आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑमलेट बनविलेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही गोष्ट १९७३ ची! मी त्या वेळी बीएड करण्यासाठी आग्ऱ्याला हॉस्टेलमध्ये राहात होतो. भारतातील अनेक प्रांतातील शिक्षक-विद्यार्थी असल्याने हॉस्टेल म्हणजे ‘भारत दर्शन’च झाले होते. हॉस्टेलमध्ये गरम पाण्याची सोय नसल्याने गार पाण्याने अंघोळ करावी लागे. हिवाळ्यात आम्ही रूममध्ये बादलीत पाणी आणून ते इलेक्ट्रिक रॉडने गरम करायचो. इलेक्ट्रिक शेगडीही वापरायचो. पण आमचे हे बिंग एक दिवस फुटले. हॉस्टेलच्या रेक्टरने सर्व विद्यार्थ्यांना रूमबाहेर काढलं. रूमची झडती घेतली. झडतीत सापडलेल्या इलेक्ट्रिक रॉड आणि शेगड्या जप्त केल्या. हे सुरू असताना माझा शेजारचा मित्र मला म्हणाला, ‘तू आता ऑॅम्लेट कसे तयार करणार? तुला तर दररोज ऑम्लेट लागते ना?’

त्यावर मी लगेच म्हणालो, ‘अरे जाऊ दे! मी ऑम्लेट तयार करणारच!’ पण आमचे हे बोलणे रेक्टरने ऐकले. ते लगेच मला म्हणाले, ‘अरे तू आता कसे ऑम्लेट बनविणार? आणि दाखवच मला बनवून! ते बनविलेस तर मी तुला शंभर रुपये बक्षीस देईन!’

त्याच वेळी माझ्यातील ‘मराठी बाणा’ जागृत झाला. मी ते आव्हान स्वीकारले! रूममध्ये गेलो. दार लावून घेतले आणि पंधरा मिनिटांतच गरम-गरम ऑम्लेटची डिश रेक्टरसमोर धरली. ते पाहून सर्व जण थक्क झाले होते. अगदी रेक्टरही! त्यांनी मला बक्षीस दिले. नंतर ते म्हणाले, ‘तू हे ऑम्लेट कसे तयार केलेस ते तरी सांग.’

मी काही न बोलता रूममध्ये जाऊन एक वस्तू आणली आणि विजयी वीरासारखी त्यांच्या समोर धरली. ती वस्तू होती, इलेक्ट्रिकची इस्त्री!

मी इस्त्रीला कडेने वहीचा जाड पुठ्ठा बांधला. तारेने घट्ट केला. मग इस्त्री गरम झाल्यावर तिच्या मागील सपाट भागावर अंडी फोडून गर टाकला. दोन मिनिटांत ऑम्लेट तयार झाले. मला बक्षीस मिळाले; पण मित्रांनी ते पचू दिले नाही. मला सर्वांना सिनेमा दाखवावा लागला.