आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम प्रराक्रमी: रामशेज किल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. संभाजीराजांच्या जीवनावर आधारित कादंबर्‍यांमध्ये व पुस्तकांत या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
मराठा साम्राज्यातील बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला. ‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टÑाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तºहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला दिसतो. पेठकडे जाणार्‍या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठनाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे. पेठ रस्त्यापासून आशेवाडी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. पावसाळ्यात तो ढगांमध्ये लपाछपी खेळत असला तरी ही लपाछपी फार काळ चालत नाही. त्यामुळे ढगांच्या थंड वातावरणात किल्ला पाहता येतो. रामशेजला भेट देण्यासाठी हिवाळाही तसा उत्तमच. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.
आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास 45 मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्‍या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्‍या बांधल्या आहेत. पायर्‍या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

गुहेच्या समोरून जाणार्‍या पायर्‍या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्‍या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्‍या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्‍यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.

किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही.

रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्टÑाच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या किल्ल्याचे जतन-संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे.
(tushar@tusharkute.com)