्मचाऱ्यांना ड्रेनेज लाइन, शौचालय स्वच्छतेची कामे देण्यात आली आहेत. आषाढी यात्रेला १० ते १२ लाख, कार्तिकीला ५ ते ६ लाख, माघ व चैत्री एकादशीला २ लाखाहून अधिक भाविकांची पंढरपुरात गर्दी होते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून २ हजार शौचालये उभारली जातात. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी अपुरे पडतात. त्यामुळे नगरपालिका व खासगी संस्था मेहतर समाजातील महिला, पुरुषांना २०० ते २५० रुपयांच्या मानधनावर हंगामी कर्मचारी म्हणून नेमतात. नगरपालिकेबरोबरच वारकरी महाराज मंडळींचे मठ, हॉटेल्स येथील स्वच्छतेचे कामेही मेहतर समाजातील महिला, पुरुष करीत असतात. यात्रा झाल्यानंतर चंद्रभागेच्या पात्रात, शहरातील आणि परिसरातील मोकळ्या जागांवर घाण पसरलेली असते. ही घाण काढण्यासाठी मेहतर समाज बांधव हातात खराटा, डोक्यावर टोपले घेऊन फिरतात. २००९नंतर सामाजिक संस्थांनी या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे जिल्हा प्रशासन, नगरपालिकेने मोकळ्या जागेत जेसीबीद्वारे घाण काढण्याचे काम सुरू केले, परंतु, ज्या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आजही मेहतर समाजबांधव स्वच्छतेची कामे करताना दिसतात. आजही हे लोक तुंबलेली शौचालये हातानेच साफ करतात. तोंडाला मास्क नसतो, हातमोजे किंवा व्हॅक्यूम क्लीनरसारखी यंत्रे नसतात. यंदाच्या वारीला शौचालय स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठे बूट, हातमोजे देण्यात आले आहेत. हे बूट आणि हातमोजे यांचे वजन जास्त असल्याने ते घालून काम करता येणार नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना चांगले बूट, हातमोजे हवे आहेत. नगरपालिका प्रशासन पुढे पाहू, असं म्हणतंय.
अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरू दोडिया सांगतात की, आमच्या समाजातील लोकांना दमा, कॅन्सर यांसारखे आजार सर्रास होतात. ड्रेनेजमध्ये उतरल्यानंतर, सेफ्टी टँक साफ करताना घाणीच्या भपकाऱ्याने अनेकदा श्वास गुदमरतो. घाण वास येऊ नये म्हणून पुरुष दारू पितात, सिगारेट, विडी ओढतात. महिलाही विडी ओढतात. आषाढी, कार्तिकीनंतर सर्वसामान्य माणसे आजारी पडली की त्याची चर्चा होते. यात सफाई कर्मचाऱ्यांच्या आजारपणाची फारशी चर्चा होत नाही.

स्वातंत्र्यानंतर भंग्याची मुलगी राष्ट्रपती होईल, असे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते. पंढरपुरात हे काम करणाऱ्या लोकांचा एक नगरसेवकही निवडून आलेला नाही. आता तर त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्याची तयारी नगरपालिका, राज्य शासनाने सुरू केली आहे.
नगरपालिकेने १९५४मध्ये दीड एकर जागेवर मेहतर समातील कर्मचाऱ्यांना घरे बांधून दिली होती. आजही घरभाड्यापोटी पगारातून १० टक्के कपात केली जाते. पती-पत्नी दोघेही नगरपालिकेत कामाला असतील, तर दोघांच्या पगारातून प्रत्येकी १० टक्के कपात होते. मधल्या काळात अनेकांनी स्वत:च्या पैशातून घरांची डागडुजी केली आहे. याबाबत गुरू दोडिया म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून मेहतर समाजाची २१३ कुटुंबे या जागेत राहात आहेत. नगरपालिकेने या जागेवर श्रमसाफल्य योजनेतून व्यापारी गाळे, सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे बांधून देण्याचा प्रस्ताव केला आहे. नगरपालिका फक्त कायम कर्मचाऱ्यांना घरे बांधून देणार आहे. या निकषात निवृत्त कर्मचारी, हंगामी कर्मचारी आणि पूर्वीपासून येथे राहणारे समाजबांधव बसत नाहीत. त्यांना दुसरी जागा शोधावी लागणार आहे. स्थानिक आमदार भारत भालके, आमदार दीपक साळुंखे आदींनी या जागेतून त्यांना बाहेर काढू नये, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. पण नगरपालिका प्रशासन, राज्य शासनातील काही लोक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य शासनाने पंढरपूरमध्ये अनेक महाराज मंडळी, राजकीय नेत्यांना स्वस्तात जागा दिल्या आहेत. आम्ही तर ५० वर्षांपासून भाडे देऊन येथे राहात आहोत. तरीही आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
rakeshkkadam@gmail.com
बातम्या आणखी आहेत...