आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rangat Haravalela Granthveda, Shashikant Savant, Rasik

रंगात हरविलेला ग्रंथवेडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंड चित्रकाराचा असला तरीही सुहास बहुळकर यांना पाहणे, अनुभवणे, वाचणे आणि लिहिणे या चारही कलांत कमालीचा रस आहे. एरवी मराठी चित्रकारांना ग्रंथसंग्रहाचे आणि वाचनाचे वावडे असताना बहुळकरांनी मात्र कसोशीने ग्रंथवेड जपले आहे...
सुहास बहुळकर हे लिहिते चित्रकार आहेत आणि भरपूर वाचणारेही! त्यांच्या आईने त्यांच्यावर वाचनाचा संस्कार केला. वडील रोजंदारीवर ‘टर्नर’ म्हणून काम करणारे. आई खादी ग्रामोद्योगमध्ये नोकरी करणारी. पण वयाच्या चौथ्या वर्षी बहुळकरांनी काढलेले चित्र पाहून त्यांनी छोट्या सुहासचा चित्रकलेकडे असलेला कल ओळखला. सहा बाय नऊ फुटांच्या घरात राहून मुलाला चित्रकार करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले, पण तेव्हासुद्धा बहुळकर हाताला येईल ते वाचत. अगदी ‘काळा पहाड’पासून ह. ना. आपट्यांपर्यंत.
मुंबईत जे. जे. स्कूल ऑ फ आर्ट्सला आल्यावर बाबुराव सडवेलकर, शंकर पळशीकर, संभाजी कदम असे विद्वान शिक्षक त्यांना लाभले. या सांचे वाचन शिस्तबद्ध होतेच. त्यामुळे बहुळकर आवडीने वाचू लागले. ते सांगतात, ‘संभाजी कदम अ‍ॅस्थेटिक्स शिकवताना, अगदी भरताचे नाट्यशास्त्र शिकवताना, मध्येच कांट, सुसान लँअर असे करत स्वत:चेच तत्त्वज्ञान सांगू लागत. ते जी नावे घेत ती परिचित व्हावी म्हणून, मग मीही वाचू लागलो.’ 70 च्या दशकात त्यांना मुंबईतील प्रसिद्ध नाट्यगृह असलेल्या शिवाजी मंदिरसाठी पोर्ट्रेट साकारण्याचे काम मिळाले. पोर्टेट करताना कुणी जसा फोटो संदर्भासाठी घेतो, तशीच पुस्तकेही संदर्भाला घेण्याची त्यांना सवय लागली. कारण त्यांना वाटे, ज्याचे पोर्ट्रेट करायचे तो सबंध माणूस कळला पाहिजे. त्यामुळे त्यांनी रा. ग. गडकरी, बालगंधर्व यांच्यावरची पुस्तके वाचली. नावाजलेले कलादिग्दर्शक गुरुजी बंधू हे त्यांचे मित्र, त्यांना वाचनालयातून भरभरून पुस्तके आणून देत. पुण्यात गेल्यावर मराठी ग्रंथ संग्रहालयात ते बसत. चित्रकलेचा इतिहास त्यांनी अभ्यासला होता. त्यामुळे त्यावरची पुस्तके त्यांनी वाचलीच. ड्रॉइंग आणि अ‍ॅनाटॉमीसाठी त्या काळात जे. जे. वाचनालयात बरीच पुस्तके होती. त्यातील ब्रिजमन आणि व्हिक्टर पेरार्ड यांचा उल्लेख ते आवर्जून करतात. गोपाळराव देऊस्करांपासून संभाजी कदमांपर्यंत अनेक चित्रकारांचा स्नेह बहुळकरांना लाभला. त्यांच्याविषयी दीपावली, मौज, अक्षर आदी दिवाळी अंकांमध्ये त्यांनी लिहिलेले आहे. सध्या बहुळकर चित्र-शिल्पकला कोशावर काम करत आहेत. त्यासाठी जवळजवळ 700 चित्रकार - शिल्पकारांच्या नोंदी करण्याचे काम चालू आहे. साहजिकच मिळतील ती चित्रकलेवरची पुस्तके जमवणे, प्रसंगी झेरॉक्स करून वाचणे, हा त्यांच्या कामाचा भाग बनलेला आहे. बहुळकर यांनी आपल्या खास शैलीत जे. जे.च्या पोट्रेट टिकवण्याचा परंपरेचे डॉक्युमेंटेशनही केले आहे. मध्यंतरी द. ग. गोडसे यांची काही पुस्तके त्यांना हवी होती. त्या निमित्ताने आमची देवाणघेवाण झाली.
बहुळकरांचा स्वत:चा 700-800 पुस्तकांचा संग्रह आहे. ‘हिंदुस्तान प्रकाशन’ संस्थेतर्फे प्रकाशित होणा आगामी कोशात ते बुडालेले आहेत. त्यापूर्वी गोंडा येथे त्यांनी रामायण आणि तत्सम चित्रांच्या प्रकल्पावरही काम केले आहे. एकूणच वाचणे, पाहणे, अनुभवणे, लिहिणे या चारही कलांत चित्रकलेइतकाच त्यांना रस आहे.