आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषेचा फोलपट अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीच्या अभिमानाच्या आपल्या बाता फोलपट पातळीवर पोहोचल्या आहेत. भावनिक गोष्टींचा काहीही उपयोग नाही. स्वत:ची भाषा सोडायला इतके अधीर झालेले लोक दुनियेच्या पाठीवर आणखी कोणीही नसतील.

‘हल्ली लोक वाचतच नाहीत हो!’ असं अनेक जण अनेक प्रसंगी म्हणत असतात. यातून काही प्रश्न आपल्या मनात सहज उगवू शकतात. हल्ली वाचत नाहीत, तर कधी वाचत होते? वाचत नाहीत म्हणजे काय वाचत नाहीत? वाचण्याची गरजच मुळात काय? वाचता न येण्याचा काळ बहुजनांनी, सामान्य जनांनी कैक पिढ्या अनुभवलेला आहे. ते सगळे श्रवणभक्ती करणारे लोक. तेही संधी मिळाली तरच. वाचनाचा संबंध विद्या आत्मसात करण्याशी आहे. मनाला पुष्ट, नीतिमान करण्याशी आहे, प्रश्न विचारण्याची हिंमत मिळविण्याशी आहे. अर्थात, न वाचता येणारा अनीतिमान असतो, असं नाही. अनेक उच्चशिक्षित लोक अनेक प्रकारे अनीतीने वागताना आपण हरहमेश पाहतो. फारसं औपचारिक शिक्षण न झालेले अकबर बादशहासारखे महापुरुषही आपल्याला माहीत असतात. असं बघा, माणसाला कुतूहल असतं. त्याच्या पूर्तीसाठी जी जी आयुधं उपलब्ध असतील, ती वापरण्याची, आत्मसात करण्याची त्याला संधी खुली हवी. ती त्यानं किती साधायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. तो ते आपापल्या कुवतीनुसार करणार. वाचन हे ज्ञान मिळवण्याचं, कुतूहलपूर्तीचं एक महत्त्वाचं आयुध आहे. आता ते सर्वांसाठी खुलं आहे. ज्याला वाचता येतं, तो काही ना काही वाचतोच. उदाहरणादाखल, वृत्तपत्र सहसा सारेच वाचतात. त्यातून अनेक प्रकारची माहिती मिळते. हल्ली इलेक्ट्रॉनिक माध्यमेही त्यासाठी असतात. डिस्कव्हरी चॅनल, अ‍ॅनिमल प्लॅनेट अशा ठिकाणी वन्य जीवनासकट बरेच बघायला मिळते. अल्-जझीरा, बी. बी. सी.वर अनेक उपयुक्त माहितीपट असतात. समकालीन घटनांच्या अनुषंगाने चर्चा होते. यु-ट्यूबवर इतर अनेक गोष्टींसोबत बुद्धिमंतांच्या चर्चा/विश्लेषणे ऐकता-पाहता येतात. तरीही हे सारं माहितीच्या एका टप्प्याशी थांबणारंच असतं. या टप्प्यावर माणसं सामान्यत: थांबतात. त्यात गैर काही आहे, असं मला वाटत नाही. पण, याही पल्याड जगण्यातल्या अनेक पेचासंबंधी, अनेक धारणांसंबंधी प्रश्न उरतातच. ते खरे मूलभूत प्रश्न असतात. निदान काही जणांना ते तसे वाटतात. त्यांना वाचनाखेरीज इलाज नसतो. ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान किंवा तत्सम ज्ञानशाखा यांच्यात झालेले काम वाचून अभ्यासपूर्वक आत्मसात केल्याखेरीज नवा काही विचार करताच येत नाही. असा उद्योग करण्याच्या भानगडीत सगळे पडत नाहीत. थोडेच लोक ते करतात आणि करत आलेले आहेत. हे असं करतानासुद्धा जगण्याविषयी पडणारे आणखी नैतिक पेच उरतातच. त्यांना ठाशीव उत्तरं नसतात. अनेक अभ्यासक आणि कलावंत आपापल्यापरीने, आपापल्या पद्धतीने अधिभौतिक प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न करत असतात. अशा गोष्टींशी भिडणार्‍या निर्मिती संख्येने कमीच असतात. त्यांना आपल्या आस्थेचे विषय बनवून ते वाचणारे, अभ्यासणारे कोणत्याही काळात कमीच असतात. पण ते असतात मात्र कायम. याच्यापेक्षा वेगळे, पण संख्येने खूपच अधिक असे वाचक असतात. त्यांना वाचायचं असतं. पण डोक्याला कटकट नको असते. त्यांच्यासाठी आजच्या जगात अधिक उत्तम पर्याय उपलब्ध झालेले आहेत. प्रणयप्रधान चित्रपट, रहस्यमय थरारपट, अश्लील चित्रपट हल्ली संगणकावरच्या महाजालात सहज मिळतात. या जातीच्या करमणुकीची अपेक्षा असेल, तर हे वाचक वाचताना शब्द पाहण्याऐवजी चित्र पाहणे पसंत करणारच. ते पुरवणारी इंडस्ट्री महाकाय झालीय.साहजिकच हा वाचक हल्ली संख्येने कमी होऊ लागला आहे. पण गंभीर साहित्याचा वाचक कमी झालाय, असं मला वाटत नाही. शिक्षणाचा प्रसार झाल्यानं उलट या प्रकारच्या वाचकाचा भौगोलिक विस्तार महाराष्ट्रभर झालाय. मुख्य म्हणजे, असा वाचक जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांत काम करणारा आणि वावरणारा आहे. विज्ञानाचं उच्च प्रकारचं ज्ञान मिळवणार्‍यापासून ते चहाची गाडी चालवणार्‍यापर्यंत त्याचा विस्तृत पट आहे. पण हा वाचकही आता म्हातारा होऊ लागला आहे. या वाचकात नव्यानं भर पडू नये, अशी एक नवी व्यवस्था आकाराला येऊ पाहतेय. हल्ली गरिबांपासून उच्चमध्यमवर्गीयांपर्यंत आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत दाखल करण्याची रुची फार वाढली आहे. साहजिकच त्यांच्यातून नवा गंभीर साहित्य वाचण्याची इच्छा बाळगणारा वाचक तयार होणे, कमी कमी होत जाईल. आंग्ल भाषेत त्यांना फार प्रावीण्य मिळेल, असंही नाही. कारण कोणत्याही विषयाची विद्यार्थ्यात गोडी निर्माण होताना, त्यात त्या विषयाचा शिक्षक हा एक मोठा दुवा असतो, असं माझं निरीक्षण आहे. अशा वेळी प्राथमिक स्तरावर उत्तम इंग्रजी शिकवणारे शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात एकाएकी कुठून मिळणार? पण इंग्रजीतून विज्ञान, गणित ते कसे परिणामकारकपणे शिकू शकतील? जी भाषाच नीट समजत नाही, तिला ज्ञानाची वाहक भाषा म्हणून कशी वापरता येईल? एकूण या संदर्भातली परिस्थिती फार भीषण आहे. येत्या आठ-दहा वर्षांत याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतील. मुला-बाळांसाठी वेळ देऊ शकणार्‍या जागरूक मध्यमवर्गीयांचे एक वेळ ठीक; गरिबांच्या मुलांचे काय?
मराठीचे प्राध्यापक आणि मराठी एक विषय म्हणून शिकणारे विद्यार्थीही तितकं वाचत नाहीत, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. या क्षेत्रात- म्हणजे मराठी भाषा आणि साहित्याच्या शिक्षणाविषयी मी म्हणतोय- मनाचा थरकाप उडविणारी परिस्थिती आहे. भाषा आणि साहित्याचं ज्ञान आणि आकलन अगदी प्राथमिक पातळीवर असणार्‍यांची बहुसंख्या आहे. (आणि यातले पुष्कळ पीएच.डी. पदवी मिळवलेले असतात.) ते विद्यार्थ्यांना काय देऊ शकणार? बहुसंख्य विद्यार्थीसुद्धा दुसरं काहीच जमत नाही, म्हणून मराठी घेतात. कारण मराठी काय, आपलीच भाषा; तिच्यात शिकायचं काय आणखी विशेष, अशी धारणा. मुळात, एक समाज म्हणून आपल्या भाषेची प्रतिष्ठा आपण अतिशय हीन पातळीला आणलीय. त्याचंच प्रतिबिंब भाषा आणि साहित्याच्या अभ्यासात आणि वाचनाच्या ढासळत्या निकडीत दिसतं. दोष कोणाकोणाला द्यायचा? ज्या लोकांना स्वत:च्या मातृभाषेविषयी काहीही आस्था उरलेली नाहीय, त्यांना कोण काय सांगणार? मराठीच्या अभिमानाच्या आपल्या बाता फोलपट पातळीवर पोहोचल्या आहेत. भावनिक गोष्टींचा काहीही उपयोग नाही. स्वत:ची भाषा सोडायला इतके अधीर झालेले लोक दुनियेच्या पाठीवर आणखी कोणीही नसतील. ज्या मातृभाषेतून किमान 2000 वर्षांच्या ज्ञानसंचिताची परंपरा आयती मिळते, त्या भाषेला सोडून आपण कोणत्या त्रिशंकू अवस्थेकडे निघालो आहोत? आपल्या मुलाबाळांना कोणत्या खाईत ढकलत आहोत? का ढकलत आहोत? इतका आत्मविश्वास गमावलेले भाषिक समूह दुनियेच्या पाठीवर आणखी नसतील. आणि हा समूह अकरा कोटी लोकांचा आहे! आणि मी या कसल्या वाचनाच्या आवडीच्या गोष्टी करतोय?
(rangnathpathare@gmail.com)
(पुढील अंकापासून कवी ऐश्वर्य पाटेकर यांची लेखमाला)