आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडा लेखनसातत्याचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिहिण्याचा नाद काही ठरवून लावून घेता येत नाही. येणार्‍या आयुष्यात आपण सतत लिहीत राहणार आहोत, असंदेखील कधीच ठाम सांगता येत नसतं. सुरुवातीला हौस अर्थातच असते. नंतर सरावही होतो. पण लिहिण्याचा नाद टिकण्यासाठी लिहिणं अपरिहार्य होणं आवश्यक असतं. ही अपरिहार्यता कशातून येते? ती प्रतिक्रिया देण्याच्या सक्तीतून येते. अशी सक्ती आंतरिक स्वरूपाची असावी लागते. अशी सक्ती टिकली की लिहिण्यात सातत्य येतं. त्यासाठी वर्तमानाशी आपला संवाद हवा. जगण्यातल्या कशा ना कशामुळं आपलं हृदय हेलावायला, जखमी व्हायला हवं. काही ना काही अपुरेपण जाणवायला हवं, आणि ते सारं निर्मितीच्या पातळीवर नेऊन मांडण्याची असोशी हवी. आता, हे सगळं असलं तरी आपण लिहितो ते छापणार्‍याला तितकं महत्त्वाचं वाटायला हवं. साधारणत: 1976 पासून माझं लेखन छापलं जाऊ लागलं. प्रामुख्यानं मी कथा लिहीत होतो.

पहिली कथा ‘सत्यकथा’ या त्या वेळच्या प्रतिष्ठित मासिकात छापून आली होती. पण दोन-तीन वर्षांत ते बंद पडलं. अर्थात, त्याचं-माझं कदाचित तितकं जमलंसुद्धा नसतं. ते असो. मी प्रामुख्याने ‘हंस’, ‘राजस’, ’अनुष्टुभ्’ या नियतकालिकांमध्ये आणि इतर बर्‍याच दिवाळी अंकांमध्ये लिहीत होतो. हळूहळू माझ्या कथांची लांबी वाढू लागली. एकाच कथेत अनेक आशयसूत्रे दिसू लागली. मासिकात छापण्याच्या सोयीसाठी, मी ती कथेत कोंबू लागलो. हे विशेषकरून, ‘हंस’चे संपादक आनंद अंतरकर यांना जाणवलं. त्यांनी ते मला कळवलं. ‘सगळं विनासंकोच लिहा. लांबीचा विचार लेखनबाह्य आहे. त्यामुळं कथेचा पोत बिघडतो. आपण लिहितो त्याची कथाच झाली पाहिजे, असं कशाला?...’ या सगळ्या भानगडीत मी कादंबरी लिहिली, ‘दिवे गेलेले दिवस.’ ती अंतरकरांनी त्यांच्या विश्वमोहिनी प्रकाशनाच्या वतीने 1982मध्ये छापली. 1983मध्ये त्यांनी माझ्या कथांचा एक संग्रह ‘अनुभव विकणे आहेत’ या नावाने छापला. 1984 मध्ये ‘ग्रंथाली’ने माझी ‘रथ’ नावाची कादंबरी छापली. नंतर थेट 1989मध्ये ‘ग्रंथाली’नेच ‘चक्रव्यूह’ नावाची कादंबरी छापली.

दरम्यान, मी कथा सातत्यानं लिहीत होतो. एकच एक प्रकाशक मला अपुरा पडेल अशा वेगाने लिहीत होतो. ‘चक्रव्यूह’ची छपाई चालू असताना ‘हारण’ नावाची कादंबरी लिहिली होती. अशात आपण ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाकडे आपली कादंबरी वाचायला द्यावी, असं माझ्या मनात आलं. ओळख कोणाशीच नव्हती. जयवंत दळवी यांच्याशी थोडा पत्रव्यवहार होता. ते मॅजेस्टिकचे लेखक. त्यांच्या ‘अथांग’ आणि ‘वेडगळ’ या कादंबर्‍या माझ्या आवडत्या. त्यांचा ‘ठणठणपाळ’मधला निर्विष विनोदही मला आवडे. प्रत्यक्ष भेट कधी झालेली नव्हती. पण ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’मध्ये नोकरीला आहेत, त्यांनी अनेक प्रतिष्ठित आणि गरजू लेखकांना त्या माध्यमातून अनुवादाची कामे मिळवून दिलेली आहेत, असं मी ऐकलेलं होतं. इतरांना मदत करणं हा त्यांचा स्वभाव असेल, असा अंदाज मी केला. मी स्वभावत:च बुजरा होतो.

पत्रव्यवहाराने संपर्क मला सोयीचा. मी दळवींना पत्र लिहिलं. माझ्या कादंबरीचं हस्तलिखित मी मॅजेस्टिककडे छापायला देऊ इच्छितो. त्याच्या आधी आपण ती वाचून आपणास योग्य वाटल्यास तशी शिफारस करू शकाल का, असं मी लिहिलं. दळवींनी त्याला उत्तर दिलं. हस्तलिखिताविषयी त्यांनी काहीही लिहिलं नव्हतं. पण मुंबईला येणं झाल्यास फोन करून अवश्य भेटा, असं मन:पूर्वक लिहिलं होतं. त्यांनी फोन नंबर दिला होता. त्या वेळी ते दादरला भवानी शंकर रस्त्यावर राहत होते. असेच एकदा पत्र लिहून येतोय असं त्यांना कळवलं. पोहोचल्यावर त्यांना फोन केला. त्यांनी सहजपणे हो म्हटल्यावर मी आनंदाने फोन ठेवायच्या बेतात असताना काहीतरी आठवून ते म्हणाले, पठारे जरा थांबा. मला आत्ताच आठवलं, आज संध्याकाळी माझ्याकडं मंगेश पदकी येणार आहे. ते आणि तुम्ही एकाच वेळी आलात, तर मी साहजिकच त्यांच्याकडं अधिक लक्ष देणार. त्यापेक्षा तुम्ही असं करता का- तुम्ही उद्या संध्याकाळी या. उद्या आहात ना इथं? त्यांच्या या प्रस्तावामुळे मी अर्थातच खट्टू झालो. पण म्हणालो, हो, हो, आहे मी. भेटू उद्या.

दुसर्‍या दिवशी त्यांना मी जरा संकोचतच भेटलो. त्यांनी मात्र अगत्याने स्वागत केलं. त्यांच्यासोबत आणखी एक जण होते. ते गप्प होते. मीही गप्पच होतो. दळवीच थोडेफार बोलत होते. थोडा वेळ गेल्यानंतर तिघे गप्प गप्प. कारण दळवीही अधिक बोलणारे नव्हते. खेरीज माझ्यासारख्या नवख्या लेखकाशी ते बोलणार तरी काय? मग अचानक ते म्हणाले, पठारे तुम्ही तरुण लोक चांगलं लिहिता. पण तुमच्या लेखनात सातत्य नसतं. त्यामुळं तुमच्या नावाची मुद्रा तयार व्हायला वेळ लागतो. त्या दरम्यानच, तुम्ही नामोहरम होता. ते बरोबर नाही. आता हेच बघा, मला तुमचं नाव माहीत आहे. पण आता समजा, हा माझा मित्र. हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे. चांगला वाचक आहे. पण त्याला तुमचं नाव माहीत नाहीय-म्हणजे नसेल. मग त्या मित्राकडं वळून म्हणाले, काय रे, तुला रंगनाथ पठारे हे नाव माहीत आहे? मित्र म्हणाला, नाही बुवा. दळवी म्हणाले, बघा. असं ते आहे. लिहिण्यात सातत्य पाहिजे. मी म्हटलं, ठीक आहे. येतो मी. मनात ते हस्तलिखिताचं विचारायचं होतं. ते करायची हिंमत झाली नाही. दारापर्यंत सोबत येताना दळवी म्हणाले, तुमच्या हस्तलिखिताविषयी तुम्ही लिहिलं होतं. तुम्ही ते थेट मॅजेस्टिकला पाठवा. तुम्ही कोणत्या दर्जाचे लेखक आहात, हे मी त्यांना सांगेन.

हस्तलिखित वाचायचा मला कंटाळा येतो. दळवींची आणि माझी ती एकमेव भेट. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी कादंबरी मॅजेस्टिककडे पाठवली. ती त्यांनी तीन महिन्यांच्या आत छापली. त्याच्या पुढच्या वर्षी आणखी एक. लिहिताना प्रतिभा, आंतरिक सक्ती या गोष्टींचा बोभाटा लेखक फार करतात. सातत्य राखणं हा थोडा क्राफ्टचा भाग असतो. पण त्याचंही महत्त्व आहेच. एक ज्येष्ठ लेखक नेहमी म्हणत, मी आयुष्यभर लिहिलं. लेखनाखेरीज मी जगूच शकत नाही. याउलट दुसरे एक मोठे लेखक या प्रकाराची खिल्ली उडवताना म्हणतात, रोज नियमित शौचाला जावं, तसं यांचं नियमित लेखन. हा मुद्दा योग्य असला तरी सातत्य आणि दर्जा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. मला वाटतं, प्रत्येक लिहिणारा इतरांपेक्षा वेगळा असतो. म्हणून त्याने आपला आतला आवाज ओळखावा. निदान एकच कादंबरी दहा वेळा किंवा शंभर वेळा लिहू नये. आंतरिक सक्ती नसताना लिहू नये. पण खरोखरच ती असेल, तर मात्र कशालाही न जुमानता लिहावे.

साने गुरुजी खूप वेगाने भरपूर लिहीत. उद्धव शेळके यांनी खूप लिहूनही एकच चांगली कादंबरी लिहिली. विस्मृतीत गेलेले वन बुक वंडर रायटर्स आपल्याकडे कमी नाहीत. म्हणून ज्याने त्याने आपला स्वर शोधावा, हेच उत्तम. लिहिताना बाह्य दडपण झुगारून द्यावे आणि आपल्या आंतरिक सक्तीशी इमान राखणे सर्वात महत्त्वाचे मानावे, हे सर्वोत्तम.