आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैफियतनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवढं नजरेला दिसलं.त्यावरून मोरीवाली बाई माझ्या नजरेतून उतरली होती. माझ्या दृष्टीने तीच एकटी दोषी होती. पण तिला घरी सोडायची वेळ आली आणि मोरीबाईने मांडलेल्या कैफियतीने मी नखशिखांत हादरलो... 

आज अंबादासाला बरं वाटत नव्हतं. चार टेबल कर म्हणाला. मलासुद्धा हुरूप आला. बऱ्याच दिवसांपासून हेल्पर म्हणूनच काम करत होतो. ऑर्डर कशी घ्यायची? कस्टमरशी कसं बोलायचं? व्हिस्की, रम, जीन, व्होडका, बिअर या दारू प्रकारांतील नावं माहीत झाली होती. व्हेज-नॉन व्हेजमधलं देखील माहिती झालं होतं. मॉर्निंगला कोणी नसल्यावर मीच टेबल करायचो. भीती दूर झाली होती. माझे चारही टेबल लागले होते. जेवणाची ऑर्डर होती. सात नंबरच्या टेबलवर काजू करी, मलई कोफ्ता आणि मिक्स व्हेजसोबत बटर नानची ऑर्डर घेतली मी. शेवटी जिरा राइस न देता व्हेज पुलाव खपवला तिथं. शशी शेठला हा टेबल मी करतोय म्हटल्यावर खूप आनंद झाला. बाकीच्या टेबलवर तीन फुल चिकन हंडी आणि बाजरीच्या भाकरीची ऑर्डर होती. हॉटेल बंद व्हायच्या आत मी पाच चिकन हंड्या आणि दोन हाफ चिकन कंटकी खपवल्या. शेठ वेटरला एका चिकनमागे पाच रुपये द्यायचे. मी सहा चिकन विकले होते. शेठनं मला तीस रुपये दिले. हे तीस रुपये आणि माझ्याजवळचे पंचवीस रुपये, असे मिळून पंचावन्न रुपये झाले. त्याक्षणी खूप श्रीमंत झाल्यावाणी वाटलं मला. 

अंबादासचे सगळे टेबल संपले होते. मात्र, माझा दहा नंबर टेबल उठला नव्हता. दोन बिअर संपून तिसरी ‘कॅनॉन’ चालू होती, त्यांची! तवा पिठलं आणि ज्वारीच्या भाकरीची ऑर्डर होती, त्या टेबलवर. अंबादास बाजूच्या काउंटरवर बसला होता. त्यानं मला आवाज दिला. ‘तू खूप मस्त टेबल केले आज. आठ नंबरवरचे कस्टमर तुझ्या सर्व्हिसबद्दल बोलत होते. शेठला बोल. वेटर करा म्हणा मला आता.’ अंबादास असं म्हणताच माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं. 

ठाकूर वस्तादची आठवण झाली. वस्ताद किचनमध्ये जेवत होता. मला पाहून म्हणाला,“वों डिश के निचे भाजी है। वों ले ले तेरे कू।” मी झाकलेली डिश उचलली तर लेग पिसचा चिकन मसाला होता. “वस्ताद, चिकन मसाला है। किसका है? किसका ऑर्डर कॅन्सल हुआ क्या” “नहीं रे मैने रखा है। ले ले तू खा ले चुपचाप।” आज वस्तादनं मला चिकन मसाला खायला दिला होता. एरवी स्टापचीच भाजी असायची. कधी तरी टेबलवर उरलेल्या हंडीचा रस्सा. त्यातले पिस पिस कस्टमर काढून घ्यायचे. उरलेली ग्रेव्ही वेटर आपापसात वाटून खायचे.

वस्तादला कोणता देव पावला होता कळत नव्हतं. “आज तुने अच्छे टेबल किये।। अंबादास बोल रहा था।” “हां वस्ताद! चार टेबल संभाले मैने आज। और कोई भी कंप्लेंट नही। सभी कस्टमर खुश होकर चले गये।” वस्तादनं माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. खाली ठेवलेली डॉक्टर ब्रँडीची अर्धी क्वार्टर ग्लासात ओतली. माझ्या हातात जग देऊन पाणी घे म्हणाला. एक घोट मारून त्यानं ग्लास खाली ठेवला. म्हणाला, “तू अब हेल्पर का काम छोड दे। क्या पडा है हेल्पर के काम में? अच्छा खासा पढा लिखा है तू। दिमाख में ले जरा। वो अंबादास, किशोर, लक्ष्मण देखना कैसे टिप कमाते। संजू शेठ को बोल मुझे भी वेटर बनावो बोलना।” वस्ताद पिऊन बोलत होता, पण त्याचा शब्दन् शब्द खरा होता. तेवढ्यात शशी शेठनं वस्तादला आवाज दिला. शेठ हॉटेलच्या बाहेर उभे होते. वस्ताद रोज शेठसोबत जायचा. मी जेवण उरकलं आणि बाहेर पडलो. अंबादास जाताना टपरीवर पान खाऊ घाल म्हणाला. त्याचंही बरोबर होतं. चार टेबल करू दिल्यावर त्यानं पान मागितलं तर कुठं चुकलं त्याचं? अंबादासनं तोंडात पान कोंबून सायकलवर टांग टाकली. जाता जाता उद्या शेठला बोल म्हणाला.

वॉचमनने शटर खाली ओढलं होतं. तरीही संजूशेठ काउंटरवरच होते. ते गेल्यावर वॉचमन शटर ओढून लॉक ठोकायचा. मग मी आणि वॉचमन शटरमध्ये जाऊन निवांत पडायचो. पण तेवढ्यात सुनील वस्ताद वर आला आणि तुला सबनीसनं बोलावलं, म्हणाला. मला अंदाज आला.
 
मोरीवाल्या बाईला तिच्या घरी सोडवायचं होतं. पण, तिला सोडवायचं मला जिवावर आलं होतं. कारण मोरीवाल्या बाईच्या कॉलनीत एवढ्या रात्री कुत्रे भुंकायचे, अंगावर. जायचं म्हटलं की जीव मुठीत घेऊन जावं लागायचं. अर्थात, एकट्या बाईला एवढ्या रात्री एकटं जाऊ देणं मला काही  पटलं नाही. म्हणून मग वॉचमनची सायकल घेऊन मावशीसंगं पायी ढकलत निघालो. 

मध्यरात्र उलटली होती. रस्त्यावरच्या खांबावरील दिव्यांचा उजेड रस्त्यावर सांडला होता. पिवळसर उजेडानं रात्र आहे असं वाटतच नव्हतं. सुनसान रस्त्यावरही कोणी दिसत नव्हतं. क्वचित एखादी बाइक किंवा कारवाला भुर्रकन निघून जायचा. बहुधा कोणत्या तरी हॉटेलमधून परतलेले कस्टमर असावेत. मोरीवाली बाई काहीही न बोलता रस्त्यावर पडणारी पावलं मोजत निःशब्द चालत होती. वस्तादला व तिला शटरमध्ये एकत्र पाहिल्यापासून ती माझ्या नजरेला नजर देत नव्हती. मग मीच कोंडी फोडली. ‘मावशी, चला पटपट पोलिस येतील नाही तर...’ तिनं फक्त हुंकार भरला आणि पाय उचलला. 

पण मोरीवाली बाई बोलत नाही म्हटल्यावर, ‘मावशी, तू बोलत का नाही माझ्याशी?’ मीच तिला परत बोलकं केलं. मोरीवाल्या बाईनं काहीच उत्तर दिलं नाही. पुन्हा तिला बोललो. तेव्हा ‘काय बोलू तुझ्याशी? आणि कोण्या तोंडानं बोलू सांग...’ असं म्हणून तिनं एकदाची गुळणी फेकली. ‘काय केलंय तुम्ही माझ्याशी न बोलायला? अच्छा! त्या दिवशी तुम्ही शटरमध्ये होतात, त्याबद्दल अपराधी वाटतं ना!’ मी विषय फोडला. मोरीवाली गचकन थांबली. माझे हात हातात धरून रडू लागली. ‘तू होतास म्हणून गोष्ट शाबूत राहिली आमची. दुसरा कोणी असता तर हॉटेलमध्ये तमाशा झाला असता माझा. कोणासमोरही तोंड घेऊन जायची हिंमत झाली नसती मला.’ मोरीवाल्या बाईला केल्या गोष्टीचा पश्चात्ताप होत होता. ‘तुम्ही या वयात असं का वागलात? शोभतं का तुम्हाला?’ असं म्हणताच ती बोलू लागली- ‘तुला मीच दोषी वाटते ना... मी मोरीत भांडी घासायला बसल्यावर क्षणाक्षणाला विषारी नागासारख्या नजरा फिरतात माझ्या अंगावर वस्तादच्या! त्या वेळी वाटतं, ही गोरी कातडी सोलून काढावी, तंदूर रोटी काढायच्या लोखंडी सळईनं... त्याचं हे असं वखवखलंपण अंगाखांद्यावर झेलून घेण्यापेक्षा भोगू द्यावं सरळ त्याला हे शरीर! एकदाचा तो शांत झाल्यावर फणा नाही काढणार परत... पण वस्तादनं माझ्या या वागण्याचा पुरता फायदा उचललाय... आणि शेवटी शरीरधर्म म्हटल्यावर मलाही काही हवंय, हे कसं विसरता तुम्ही माणसं?’ 

मोरीवाली सांगत होती आणि माझ्या डोळ्यांत जाळ पेटला होता. काय सांगत होती ही बाई, माझा विश्वासच बसत नव्हता. वस्ताद खरंच असा वागत असेल का? क्षणभर वाटलं, तोसुद्धा एक पुरुष आहे. परंतु पुरुष असला म्हणून काय झालं. ही विकृती होती. कोणावर विश्वास ठेवावा? वस्तादवर की मोरीवाल्या बाईवर?  मी सरळ प्रश्न केला, ‘मग तुम्ही गप्प का? सांगत का नाही शेठजवळ?’  

तिने पदराने डोळे पुसले. आम्ही परत चालू लागलो. चालतानाही ती सांगत होती. ‘बाईच्या जातीला कुठंच मन मोकळं करता येत नाही. मनातल्या मनात हे कढ सोसत बसते मी रोज. ना धड कोणाजवळ बोलू शकत ना कोणी मला विचारू शकत. जीव जळतो नुसता माझा. आणि एकटी बाई पाहिल्यावर सगळेच लाळघोटेपणा करतात. वस्तादनं तेच केलं. त्याचं काय चुकलं? 

कोणती बाई ठेवायची कामावर? हे त्याच्याच हातात असतं शेवटी. नाही तर चांगली बाई नाही म्हणून शेठला सांगून काढून टाकतो कामावरून! मग कुठं कुठं फिरू काम विचारत? त्यापेक्षा त्याला जे हवं ते दिलं की सगळं 
चालतं सुरळीत.’  

मोरीवाली सांगत होती आणि माझ्या अंगावर काटा येत होता. गल्लीत पोहोचल्यावर भस्सकन कुत्र आलं अंगावर. मोरीवाल्या बाईनं हाड म्हणताच कुत्र्यानंही तिचा आवाज ओळखला आणि बाजूला पळालं. तिनं दरवाजावर थाप मारली. मी माघारी फिरलो. 

अंगातलं सगळं बळ गळून पडलं होतं. सायकलचं पायडल मारण्याइतकीही ताकद माझ्या अंगात नव्हती. तंदूरसारखा लाव्हा साऱ्या अंगात जळत होता. हॉटेलकडे जावं वाटत नव्हतं. एकाकी आभाळात  ढग दाटून आले आणि क्षणात अवकाळी पाऊस पडू लागला, तसं  सायकल थांबवून चिंब भिजत उभा राहिलो. नुसताच... जळणारा मनातला तंदूर थंड झाला. तेवढ्यात पाठीमागून पोलिसांची जीप आली. “कोण आहे रे तिकडं?” असा दरडावणारा आवाज कानावर पडला आणि माझी सायकल चिर्रर्र पाणी उडवत हॉटेलकडे पळू लागली. 

- रमेश रावळकर, rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४   
बातम्या आणखी आहेत...