आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वेश्‍या मेल्‍यावर एक वेटर जन्‍म घेतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेलच्या धंद्यात मान फक्त दोघांना, एक मालक आणि दुसरा कस्टमर. बाकी, वेटर, वस्ताद, मोरीवालीबाई या सगळ्यांची कॅटेगरी एकच, वाट्याला येणारे भोगही थोड्याफार फरकाने एकच...

हॉटेलमध्ये दुपार पेंगुळली होती. सारं हॉटेल सुस्तावलं होतं. दोन टेबल सोडले, तर एकही टेबल लागलेलं नव्हतं. एक बारमध्ये, तर दुसरं रेस्टॉरंटमध्ये. त्यांचंही मोठं सबुरीनं चाललेलं. एका घंट्यापासून दोघात, एक क्वार्टर संपता संपत नव्हती. स्नॅक्सचीसुद्धा ऑर्डर येत नव्हती. केव्हाचे दोन रोस्टेड पापड, पुदीना चटणीत बुडवून तोडत बसले होते. बारमधला कस्टमर तर क्वार्टर उरपाठी करून बुडाशी असलेले थेंब झाकणात जमा होण्याची वाट पाहत होता. तळाचा शेवटचा थेंबही त्याला सोडायचा नव्हता. काय तर म्हणे, शेवटच्या थेंबानं जास्त नशा चढते. दोन्ही टेबलवर प्रकाश सातपुते नावाचा वेटर सर्व्हिस देत होता. तो सकाळच्या ब्रेक ड्युटीत यायचा. असे भुक्कड टेबल लागल्यावर सातपुते केव्हा ते कस्टमर उठतात याचीच वाट बघायचा. भुक्कड हा त्याचाच शब्द! ‘आज मस्त टिप मिळाली नाही का?’ असे त्याला कोणी विचारल्यावर ‘कशाची टिप? सगळे ‘बुक्कड’ टेबल लागले होते आज!’ हे त्याचं ठरलेलं उत्तर असायचं.

मी आटा लावून फॅमिली सेक्शनजवळच्या वर जाणाऱ्या जिन्यावर बसलो होतो. संजूशेठ येऊन गेले होते. ते आता संध्याकाळशिवाय येणार नव्हते. गणपतीचे दिवस असल्यामुळे रात्री आठलाच हॉटेल बंद व्हायचं. त्यामुळं रात्री आम्ही गणपती बघायला किंवा फिरायला जायचो. एरवी, संध्याकाळी कधीच हॉटेलमधील कोणालाही बाहेर फिरायला जाता येत नव्हतं. संध्याकाळी शहरातली माणसं बायकामुलांसह बाहेर पडायची; आणि आम्ही कोंडवाड्यात गुंतल्यासारखं गुपचूप टेबलवर सर्व्हिस द्यायचो. एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास वा सुट्टी काढली, तर त्या दिवसाचा पगारही कापला जायचा, आणि जेवणही मिळायचं नाही. तेव्हा सुट्टी मारताना अगोदर जेवणाची सोय लावावी लागायची. नसता बऱ्याचदा उपाशी झोपण्याचे अनुभव गाठीशी होतेच! अर्थात, वेटरवर ही वेळ सहसा येत नव्हती. रोज मिळणाऱ्या टिपमधून आणि जमा होणाऱ्या बिअरच्या झाकणांवर बिअर कंपन्या प्रत्येकी एक रुपया द्यायच्या. महिना-दोन महिन्यात पुष्कळ झाकणं जमा व्हायची. काही कंपन्या भिंतीवरील घड्याळ, ट्रे, काचेचा ग्लास सेट, स्पून, कप सेट आणि रिस्ट वॉच अशा भेटवस्तूही द्यायच्या. त्यामुळं वेटर ज्या बिअरवर भेटवस्तू आणि झाकणांवर जास्त पैसे मिळतात, त्याच बिअर विकायचे. एकदा लक्ष्मणनं ‘किंग फिशर’ असूनही कस्टमरला नाही म्हणून सांगितल्यानं ते कस्टमर काऊन्टरवर गेलं, आणि नेमके त्यावेळेस तिथं शशीशेठ व सबनीस असल्यानं त्यानं कस्टमरला ‘किंग फिशर’ बिअर काढून दिली, झालं. लक्ष्मणला शशीशेठचा ओरडा तर खावा लागलाच, शिवाय कस्टमरनं टिपही दिली नाही.
...तर मी आणि सातपुते गप्पा मारत होतो. तेवढ्यात ठाकूर वस्तादनं आवाज दिला. सातपुते टेबलकडं गेला, मीही किचनमध्ये पळालो. संध्याकाळची गैरसोय होऊ नये, म्हणून कांदा कापत बसलो.

अंबादास काऊन्टरवर सबनीससोबत वाइनचा स्टॉक घेत होता. दोन्ही टेबल उठून गेले होते. एक हेल्पर बारमधील खुर्च्यांच्या गाद्या, खोळा नीट करत होता, तर दुसरा बेसिन धूत होता. संध्याकाळ झाल्यानं आता टेबल लागतील म्हणून सातपुते, लक्ष्मण टेबलवर ग्लास व पाण्याचे जग भरून ठेवत होते. त्यांना मदत म्हणून मीदेखील बाहेर आलेल्या खुर्च्या टेबल समोर सरकवू लागलो. तेव्हा सातपुते माझ्याजवळ येत म्हणाला
‘तू या हॉटेल लाइनमध्ये यायला नको होतं यार.’
‘.........’ मी काहीच बोललो नाही.
क्षणभर वाटलं मला येथून हुसकावून लावण्यासाठी हा असं म्हणत असेल, कारण हॉटेलमध्ये दुसऱ्या वेटरला फूस लावून कसे पळवता येईल? याचाच प्रत्येक वेटरचा खटाटोप असतो. तो गेल्यावर काही दिवस का होईना, त्याचे टेबल करायला मिळतात. वरून टिपसुद्धा. येणारा कस्टमर माझ्याच टेबलवर बसावा, असंच हरेक वेटरला वाटतं. काही जण तर बिल फोल्डरमध्ये किंवा बडीशेपच्या वाटीत कस्टमरनं टिप न ठेवल्यास माघारी त्यांना शिव्याही देत. हे सगळं पाहताना मी सारखा विचार करायचो, असं कसं वागू शकतात हे वेटर? एखाद्या कस्टमरनं नाही दिली टिप म्हणून इतक्या खालची पातळी गाठावी वेटरनं? उद्या मीदेखील वेटर झालो, तर मलाही अशाच सवयी लागणार नाहीत कशावरून? मला जरी टिपचा तिरस्कार असला; पण कोणी सांगावं पैसे पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं तर...? टिपचे पैसे जमा झाल्यावर मलाही दारूची सवय लागेल. गावाकडून कोणी पाहुणे, मित्र मंडळी आल्यास मला काय म्हणतील? अशा असंख्य प्रश्नांनी अंगावर काटा उभा राहिला. मग वाटलं सातपुते म्हणतो, तेच खरं आहे. ‘हॉटेल लाइन में नब्बे बरबाद और दस ही कामयाब है!’ तेवढ्यात पाच-सहा कस्टमर आत आले. अंबादासही त्याचे टेबल बघायला आला. तो मला नेहमी सांगायचा, ‘हॉटेलच्या तळात जाऊ नको. बाहेर पडणं मुश्किल होईल. ही ग्रेव्ही आणि टिप वेटरला हॉटेल सोडूच देत नाही. एकदा चटक लागली की, संपलं. आपण सतत एखाद्या वेश्यासारखं कस्टमरची वाट पाहत बसतो.’ अंबादासच्या बोलण्यावर मी सतत विचार करायचो...

फॅमिली सेक्शनमध्ये एक कस्टमर दोन लेडीजला सोबत घेऊन मॅकडॉवेल विस्की पित बसला होता. मी पहिल्यांदाच स्त्रीला पुरूषासोबत असं दारू पिताना पाहत होतो. ते पाहून मी सातपुतेला विचारलं, तर म्हणाला
‘रांडा, लेके बैठा साला!’
‘काय...? शेठ कसं काय बसू देतात, त्यांना?’
‘शेठला काय घेणं देणं त्याचं? त्याला त्याचा धंदा झाला बस ना.’
फॅमिली सेक्शनमधलं कस्टमर अजून उठलं नव्हतं. सातपुते सारा राग ओकत होता. ‘हॉटेलची जिंदगीच मोठी खराब आहे, साली. इथं वेटरची काही किंमतच नाही. जो येतो, तो मारून जातो. एकीकडं शेठच्या शिव्या खाव्यात, तर दुसरीकडं कस्टमरच्या बोलण्याचा आहेर, जणू पाचवीलाच पुजलेला! सोडावी म्हणतो, तरी सुटत नाही ही नोकरी! बऱ्याचदा मनात ठरवलं की, थुंकणार नाही, पुन्हा या नोकरीवर. माती काम करून पोट भरीन. परत इकडं येऊन, या शेठचं, कस्टमरचं थोबाडंसुद्धा पाहणार नाही. पण नाही ना जमत. मी जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो, तितका या ग्रेव्ही अन् टिपमुळे पुन्हा इथं ओढला जातो. जिभेला चवीची चटक लागली अन् खिशाला खुळखुळ वाजण्याची! मग कस्टमर काहीही बोलले, तरी खाली मान घालून बेशरमासारखं ऐकून घ्यावं. टेबल सजवावेत. एखादी वेश्या कस्टमरची जशी वाट पाहते अगदी तसं टेबल लागण्याची वाट पाहावी. वेश्या मालीश करून शरीर देते, पण इज्जतीनं धंदा करते. बसणारे कस्टमर तिचं बोलणे ऐकून घेतात. इथं आम्ही कस्टमरचे बोलणं ऐकून घेतो. उलट त्यांच्याच पुढं पुढं करावं लागतं. ‘साहब और कुछ लावू?’ एखादा चांगला असला, तर ठीक नाही तर तो माय बहिणी उधडायला कमी करत नाही.’ सातपुते बोलत होता. तोच काय हॉटेलमधील प्रत्येकजण म्हणायचा ‘हॉटेल कितीही स्टॅण्डर्ड असू देत; पण शेवटी ते हॉटेलच! ‘हॉटेल’ या नावाभोवतीच लोक विचार करायचे. टेबल उठल्यावर सातपुतेला म्हणालो,
‘अरे, का इतका राग काढतो हॉटेलवर?’
‘तू अभी नया है। तुझे पता नही ये लाइन क्या है?’
‘म्हणून काय झालं?’
‘आत्ता त्या कस्टमरसोबत त्या दोन वेश्या गेल्यात ना, त्यांच्यापेक्षा बेहत्तर जिंदगी आहे आपली! पता नही कोनसा पाप किया था, वेटरने?’
‘तू स्वतःला किंवा मला त्या बाईच्या सोबत का जोडतो? ती वेश्या झाली, यामागं सुद्धा काही कारण असेल ना!’
तेवढ्यात अंबादास तिथं आला, आणि माझ्या पोटाला चिमटा काढत म्हणाला, ‘ए गांधी मत बन। तो जे सांगतो तेच खरं आहे.
तुला माहीत आहे का? ही हॉटेलची ड्युटी रंडीसारखी असती. ‘दहा वेश्या मेल्यावर एक वेटर जन्म घेतो आणि शंभर वेश्या मेल्यावर एक कॅप्टन जन्म घेतो...!’ इतक्या हिनतेनं वागवलं नि बघितलं जातं आपल्याला.

अंबादास, सातपुते यांनी वेटरचा संबंध वेश्यांच्या जगण्याशी का लावला? याचा मला नेहमीच प्रश्न पडायचा. काही वर्षांनी त्यांचं म्हणणं पटू लागलं. ते सगळे आपापल्या अनुभवातून बोलायचे. मीही हळूहळू कस्टमरची ऑर्डर घ्यायला शिकलो. नाही कळाल्यास किशोर मुळे, अंबादास गाडेकर यांना विचारायचो. ऑर्डर घेतेवेळी त्यांचं बोलणं आठवायचं. हॉटेल बंद झाल्यावरही मला मध्यरात्रीपर्यंत टेबल करावे लागायचे. जे कस्टमर सांगेल, तेच वेटरला ऐकावं लागायचं. वेश्या कस्टमरला ऐकण्यास भाग पाडतात. बोटावर नाचवतात. कधी कधी मी, लक्ष्मण, सातपुते सोबत दुसऱ्या हॉटेलमध्ये तिथल्या वेटरला भेटायला जायचो. तिथला प्रत्येकजण स्वतःच्या नोकरीबाबत नाखूश असायचा. जो तो स्वतःचं जगणं वेश्यासारखं नाही, तर त्याही पलीकडचं असल्याचं सांगायचा. वस्ताद, मॅनेजर यांच्या तोंडूनही मला हेच ऐकायला मिळायचं. ‘दहा वेश्या मेल्यावर एक वेटर जन्म घेतो!’ त्यामुळं मनात सारखा विचार यायचा ‘कशाला या हॉटेल लाइनमध्ये आलो. नुसती दलदल आहे इथं! जितका यातून पाय वर काढावा तितका गाळात फसत जातो...

- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...