Home | Magazine | Madhurima | rani-laxmibai-article

नियतीचा सामना

प्रतिभा रानडे, लेखिका, मुंबई | Update - Jun 10, 2011, 11:48 AM IST

तान्ह्या मुलाचा मृत्यू, कोवळ्या वयात वैधव्य, पाठोपाठ हिसकावली गेलेली राजसत्ता ही झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची नियती होती. राणी लक्ष्मीबाईंची नुकतीच पुण्यतिथी झाली त्यानिमित्ताने......

 • rani-laxmibai-article

  सध्या सगळीकडेच ‘विमेन इन पॉवर’ या विषयावर चर्चा होत आहे. स्त्रियांना अनेक आघाड्या एकदम सांभाळाव्या लागतात हाच चर्चेचा सूर पहावयास मिळतो. प्रत्येक ठिकाणी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा कुठे बाईचा प्रभाव पडतो, यश मिळते; परंतु कित्येकदा अंतिम यश मिळाले नाही तरी प्रभाव कमी होत नाही. याचे ठळक उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई.
  लक्ष्मीबाईचा जीवनारंभ आणि अंत यांमधल्या अवकाशाचा तिने केलेला प्रवास स्तिमित करणारा आहे. दुस-या बाजीरावासारख्या पराभूत, ख्यालीखुशालीत रमणा-या पेशव्याच्या घरात ही आईविना असलेली एका भटजीची मुलगी मोठी होत होती. तिची नियती होती ती अतिसामान्य आयुष्य जगण्याची; पण तिच्या अंत:स्फूर्ती वेगळ्याच होत्या. तिने घोडेस्वारी, तलवारबाजी, मल्लखांबासारख्या निव्वळ पुरुषीच नव्हे, तर पराक्रमी पुरुषी अवकाशात प्रावीण्य मिळवले. वयाच्या ११-१२व्या वर्षी चाळिशीतील झाशीच्या राजाशी विवाह करावा लागला. हा विवाह होता तो निव्वळ राज्याला वारस हवा म्हणून. राणीपुढे मार्ग होता राज्याला वारस देऊन जनानखान्याची शोभा बनून राहायचे किंवा स्वत्व राखण्यासाठी क्रियाशील राहायचे! राणीने राज्याला वारस दिला; पण त्याचबरोबर घोडेस्वारी, तलवारबाजी स्वत:पुरतीच मर्यादित न ठेवता इतर बायकांनाही त्याचे शिक्षण दिले. ही तिची उपजत ऊर्मी होती. पुढे आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढावे लागणार आहे, याची सुतराम कल्पनाही तेव्हा नव्हती.
  तान्ह्या मुलाचा मृत्यू, कोवळ्या वयात वैधव्य, पाठोपाठ हिसकावली गेलेली राजसत्ता ही तिची नियती होती. मुलाचा, नव-याचा मृत्यू ही ईश्वरेच्छा; परंतु राजसत्ता जाणे ही इंग्रजांची इच्छा. त्याविरोधात तिने दाद मागितली; पण यश आले नाही. परंतु मनातला तो सल गेला नाही. तिने गुप्तपणाने शेजारच्या कानपूरच्या राजाशी, मर्दानसिंहाशी संधान बांधले. १८५७चा उठाव सुरू झाला मे महिन्यात; पण आधीच एक महिनाभर राणीने मर्दानसिंहाला पत्र पाठवले होते. मर्दानसिंहाने इंग्रजांविरुद्ध युद्धाची तयारी चालवली होती. ही गोष्ट राणीला आवडणारीच होती. कारण विदेशी लोकांचे राज्य असणे मंजूर नाही. इंग्रजांशी लढणे आवश्यकच आहे; पण ही सगळी तयारी गुप्तपणाने झाली पाहिजे. जून १८५७मध्ये झाशीमधल्या शिपायांनी उठाव केल्यानंतरदेखील राणीने इंग्रज सरकारकडे मदत मागितली. त्याच वेळी बागपूरचा महाराणा मर्दानसिंह, नानासाहेब पेशवा यांच्याशीही पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हे तिचे वागणे दुटप्पीपणाचे की कपटनीती? मी म्हणेन चाणाक्ष राजनीती. परकीयांनी तिचा परंपरागत हक्क बेकायदा लुबाडला होता. त्याविरुद्ध लढून आपला हक्क परत मिळवणे हे तिचे कर्तव्यच होते.
  १९व्या शतकात ब्राह्मण स्त्रीने, ती राजघराण्यातील असली तरी, विधवा होणे याचा अर्थ केशवपन करून, निकृष्ट जीवन जगणे. युद्धासारख्या पुरुषी अवकाशात लक्ष्मीबाई विधवा असण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. लक्ष्मीबाईने स्वत:च्या या नियतीलाही अत्यंत धैर्याने, चातुर्याने स्वीकारले. इंग्रज सरकार आपल्याला झाशीबाहेर जाऊ देणार नाही हे माहीत असूनही तिने केशवपन करण्यासाठी काशीला जाण्याची परवानगी मागितली. ती मिळणार नव्हतीच. लक्ष्मीबाईने आपले केशवपन अशा प्रकारे टाळले. केशवपन टाळण्याचा तो एक मार्ग होता. पण त्यासाठीची कठोर प्रायश्चित्ते, उपास ती दररोज करीत राहिली. स्वत:च्या बाईपणाचा मुद्दाही तिने अत्यंत हिकमतीने वापरला. उठावानंतर सत्ताग्रहण केल्यानंतर शेजारी राज्याच्या नाभेखानने झाशीवर हल्ला केला. तेव्हा तिने नाभेखानला पत्र पाठवले, ‘मी शिवरामभाऊंची सून आहे. तुमच्यासारख्या बुंदेले लोकांना बायका करून सोडण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी आहे. याकरता दूरवरचा विचार करून युद्धास सिद्ध व्हा.’ या पत्रानंतर नाभेखान माघारी गेला हे सांगायला नकोच. झाशीला वेढा घालून बसलेल्या सर ह्यू रोजने राणीला नि:शस्त्र होऊन भेटायला बोलावले. तिकडे गेल्यावर दगाबाजी होणार हे उघड होते. तेव्हा राणीने निरोप पाठवला, ‘मी हिंदू विधवा, परक्या पुरुषासमोर जाणे नाही.’ पण याच राणीने, जॉन लॅन्ग या इंग्रज वकिलाबरोबर आपला हक्क परत मागण्यासाठी व्हिक्टोरिया राणीला कशा प्रकारे पत्र लिहावे याबद्दल समोरासमोर बसून सल्ला घेतला होता. स्वत:ला ‘मी रांडमुंड, अदशेर आट्याची धनीण’ असे म्हणवून घेणारी ही राणी अखेरीस युद्धभूमीवरच शत्रूच्या घावाला बळी पडली. बरोबरच्या २-४ स्वकीयांनीच तिला अज्ञात ठिकाणी अग्नी दिला. तिची इच्छा तशीच होती. कारण स्त्रीजातीला वाटणारी सनातन भीती- मेल्यानंतरही आपल्या देहाची विटंबना होऊ नये.
  तिच्या युद्धचातुर्याचे, धैर्याचे, शौर्याचे कौतुक तर स्वकीयच काय, पण प्रत्यक्षदर्शी परकीयांनीदेखील करून ठेवलेले आहे. तिच्या विरोधात लढताना जेरीस आलेल्या ह्यू रोजनेही म्हटले होते, ‘ती एक उच्चकुलोत्पन्न स्त्री होती. फौजी नेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट आणि हिंमतवान व्यक्ती होती, झाशीची लक्ष्मीबाई.’ ही शूरवीर राणी उत्कृष्ट राज्यकर्ती होती. जेमतेम वर्षभरच तिने झाशीवर राज्य केले. पदच्युत झाल्यानंतर आपण पुन्हा राज्यकर्ते झालो आहोत, याचा स्वकीयांना अभिमान वाटला पाहिजे, तसेच इंग्रजांनाही ते जाणवले पाहिजे हे तिचे धोरण होते. स्वत:ची राहणी अत्यंत साधी असूनही महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला जाताना मोठ्या श्रीमंती थाटाने, भपकेबाजपणे, वाजतगाजत जायची. अनेकदा दरबारात ती पुरुषी कपडे घालून न्यायनिवाडा करायची. युद्ध सुरू झाल्यावर तर ती पुरुषी कपडे घालूनच रणांगणात उतरली होती.
  भपकेबाजपणाने दर्शनाला जाणे आणि पुरुषी कपडे घालणे हे तिचे एक राजनैतिक विधान होते, स्वकीयांसाठी, इंग्रजांसाठी, की आता कायदेशीर राज्यकर्ता आलेला आहे. दयाळू, श्रद्धावान, संगीत, नाटक या कलांची आश्रयदाती राज्यकर्ती म्हणून लक्ष्मीबाई प्रजेची अतिशय लाडकी ‘बाईसाहेब’ होती. नियतीने दिलेले जीवन मुकाट्याने मान्य करून, नीरसपणाने, दु:खाने कुढत किंवा मनात कडवटपणा ठेवून न जगता रसरशीत जीवनोत्साहाने, वीरवृत्तीने ती जगली. प्रजेची काळजी घेत, त्यांच्यामध्येही जीवनोत्साह, स्वाभिमान पेरत ती जगली. तिच्या मृत्यूने यशस्वीपणाचे परिमाणच बदलून टाकले. युद्धात अपयश आले तरी तिचे चारित्र्य, चातुर्य, अतुलनीय शौर्य, धैर्य, उदारपणा, राजनीतीतला शहाणपणा या तिच्या गुणांचा प्रभाव कायम राहतो.
  झाशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाच्या लेखिका

Trending