आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डच्चू देणारा श्रावण आणि मोरीवाली बाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाची अडचण कित्येकदा जशी दुसऱ्यासाठी लाभ देणारी ठरू शकते, तसेच व्रत-वैकल्य आणि सणावारांची गर्दी घेऊन येणारा श्रावण इतरांना पुण्याचं समाधान द्यायचा आणि हॉटेलातल्या आम्हा वेटर-हेल्परांवर उपासमारीची वेळही आणायचा...

उपास-तापास-व्रतवैकल्यांमुळे हॉटेलच्या धंद्यावर श्रावण पुरता दाटायचा. जेवणाची ऑर्डर क्वचितच मिळायची. म्हणूनच या महिन्यात वेटर-हेल्परवर टांगती तलवार असायची. धंदा होत नसल्यानं शेठ अनेकांना नोकरीवरून काढत, त्यामुळे सगळीच पोरं घाबरून-दबकून असायची. कुठं कुजबुज सुरू झाल्यावर ‘कोणाला काढलं?’ या चर्चेला ऊत यायचा. पण काउंटरपर्यंत ही गोष्ट कधीच जायची नाही. प्रत्येक श्रावणात कोणाला तरी हमखास डिच्चू मिळायचा. बरं, ज्याला कोणाला कामावरून काढलं जात, त्याला पगारही मिळत नसे. कुणी मागितला तर महिन्याच्या दहा तारखेला बोलवत. तोपर्यंत त्याला कुठं काम मिळेल, याची खात्री नसायची. खर्चाला पैसे आहेत, नाहीत याचं हॉटेल मालकाला काही देणं-घेणं नसायचं. इतरांमध्ये आपल्या साथीदाराला का काढलं म्हणून शेठला प्रश्न विचारण्याची हिंमत नसायची. उलट त्यांच्याच मनात स्वतःच्या नोकरीची चिंता असायची. दरवर्षीचा हा श्रावण माझ्याही पोटात भीतीचा गोळा उभा करी. कधी-कधी तर उपासमारीची वेळही आणे.

पण, श्रावणाचा पाटील वस्तादवर कधीही परिणाम झाला नाही. त्याचं पिणं खूपच वाढलं होतं. संजूशेठच्या कानावर त्याच्या अनेक तक्रारी गेल्या होत्या. एरवी, कोणताही हॉटेल मालक हेड कुकला काढण्याची रिस्क घेत नाही. सुनील वस्ताद तंदूर कुक होता. टेबल लागल्यावर किचनमध्ये दोन कुक असले, तरच टेबलवर वेळेत ऑर्डर जायची. त्यामुळेच संजूशेठच्या मनात कितीही असलं तरी, ते पाटीलवस्तादला चांगला कुक मिळेपर्यंत पोसणार होते. अशातच एक दिवस मुंबईचा ठाकूर नावाचा कुक काम विचारण्यासाठी आला. ठाकूरने अनेक वर्षे मुंबईच्या नावाजलेल्या हॉटेलांमध्ये नोकऱ्या केल्या होत्या. स्टेशनजवळच्या हमालवाड्यात ठाकूर राहायचा. मुंबईला बायको, मुलगा असूनही या ठाकूरने औरंगाबादला दुसरं लग्न केलं होतं. ठाकूरसारख्या कुकचं आयुष्यच मोठं निराळं असतं. मोरीवाल्या बायकांशी यांचं लगेच सूत जुळतं. चांगलंचुंगलं खायला मिळतं म्हटल्यावर बायकादेखील वस्ताद लोकांवर भाळतात. असो...

हळूहळू पाटील वस्तादचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. दोन-चार कस्टमरनं अनिल शेठजवळ ठाकूरच्या जेवणाची रग्गड स्तुती केली होती. शशीशेठलादेखील ठाकूर वस्तादच्या जेवणाची टेस्ट आवडायची. शेठला जेवायचं असल्यास ठाकूरच त्याचं जेवण बनवायचा. यामुळं पाटील वस्ताद मनातल्या मनात सारखा धुसफुसायचा. प्रत्यक्षात काहीच करता येत नसल्याने नैराश्यातून पीत राहायचा. एक दिवस नशेत पाटीलनं कांद्यांवरच उलटी केली. याचा संजूशेठला खूप राग आला. त्यांनी त्याला तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलं. पाटील वस्तादला नोकरीवरून कमी केल्याचा मला जसा आनंद झाला, तसं दुःखसुद्धा झालं. कारण श्रावणात त्याला कुठं दुसरी नोकरी मिळेल, याची चिंता मला होती. मागे त्यानं मला मारल्याचं, मी केव्हाच विसरलो होतो. तसंही पाण्यात राहून माशांशी वैर धरता येत नव्हतं. न पेक्षा दुपारी वेळ मिळाल्यावर पाटील वस्ताद माझ्या शटरमध्ये यायचा. मी कॉलेजच्या लायब्ररीतून आणलेली पुस्तकं वाचायचा. त्या पुस्तकात ना.धों. महानोर, नारायण सुर्वे, इंद्रजित भालेराव, कुसुमाग्रज यांची कविता आणि व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘माणदेशी माणसं’, ‘बनगरवाडी’, गो. नी. दांडेकर यांची ‘माचीवरला बुधा’ ही कादंबरी, रा.रं. बोरोडे यांची ‘पाचोळा’ कादंबरी, ‘नातीगोती’ कथासंग्रह, आनंद यादवांची ‘गोतावळा’, शंकर पाटलांची ‘टारफुला’, दादा गोरे यांचे ‘कोसळ’, ‘अंगठा’ अशी कितीतरी पुस्तकं वाचण्याचा मी सपाटा लावला होता. त्या वेळी माझी वाचनाची भूक खूपच वाढली होती. कविताही लिहू लागलो होतो. मी एखादी कविता लिहिल्यावर माझा पहिला श्रोता, पाटील वस्ताद असायचा. त्याला कविता किती कळायची माहीत नव्हतं, पण कविता ऐकवल्यावर तोदेखील त्याच्याकडील शेरोशायरी ऐकवायचा. एकूणच आमचं दोघांचं एक चांगलं ट्युनिंग जमलं होतं. अशा वेळी पाटील वस्तादची नोकरी जाणं हा शॉक होता.

एक दिवस सकाळी हॉटेल उघडल्यावर मोरीचं काम विचारण्यासाठी दोन स्त्रिया आल्या. एक साधारण पस्तिशीतील, दुसरी पंचवीस-तीस वर्षांची लग्न झालेली होती. त्या दोघी काउंटरवर अनिलशेठशी बोलत होत्या. बोलणं झाल्यावर शेठने मला आवाज दिला.
‘तू आजपासून मोरीत काम करायचं नाही.’
‘..........’ मी शांतच होतो.
‘यापुढे या बाई करतील, मोरीचं काम’
अनिलशेठ असं म्हणताच, माझ्या पायाखालची जमीन घसरली. वाटलं, आता आपली नोकरी गेली. श्रावण भोवला.
अनिलशेठच्या हसण्याचा आवाज साऱ्या हॉटेलमध्ये घुमला. त्यांनी मला काउंटरच्या आत बोलावलं. पाठीवर हात फिरवत म्हणाला,
‘तुला कामावरून काढलं नाही, तर तुला प्रमोशन दिलंय. तू आजपासून ठाकूर वस्तादच्या हाताखाली किचन हेल्पर म्हणून काम करायचं.’
हे ऐकताच माझ्या जिवात जीव आला. एकदाची मोरीतून माझी सुट्टी झाली...
... टेबल लागले होते. वस्तादनं स्टोव्ह हलवून बघितला. रॉकेलचे कॅनसुद्धा रिकामी होते. ठाकूर वस्तादनं किशोरला आवाज दिला.
‘मोरीवाली बाईके घरपर भेज रमेश को। वों दिलाएगी कहाँ से।’
मोरीवालीबाई हनुमाननगरात राहायची. मला पाहताच, ये म्हणाली.
‘वस्तादनं रॉकेल सांगितलं.’
‘माझ्याकडं दुकान आहे काय रॉकेलचं?’
मी नुसता हसलो. मोरीवालीबाई चहा ठेवायला लागली. तिनं लाख विनंती करून मी नाहीच म्हणालो, तरी करती म्हणाली. तिनं चहा करूनही मी घेतला नाही. खरं तर चहा घ्यायला मला काहीच वावडं नव्हतं. पण मोरीवाल्याबाईचा चहा घ्यायला मला भीती वाटायची. कारण जेव्हा जेव्हा मी घरी जायचो, तेव्हा तेव्हा बय सारखं सांगायची.
‘कोणा काही दिलं, तर बिलकुल घ्यायचं नाही.’
मी बयला हॉटेलमध्ये कोण कोण काम करतं, हे सगळं सांगायचो. मोरीवाल्याबाईबद्दलही बोलायचो.
हे ऐकताना बयच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलची काळजी जमा व्हायची. लेकराला कुणा बाईची नजर लागू नाही म्हणून चार-दोन मिरच्या माझ्यावर ओवाळून चुलीत टाकायची. 
‘तुला काही कळत नाही पाह्य. आणि हे बघ त्या बायांनी चहा दिलान त् घेऊ नको बरं का.’
‘का बरं?’
येड्या, या बाया चहात काहीबाही औषध टाकतात. मग माणूस त्यांच्याच आहारी जातो. त्याचंच ऐकतो. त्यांच्याशिवाय माणसाला दुसरं काहीच सुचत नाही.’
हे सगळं आठवल्यानंच मी मोरीवाल्याबाईचा चहा घेतला नव्हता. 
मी पुन्हा माणसाला वश करण्याच्या औषधात रंगून गेलो. खरंच माणसाला वश करण्याचं औषध असतं का? असेल तर, मोरीवाल्याबाईला कुठं मिळालं असंल, ते औषध?

- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...