आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज्जतीचा पंचनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेल म्हणजे चंगळ करण्याची जागा. इथे लोक येतात, पैसे फेकतात, खातात-पितात, एेटीत निघून जातात. पण या विश्वात ‘हेल्पर’ नावाचा जो माणूस असतो त्याला ना हॉटेलवाले किंमत देतात, ना गिऱ्हाईक इज्जत देतात. चहुबाजूंनी होणारा अपमान आणि अवहेलना हेच त्याचं प्राक्तन असतं...
 
औरंगाबादला येऊन आठवडा उलटला होता. तिकडं दाजीनं अजूनही घरी सांगितलं नव्हतं. त्यांच्यापुढं मोठा पेच निर्माण झाला होता, सांगू त कसं सांगू? आधी, तुम्ही पोराला कसं जाऊ दिलं? त्याला काही कळत नाही, पण तुम्हाला तर कळतं ना... या विचारानं दाजीचं डोकं फुटायची वेळ आली होती. बरं, मी औरंगाबादला आल्यावर दुसऱ्याच दिवशी घरी पत्र टाकलं होतं. मात्र, त्या पत्रानं सगळं घर काळजीत पडलं. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या आक्काजवळ बय (आई) सारखी रडायची. म्हणायची, ‘काव्हूण पोरगं सोडून गेलं असंल बाई पाहुण्याला? दोघांचं काही झालं असंल का?’ आक्का फक्त ऐकून घ्यायची. तिला माझी काळजी तर होतीच, पण तापट स्वभावाच्या नवऱ्याचीही चिंता होती. मायलेकी एकमेकींच्या कानात बोलायच्या...
 
‘आता पाहुण्याला राग आला असंल बाई.’
‘येऊ दे.’
‘ले बोलंल आता पाहुणा.’
‘बाये तू शांत बैस बरं. मव्हं डोकं नको उठवू पहाय.’
‘मंगला मला कळत नाही का? अव्हं आगीत उभा करंल तुला पाहुणा.’
‘उभा करंल ना... आत्ता लगेच तर नाही केलं ना...?’
‘अगं पण...’
‘बघू पुढच्या पुढं काय व्हतं ते!’
बयला माझ्यासोबत आक्काच्याही संसाराची काळजी होती. ती माझ्या आठवणीनं रडायची. तिचंही बरोबर होतं. मी आत्तापर्यंत कधीच एकटा घर सोडून कुठं गेलो नव्हतो. शाळेत असताना सहलीलासुद्धा पाठवायची नाही. ते सगळं आठवून बय म्हणायची, ‘अजून पोराला कुठं पाठवलं नाही. एवढ्या मोठ्या शहरात कुठं असंल, कुठं नाही? काय खात-पित असंल कुणास ठाव? संतोषी माता मह्या लेकरावर नजर ठेव गं बाई. तूच आहेस आता त्याच्या पाठीशी.’ 
मी हॉटेलमध्ये नोकरी करतोय, हे बापाला बिलकूल पटलं नव्हतं. चारचौघात कोणी विचारलं, तर काय सांगू? हा प्रश्न बापाला सतवायचा. म्हणायचा, ‘हॉटेलमधी काम करण्यापेक्षा पोरानं घरचे ढोरं वळले तरी चालतील मला, पण हॉटेल नको. पोरं बिघडतात तिथं. नको ते धंदे सुचतात. लोकं नावं ठेवतात, आणि आपल्या लोकांचं कामच नाही ते.’ बाप मनातल्या मनात जळत होता. माझ्या नोकरीचं हे त्याला कोणाजवळ बोलताही येत नव्हतं. घरात आतापर्यंत कोणीच हॉटेलमध्ये काम केलं नव्हतं. मीच ती शेंडी फोडल्यानं बापासाठी तो मोठा अपमान होता. पण मला त्याची फिकीर नव्हती. माहोऱ्याला शाळेत जाताना एखाद्या दिवशी पालवात भाकरी बांधून न्यायला विसरलो, तर शाळेजवळ असलेल्या हॉटेलमध्ये भजे खायचीसुद्धा मला भीती वाटायची, कारण गावातलं कोणी न् कोणी माहोऱ्याला असायचंच. अशा वेळेला कोणी भजे खाताना पाहिल्यावर ‘कारे शिकायला येतो की भजे खायला?’ विचारेल, याची सतत मनात धास्ती वाटायची. एखादं पोरगं कुठं दिसल्यावर गावातला माणूस त्याला टोकायचा. कोणाचं पोरगं आहे? हे अगदी नावानिशी ओळखायचा. वरच्या आळीतलं, खालच्या आळीतलं, पारापुढचं, गोठणावरचं, भिल वाड्यातलं की पिराजवळचं, असं सगळं सगळं कळायचं. इथं शहरात मात्र आळीबिळी काहीच नव्हती. सगळ्या कशा कॉलन्या, नगरं, सोसायट्या आणि चौक. हे सिमेंटचं एवढं मोठं शहर पाहिल्यावर मला इथं लोकं संडासला कुठं जात असतील आणि एवढी मोठी जागा कुठं असंल? असा खुळ्यागत प्रश्न पडला होता. पण हळूहळू शहर ओळखीचं झालं. मीही रुळत गेलो.
अनिलशेठनं हॉटेलच्या एका शटरमध्ये माझी राहण्याची सोय केली होती. वर घर खाली हॉटेल. त्यामुळे काम पडल्यावर हॉटेलमधून वेटर, वस्ताद मला केव्हाही बोलवायचा. माझी ड्युुटी असो वा नसो. ‘अभिरुची’मध्ये सुरुवातीला मला तीनशे रुपये पगार आणि दोन वेळचं जेवण मिळायचं. सकाळी अकरा वाजता हॉटेल उघडायचं. हेल्परची आणि माझी साडेदहाला ड्युुटी सुरू व्हायची. अर्ध्या तासात हेल्पर सर्व टेबल क्लीन करून ग्लास टेबलवर ठेवायचे. अकरानंतर केव्हा टेबल लागेल, याचा नेम नसायचा. काही कस्टमर तर साडेदहालाच यायचे. एक कॉटर मारून निघून जायचे, परत एक तासानं यायचे. काही काऊन्टरवर उभ्याउभ्याच एखादा पेग मारायचे.
मात्र, सकाळी मोरीवरचा भांड्यांचा ढीग पाहिल्यावर अंगावर काटा यायचा. मनात कितीही नसलं तरी काम करणं भाग असायचं. भांडी धुताना सगळं खरकटं काढताना सपाटून भूक लागायची, पण इथं कोणाला सांगणार? सांगूनही फायदा नव्हता. हॉटेलच्या नियमानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत कोणालाही जेवण मिळायचं नाही. अशा वेळी मला सतत घरची आठवण यायची. घरी तीन वाजेपर्यंत चक्क दोन वेळचं जेवण झालेलं असायचं. पण इथं तोपर्यंत सकाळाचा नाष्टादेखील मिळत नव्हता. वेटर मिळणाऱ्या टिप्समधून बाहेर चहानाष्टा करून यायचे. हेल्परला कोणतीच टिप मिळत नव्हती. हवी तेव्हा मदत करूनही कोणताही वेटर हेल्परला दहा-पाच रुपयेसुद्धा द्यायचा नाही. दुपारी तीनपर्यंत धीर धरवत नसल्यामुळं मग काही हेल्पर आदल्या रात्री भाजी आणि रोट्या लपवून ठेवायचे. सकाळच्या ड्युटीत साफसफाई करताना गुपचूप खाऊन घ्यायचे. कधी तर तंदूरच्या ओट्यावरच्या रात्रभर उघड्या पडलेल्या कडक, जळालेल्या रोट्या आणि मिरचीची भुकटी तेल टाकून खायचे. एकदा मी त्यांना चोरून खाताना पाहिलं. त्यांना वाटलं, मी आता वस्तादला सांगणार, म्हणून बिचारे माझ्याजवळ गयावया करू लागले. म्हणाले, ‘शेटला, वस्तादला सांगू नको. नाही तर आम्हाला नोकरीवरून काढून टाकतील.’ मला त्यांची खूप दया यायची. मनात विचार यायचा, सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या हॉटेलमध्ये कित्येक कस्टमर येतात, आणि हजारो रुपये दारूसाठी खर्च करतात. पिताना हवं ते स्नॅक्स ऑर्डर करतात. अगदी व्हेजिटेरियनपासून नॉनव्हेजपर्यंत. आणि दुसरीकडं पोटाची भूक भागवण्यासाठी कित्येक गरीब मुलं हॉटेलमध्ये काम करतात. कुटुंबाला मदत करतात. फार फार तर तीनशेच्यावर पगार नसतो त्यांना. पण हीच मुलं भूक लागते म्हणून चोरून खातात. हे सगळं पाहताना माझं मन जड व्हायचं. एखाद्या वेळी वस्ताद किचनमध्ये नसल्यावर हेल्परला बोलवून मी त्याच्या हातात चारपाच रोट्या द्यायचो. तोही चटकन कोणी यायच्या आत रोट्या लपवायचा.
 
एक दिवस हॉटेल जवळजवळ रिकामं झालं होतं. सुनील वस्ताद स्टाफसाठी भाजी बनवत होता. किशोर वस्तादकडून दुसऱ्या दिवसाची मंडी लिहीत होता. लिहितालिहिता त्यानं फ्रिज उघडला. ‘अरे वस्ताद, आज चिकन कितने गये? कल तो बीस चिकन लाये थे ना। और आज कहाँ हंडी की इतनी ऑर्डर थी? ए सुन्या, चेक कर सब। और बता मुझे। वस्ताद, वो तंदूर चिकन का क्या हुआ? कस्टमर को नही शशी शेठ को चाहिए।’ बोलत बोलत तो काऊन्टरकडं निघून गेला. सगळा स्टाफ जेवत होता. नॉनव्हेज हॉटेल असल्यानं इथं खायची चंगळ असणार, पण माझा हा समज खोटा ठरला. स्टाफसाठी वेगळं जेवण बनवत. ढुळूक पाण्यावानी भाजी करत. इच्छा असो नसो, ते खावं लागे. वस्ताद स्वतःसाठी वेगळी भाजी बनवी. त्यात किशोरचा वाटा असायचा. टेबलवरील उरलेली हंडी वेटर खात. कोणताही वेटर नॉनव्हेजची ऑर्डर घेताना, फुल हंडीवर जास्त जोर द्यायचा. कारण मग हंडीत उरलेली ग्रेव्ही वेटरना आपापसात वाटून खाता यायची. हेल्परला मात्र ते यातला एकही कण देत नसत. त्यामुळे हेल्पर हंडी लपवून ठेवत. अशानं कित्येकदा वेटर, हेल्परमध्ये भांडणं होत. खरं तर हेल्परचं म्हणणं बरोबर असायचं. खरकट्या प्लेट्स, ग्लास आणि टेबल हेल्परनं साफ करायचा. त्या मोबदल्यात त्यांना वेटर ग्रेव्हीही द्यायचे नाहीत.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, तशी हॉटेलातल्या हेल्परची कायमच अाबाळ व्हायची. त्याच्या नशिबी कायम उरलंसुरलं यायचं, त्याच्या इभ्रतीचा कायम पंचनामा व्हायचा...
 
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...