आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांभी द गॉडमदर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘वै से भी इन औरतों की ज़िंदगी चूल्हा फूँकने में ही बीत जाती है’’ असं म्हणून सगळी पुरुष मंडळी मोठमोठ्यानं हसतात. तेव्हा दाराआड उभी राहून त्यांचं बोलणं ऐकणा-या विधवा रांभीनं ते आव्हान उचललेलं असतं. रांभी (शबाना आझमी) काठेवाडातल्या मेर जमातीतली एक निरक्षर विधवा. तालुका पंचायतीच्या निवडणुकीला बीरमच्या या विधवेला- मेरूच्या भाभीला म्हणजेच रांभीला उभं करावं म्हणून सुचवलं जातं. मेरू म्हणतो, ‘‘मला उभं राहता आलं असतं तर मी जिंकलो असतो. पण सीट महिलांसाठी राखीव झालेली. भाभी निरक्षर...’’ ‘‘पण तिला करायचंय काय? अंगठाच उठवायचा नं! वैसे भी इन औरतों की ज़िंदगी चूल्हा फूँकने में ही बीत जाती है.’’ दाराआडून रांभी हे ऐकते आणि तिच्या जगण्याचा पोतच बदलतो. देहबोली बदलते, सूर बदलतो. इथून पुढे कथेची सगळी सूत्रं रांभी हातात घेते.
तसा हा बदल आश्चर्य करायला लावणारा म्हणता येणार नाही. तिच्यातल्या शक्यतांची सूक्ष्म चुणूक याआधी मिळालेली आहे. रांभीचं नव-यावर प्रेम आहे. बीरमचाही तिच्यावर अपार विश्वास दिसतो. या अशिक्षित, ग्रामीण, मागास जमातीतल्या दांपत्यामध्ये विलक्षण सुंदर असा सखा भाव आहे. बीरमच्या मृत्यूमुळे ही सच्ची भागीदारी संपते. रांभी एकटी पडते आणि आजूबाजूचं आर्थिक-राजकीय विश्व आपल्या नव-याएवढं सरळ नाही, हे तिच्या लक्षात येतं. तीही सच्ची असली तरी बीरमसारखी भाबडी नाही.


बीरम अपघातानं का होईना, अपराधाच्या मार्गानं राजकारणात आला होता. त्या अपराधाची टोचणी त्याला होती. पण आजूबाजूच्या राजकारणातली कुणीच माणसं अपराधापासून दूर नाहीत. आणि एकदा खेळाचं आव्हान स्वीकारल्यावर रांभीही ती हिंसा स्वीकारते. जशास तसं उत्तर, प्रतिस्पर्ध्याची चाल आधीच ओळखून त्याच्यावर कडी करणं, शांतपणे वागून त्याची गोची करणं आणि दयामाया न दाखवता हिंसा करणं हे सारं ती आत्मसात करत जाते, ते बीरमच्या मृत्यूला कारण ठरलेल्या केसूभाई, तसंच पुढे आपल्याच दिराच्या- मेरूच्या - हिंसक कारवायांना शह द्यायला. ती निवडणूक जिंकते, ती केसूभाईची खेळी म्हणून. पण पंचायतीची अध्यक्ष म्हणून ती केसूभाईच्या ओंजळीनं पाणी पिणं मात्र नाकारते. गावागावात हँडपंप उभे राहिले असले तरी त्यांना पाणी येत नाही, कंत्राटदारानं पैसा हडप केला आहे आणि गावं पाण्यावाचून तडफडत आहेत. कंत्राटदाराचं टेंडर अर्थातच केसूभाईनं पास केलेलं आहे - अशा वेळी ती केसूभाई आणि कंत्राटदार युतीच्या विरोधात दंड ठोकते. पंचायतची अध्यक्ष म्हणून रांभी खरोखरीच लोकप्रिय होऊ लागते. मारिओ पुझोनं ‘गॉडफादर’ या कादंबरीच्या सुरुवातीलाच एक उदाहरण दिलं आहे, ‘बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज अ क्राइम.’ ‘फॉर्च्युन’च्या जागी ‘सत्ता’देखील म्हणता येईल. भाबड्या, पापभीरू बीरमची लढाऊ, कुशाग्र विधवा हा सिद्धांत ओळखते आणि स्वीकारते. आव्हानं पेलणं, हा तिचा हातखंडाच बनतो. मग गाडीचं ड्रायव्हिंग असो, बंदूक चालवणं असो की राजकीय डावपेच खेळणं. ‘बड़ी मजा की खेल है, ये राजनीति’ अशी कॉमेंट करत नवनवी अटीतटीची आव्हानं पेलतच राहते. राजकारणातला पहिला बळी घेताना ती आपल्या लहानग्या मुलावर आपण कोणते संस्कार करत आहोत, याची पर्वा करत नाही. कधीकाळी ज्याला शिकवून सवरून मोठं करायचं स्वप्न तिनं पाहिलं होतं, तो तिचा मुलगा करसन तिचं हे अधिकाधिक पॉवरबाज होत चाललेलं यशस्वी रूप पाहतच मोठा होतो. पाहता पाहता ती केसूभाईला डोईजड होते. लखूचं टेंडर पास करीनाशी होते. त्यांच्याकडून संभवणारा धोका ओळखून लखूला सरळ उडवते आणि लखूला शहाजोगपणे जाहीर श्रद्धांजलीही वाहते. केसू तिच्या दिराला तिच्याविरुद्ध भडकवू पाहतो, तेव्हा ती आपल्या चारित्र्याला धक्का न पोहोचू देता, केसूमार्फतच दिराला दुबईला पाठवून तिला निर्माण होणारा प्रतिस्पर्धी नकळत दूर करते. आता ती मुख्यमंत्रिपदासाठी केसूचीच प्रतिस्पर्धी बनते. लखूच्या हत्येचा आरोप तिच्यावर ठेवून दिल्लीहून नोटीस पाठवली जाईल, अशी व्यवस्था करतो; तर रांभी पार्टीलाच रामराम ठोकून आपली पार्टी स्थापन करते! केसू आता पुन्हा तिच्या दिराला निवडणुकीला उभा राहायला बोलवून घेतो.


आत्मविश्वासाच्या, लोकप्रियतेच्या, यशाच्या शिखरावर असताना रांभीपुढे नवं नाजूक आव्हान उभं राहतं, ते मुलाच्या रूपात. आईच्या नावाच्या जोरावर कॉलेजमध्ये दादागिरी करणारा करसन सेजल या मुलीशी लग्न करू इच्छितो. सत्ताधीश आई ही त्याची इच्छा पुरी करू पाहते; परंतु सेजल ही आपल्या मुलावर नसून दुस-याच मुलावर प्रेम करते आहे, हे कळताच ती मुलाला समजावू पाहते, ‘औरत के साथ जोर जबरदस्ती नहीं करनी चाहिए. जो तू सच्चे दिल से चाहता है तो जोर जबरदस्ती की सोच भी मत.’ पण तो वाढलाय- ‘जो चीज़ सीधी तरह न मिले उसे बंदूक के जोर पर हासिल करो’ असा धडा गिरवतच. तो असदला मारहाण करतो. आणि रांभीमधल्या आईला, स्त्रीला प्रथमच आपल्या चुकीचा साक्षात्कार होतो! करसन-सेजल-असद प्रकरण हा रांभीच्या आयुष्यातला नवा लढा ठरतो. रांभी पोलिसांपासून लपलेल्या करसनकडे जाऊन माफी मागते. मी माझी जबाबदारी नीट पार पाडली नाही; तू परीक्षेला चालला होतास, पण मी तुला हत्येचा पाठ शिकवायला नेलं, असं म्हणते. करसनला आईचं लढाऊ रूप नेहमीच आदर्श वाटत आलंय. तो तिला म्हणतो, ‘‘तू मला जगण्याचा पाठ शिकवलास. ‘कोई र्इंट मारे तो साले को पत्थर मारो।’ तुझ्यामुळे मी ताठ मानेनं जगतो. तू मला फार आवडतेस.’’ करसनचा भावुक क्षण नेमका पकडून ती त्याला ‘माझ्यासाठी तू पोलिसांच्या हवाली हो’, म्हणते आणि स्वत: गाडी ड्राइव्ह करत त्याला पोलिस स्टेशनवर पोहोचवते. राजकारणी रांभी एक लढाई जिंकते आणि केसू-मेरूला आपसूक शह बसतो. तरी ती सेजल-असद लग्न लावून देते तेव्हा पुन्हा सांप्रदायिक दंग्याची आग भडकते. केसू-मेरू त्या आगीत आपली पोळी जाहीर सभेत भाजू पाहतात. ‘रांभीबेन मुर्दाबाद’च्या घोषणा दुमदुमतात. रांभी या सभेत येते, तिचं हे भाषण म्हणजे अर्थातच तिच्या व्यक्तिरेखेला शिखरावर नेऊन ठेवणारा उत्कर्षबिंदू ठरतो. केसू आणि मेरू लोकांच्या धर्मभावनेला आवाहन करतात. तेव्हा ‘आपण आपल्या मुलाचं मन मोडून सेजल आणि असदचं लग्न लावून दिलं. आपण जाती-धर्मापेक्षा मानवजातीला मोठं मानलं’ हे ती जनतेपुढे भाषणाद्वारे सांगते. ते विशुद्ध भावनेचं आवाहन असेल, किंवा कुशल राजकारणी डावपेच - पण ती जिंकते. केसूच्या इशा-यासरशी सुटलेल्या गोळीला बळी पडून शहीद होता होता जिंकते. तिचं शहीद होणं तिच्या विजयाच्या शिरपेचावर आणखी एक पीस खोवतं.


रांभीचं हे भाषण म्हणजे भावनेला आवाहन करून विरोधी वातावरण पूर्ण बदलून टाकणारी नाट्य-क्लृप्ती आहे. शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ नाटकातलं मार्क अँटनीचं भाषण, ‘द ग्रेट डिक्टेटर’मधलं रेडिओवरचं तोतया हुकूमशहाचं (चॅप्लिन) भाषण, ‘आंधी’मधलं आरतीदेवीचं (सुचित्रा सेन) भाषण आणि रांभीचं हे भाषण! सत्तेच्या केंद्रस्थानी रांभी आपल्या सामर्थ्यानिशी पोहोचते आणि आपल्या मातृतत्त्वाच्या, मानवीय बांधिलकीच्या जोरावर ती पुरुष सत्ताधा-याला नामोहरम करते.