Home | Magazine | Rasik | Ramesh Ravalkar Writes About Hotel work

मानसा मानसा कधी व्‍हशील मानूस...

रमेश रावळकर | Update - Oct 08, 2017, 12:05 AM IST

मी हॉटेलमध्ये काय काम करतो? तिथं काय काय मिळतं? चना फ्राय, ग्रीन पीस फ्राय, व्हेज मंच्युरियन, पकोडा, कंटकी, तंदूर चिकन,

 • Ramesh Ravalkar Writes About Hotel work
  मी हॉटेलमध्ये काय काम करतो? तिथं काय काय मिळतं? चना फ्राय, ग्रीन पीस फ्राय, व्हेज मंच्युरियन, पकोडा, कंटकी, तंदूर चिकन, बटर चिकन या सगळ्या डिशेस त्यांच्यासाठी नवीन होत्या. हॉटेलमधल्या गोष्टी. मी त्यांना रंगवून सांगत होतो. आणि ते सगळे जण कान देऊन ऐकत होते.

  दिवाळी दोन दिवसांवर आली होती. संजूशेठनं सगळ्यांनाच एकेक ड्रेस बोनस दिला. दिवाळीचं बोनस म्हणून मिळालेल्या कपड्यानं माझा चेहरा अधिकच उजळला. गाव आठवला. बऱ्याच दिवसांपासून गावाकडेही गेलो नव्हतो. जामनेरहून पळून आल्यावर फक्त एकदाच बायेला भेटण्यासाठी गेलो तेवढाच! गावाचीसुद्धा ओढ लागल्यानं कधी जातो अन् कधी नाही असं झालं होतं मला! अखेर संजूशेठने माझी सुटी मंजूर केली. शटरमधी त्यादिवशी मला रात्रभर झोपच आली नाही!

  सकाळीच नऊची एस.टी. धरली. अडीच- तीन तासांत गाडीनं माहोऱ्याला धरलं. बसस्टँडवर पाय ठेवताच अंगभर रोमांच आलं. माहोरा लहान असलं तरी आजूबाजूच्या गावातल्या माणसांचा सतत तिथं राबता असायचा. बसस्टँडशेजारी जि. परिषदेची दहावीपर्यंतची शाळा. याच शाळेत मी नववी, दहावीचे धडे गिरवले होते. शाळेजवळून जाताना मराठीचे कानडजे सर, हिंदीचे कापरे सर, कस्तुरे सर आणि गवई बाई तास घेत असल्याचा भास झाला. हे सारं चित्र डोळ्यासमोर तरळलं. त्यानं डोळ्यात टचकन पाणी आलं. माहोऱ्याच्या पुढे सात-आठ कि.मी. अंतरावर पिंपळगावकड हे माझं गाव.

  मी रस्त्याला लागलो. तेवढ्यात कुणी तरी हाक मारली. आवाज ओळखीचा वाटला म्हणून पटकन मागे वळून पाहिलं. सूर्यभान बाबा होता. बाबा माझ्या घरासमोर राहायचा. दोन टांगी धोतर, डोक्यावर ढवळीपट्टक टोपी, नीळ लावलेला सदरा. रोज सकाळी म्हातारा माझ्या दारापुढून पाच बकऱ्या हाकलत शेतात जायचा. लहान पोरासोरांचा बाबाला भलता लळा! नातवाला कडेवर घेऊन बाबा बकरीमागं पळायचा. एक दिवसही बाबानं न बोलता पुढं पाऊल टाकलं नाही. आजही मला पाहिल्यावर त्याला राहवलं नाही.

  ‘किती दिवसानं भेटतोय गड्या?’ म्हणत त्याने प्रेमाने विचारपूस केली. त्याचा निरोप घेऊन मी पुन्हा रस्त्याला लागलो.

  सूर्य डोक्यावर आला होता. ऊनसुद्धा चटकायला लागलं होतं. कोणाची गाडी पण दिसत नव्हती रस्त्यानं. रस्ता तुडवत जाणं भाग होतं. गाव सोडून सहा-सात महिने झाले होते. चालण्याची धमक आणि सवय अजूनही जिवंत होती. एवढ्यात मागून सारंगाची गाडी आली. मला पाहताच त्यानं गाडी थांबवली. बस म्हणाला. पाण्यापावसाच्या गप्पा मारत गाडीवरून गावात पोहोचायला वेळ लागला नाही. शेणानं सारवलेल्या अंगणात पाऊल ठेवताच भिंत पोतारताना बायेची नजर माझ्यावर पडली. ‘कव्हाशीक रे बाप्पा! पाह्यटंच निघाला वाटतं! तरीच म्हणलं काल उजवा डोळा काव्हूण लवत होता?’

  माझा आवाज ऐकून लहानी बहीण सुनीता लगबगीनं बाहेर आली. तिनं तव्यावर भेंड्या टाकल्या होत्या. बायेनं पोतारनं थांबवलं आणि माह्याजवळ येऊन बसली.

  ‘लैच खराब झाला रे! फिकीर धरली काय कशाची?’ सुनीताकडं पाहत बय म्हणाली ‘शेवायाचं आधण ठेव ना चुलीवर.’

  मी नाही नाही म्हणालो तोपर्यंत तिनं परातीत शेवायासुद्धा काढून आणल्या. बायेनं हातपाय धुतले घरातून एक डबा काढला. सुनीताच्या हातात दिला ‘गरम कर’ म्हणाली.

  तेवढ्यात शेतातून बाबा, दादा आला. आल्या आल्या माह्याजवळ बसले. बायेनं सुनीताला चुलीवर पाणी ठेवायला सांगितलं. मी आल्याचं कळताच दत्ता, संज्या, संत्या, बाली, गोदा मामीचा समा, गरूड महाराजाचं उप्या सगळेच पळत आले. मी हॉटेलमध्ये काय काम करतो? तिथं काय काय मिळतं? चना फ्राय, ग्रीन पीस फ्राय, व्हेज मंच्युरियन, पकोडा, कंटकी, तंदूर चिकन, बटर चिकन या सगळ्या डिशेस त्यांच्यासाठी नवीन होत्या. हॉटेलमधल्या गोष्टी. मी त्यांना रंगवून सांगत होतो आणि ते सगळे जण कान देऊन ऐकत होते. तेवढ्यात धुरपता मामी आल्या. ‘आय्या रमेस तुम्ही! कव्हा आले बाप्पा?’ धुरपता मामी भडभड बोलते, पण जिवापाड मायाही करते. दिवाळीचे पाच दिवस गोतावळ्यात काहीच आठवले नाही. सगळ्यांकडे फराळ, शेवईचा भात पोट भरून खाल्ला. सगळ्यांमध्ये गुंतलेलो, रमलेलो असताना मी निघायची तयारी केली. बाये, बाबा, वाड्यातले सगळे नदीपर्यंत सोडवायला आले आणि मायेच्या गोतावळ्याचा निरोप घेत मी औरंगाबादची एस. टी. धरली.

  हॉटेलमधील सगळ्याच वेटरमध्ये अंगभर भीती पसरली होती. यापुढे वेटरचं काम करावं की नाही करावं, या भीतीनं जीव थरथरत होता. काल जालना रोडवरच्या एका हॉटेलमध्ये दत्ता नावाच्या वेटरला कस्टमरनं नशेत मारून टाकलं होतं. ‘साहेब बिल पेड करा. हॉटेल बंद करण्याची वेळ झाली.’ हे म्हणण्याचा त्यानं गुन्हा केला होता. पेपरमध्ये छापून आलेली, ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण, वेटरच्या या जंजाळात कोणत्याच हॉटेल मालकाला रस नव्हता. हॉटेल अतिथीसारख्या कित्येक हॉटेलमध्ये, अनिलशेठच्या ओळखी होत्या. मॅनेजर, कॅशियर त्यांचे मित्र होते. त्यांनी दत्ताला न्याय द्यायचं मनावर घेतलं. अतिथीच्या मॅनेजरनं, अनिलशेठनं वेटर लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. सर्व वेटर, हेल्परनी एकत्र येणं कसं गरजेचं होतं हे पटवून दिलं. सकाळी अकराच्या आत ही मीटिंग उरकायची ठरलं.

  जालना रोडवर सगळे जमले. अनिलशेठनं व मॅनेजरनं सगळ्यांना खाली बसवलं. मॅनेजर बोलायला लागला, ‘आपण वेटर जरी असलो तरी आपण एक माणूस आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आपण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. दत्ताला न्याय द्यायला हवा. सगळ्यांनी मोर्चा काढून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊया.’ एवढं बोलून मॅनेजर थांबला. त्याच्या बोलण्यानं अनेक वेटर सळसळले. आपली नोकरी पक्की नाही. जिवाची हमी नाही. याचं त्यांना पहिल्यांदा भान आलं होतं. ‘वेटर दत्ता अमर रहे!! दत्ताला न्याय मिळालाच पाहिजे!!’ या घोषणांनी तिथला परिसर दणाणून गेला. दुपारची वेळ होती. जेवणाचा एक टेबल उठून गेला होता. माझ्या डोक्यात सकाळची मीटिंग, तिथलं भाषण घोंगावत होतं. वेटर दत्ता मात्र डोळ्यासमोरून जात नव्हता. त्याला पाहिलं नव्हतं, तरी एक अस्पष्ट वेटरची प्रतिमा डोळ्यासमोर तरळत होती.

  ‘मी वेटर झालो तर आपल्यासोबतही असं होऊ शकतं’ या विचारानं दरदरून घाम फुटला होता. दुसऱ्या दिवशी मीटिंगची बातमी पेपरात छापून आली. वेटर, हेल्पर एल्गार करणार या भीतीनं हॉटेलवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांनी एकमेकांना फोन करून पुढची मीटिंग होऊ न देण्याचा बेत आखला. जो कोणी मीटिंगला जाईल त्याला कामावरून काढण्याचा फतवा काढला. वेटर काम सुटेल, या धाकाने दुसऱ्या दिवशी मीटिंगला गेलेच नाहीत. दोन-चार वेटर आले आणि निघून गेले. भाषण ठोकणाऱ्या मॅनेजरचे कान टोचल्यानं तो पुन्हा तिकडे फिरकला नव्हता. वेटरला दत्ताच्या खुनापेक्षा उद्याच्या भाकरीची चिंता जास्त होती. हॉटेलवाल्यांनी आखलेला डाव यशस्वी झाला होता. कोणताही वेटर तोंड उघडत नव्हता. हॉटेल मालकांनी वेटरमध्ये एकता नसल्याचा नेमका हाच फायदा उचलला होता. मी बेसिनवर गेलो. नळाचं पाणी तोंडावर शिंपडलं. हातातल्या टिश्यू पेपरनं तोंड पुसताना, माझीच प्रतिमा माझ्याशी बोलू लागली, ‘बघितलीत माणसांची रूपं. काही माणसं जीव लावतात, तर काही माणसं आवाजाची फिर्याद दाबून टाकतात.’
  - रमेश रावळकर, rameshrawalkar@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

Trending