आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjeet Rajpat Article About Satpuda Hills, Divya Marathi

सातपुड्यातल्या भय-पर्वाची कहाणी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोनशे वर्षांपूर्वी संपूर्ण देशात ठगांचा विलक्षण उपद्रव होता. त्या ठगांच्या टोळ्यांपैकी एका टोळीचा सरदार होता अमीरअली. त्याने 719 माणसांना गळा आवळून ठार मारले होते. साखळदंडाने जखडलेल्या बेडर अमीरअलीने काळोख्या रात्रींच्या साक्षीने, कंदिलाच्या उजेडात, कर्नल मेडोज टेलरपुढे आपला रक्तलांछित जीवनपट कथन केला. तोच जगप्रसिद्ध ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकाचा खर्डा होता. एखाद्या जबरदस्त मल्टिकास्ट बिग बजेट चित्रपटाची कथा शोभेल, असा हा मेलोड्रामा...

‘ठगवणे’ या शब्दाची व्याप्ती वर्तमानात केवळ ‘चोरी’ अशा अर्थापुरतीच मर्यादित आहे. पण साधारण 200 वर्षांपूर्वी ‘ठगी’ या शब्दाची सातपुड्यात प्रचंड दहशत होती. ठगांचं नावं निघालं तरी भल्याभल्यांना कंप सुटायचा. ठगाचा रुमाल पडला की गळा आवळून खून आणि लुटालूट, असाच अर्थ होता. त्या काळी हिंदुस्थानात आणि त्यातल्या त्यात सातपुड्यात प्रवास करणं हे फारच खडतर काम असे. तीर्थाटन, यात्रा, व्यापार-उदीम या कारणांस्तव घरून प्रवासास निघालेला एकटा-दुकटा माणूस काय किंवा पाच-पंचवीस जण एकत्र मिळून जरी निघाले, तरीही सुखरूप घरी परत येतीलच, याची काहीही शाश्वती नसे. त्या काळी संस्थानिकांची वा राजे-महाराजांची छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. त्यातील बहुतेक राजे विलासी वृत्तीचे आणि एकमेकांचे कट्टर हाडवैरी असल्याने सार्वभौम कायदा-सुव्यवस्था हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे चोर, डाकू वा लुटारू, भामट्यांचं आयतंच फावलेलं असे.

लांबच्या प्रवासासाठी यात्रेकरूंचा एखादा जथा निघालाच तर त्यांना अशा विविध संस्थानांतून प्रवास करावा लागत असे. एक-दुसर्‍याला अपरिचित अशी कितीतरी मंडळी सुरक्षेच्या दृष्टीने साथसोबतीने प्रवास करत असत. त्यातील बहुतेकांचा प्रवास पायीच होत असला तरीही व्यापार-उदीम करणारी अनेक मंडळी उंट, घोडे, गाढव किंवा
बैलगाड्यांवरती कापड-चोपड अथवा इतर किमती माल लादून त्याच्या आसर्‍यानेच प्रवास करत असत. मजल-दरमजल मुक्काम करत अनेक महिने हा प्रवास चालत असे. प्रवासातला मुक्काम हा गावाबाहेरच्या ठरलेल्या आमराईत किंवा मंदिर-मठाच्या परिसरात पडत असे. वाटेत काही अनर्थ घडल्यास अनोळखी यात्रेकरूंची खबरबात घेणारा कोणीही नसे. अशा पोषक वातावरणाचा गैरफायदा चोर, डाकू वा लुटारू, भामट्यांनी उचलला नसता तरच नवल! या जीवघेण्या लूटमारीच्या साखळीतलाच एक सशक्त दुवा म्हणजे ठग, ठगी किंवा ठगांचा धंदा. कित्येक शतके लूटमारीचा हा भयंकर कारखाना संपूर्ण हिंदुस्थानभर अगदी सुखेनैव सुरू होता. पण कुणीही त्यांचा बीमोड करत नव्हतं.

ब्रिटिश अधिकार्‍यांनी सर्वप्रथम या ठगांना अटकाव केला. रजा घेऊन आपल्या गावी जाण्यास निघालेले, ब्रिटिश सैन्यातील काही हिंदी शिपाई वाटेतच नाहीसे व्हायला लागले. अनेकदा शोधाशोध करूनही त्यांचा कसलाही ठावठिकाणा लागत नसे, म्हणून ब्रिटिश कमांडर इन चीफ यांनी देशातील सर्व सैन्यात एक हुकूमनामा फिरविला. ‘मार्गात काहीतरी भयंकर धोका आहे, सर्वांनी सावधानतेने प्रवास करणे गरजेचे आहे.’

या भयंकर गोष्टीचा शोध सुरू असतानाच अचानकपणे गायब झालेल्या लेफ्टनंट मान्सेल या ब्रिटिश अधिकार्‍याचा साथीदारांसह खून झाला. ते वर्ष होतं 1812. या घटनेमुळे ब्रिटिश सरकार खडबडून जागं झालं आणि हॉल्हेड नावाच्या अधिकार्‍याला बराचसा फौजफाटा सोबत देऊन त्याच मार्गाने चौकशीकरिता पाठवलं गेलं. तो लेफ्टनंट मान्सेलचा खून जिथे झाला त्या गावात पोहोचला खरा; पण स्वत:चाच जीव वाचवण्यासाठी त्याला त्या चोरट्यांसोबत युद्ध करावं लागलं.

पाठपुराव्यानंतर हॉल्हेडला पत्ता लागला की, शिंदे सरकारच्या राज्यातील ‘सिंघोस’ परगण्यात या ठग लोकांची पुष्कळ मोठी वस्ती असून कित्येक पिढ्या ते आपल्या संरक्षणाच्या निमित्ताने शिंदे सरकारात दरसाल बराचसा पैसा भरत असतात. लढाईत दाणादाण झाल्याने ते सर्व ठग जिवाच्या भीतीने चारही दिशांना पांगले, परंतु त्यांचा ठगीचा उद्योग मात्र बंद झाला नाही.

पुढे 1816 पर्यंत ठगीचा बीमोड करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडूनही काही विशेष तजवीज केली गेली नाही; पण पुढे हे ठग अत्यंत मग्रूर आणि शिरजोर होऊ लागल्यामुळे, ब्रिटिश सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घातले. संपूर्ण हिंदुस्थानावर अंमल आल्यानंतर ब्रिटिशांनी कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी या ठगांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली. 1830 सालापर्यंत मेजर बार्थवुईक, कॅप्टन वार्डला, कॅप्टन हेन्ली यांनी ठगांच्या बर्‍याचशा टोळ्या पकडून त्यांच्यावर खटले चालवले आणि त्यातील काहींना फासावर चढवले. तत्कालीन हिंदुस्थानी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंक व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी विल्यम स्लिमन या अत्यंत हुशार व तीव्रबुद्धी अधिकार्‍याची नेमणूक करून, ठगीच्या धंद्याच्या बीमोडाचे रणशिंग फुंकले. 1831 ते 1837 या कालावधीत 3266 ठग पकडले गेले. तरीही ब्रिटिश कागदपत्रांनुसार 1800 नामांकित ठग मोकळे होते.

त्या वेळच्या मध्य प्रांताच्या सागर जेलमधले काही कैदी चौकशीच्या निमित्ताने निजामाच्या हैदराबादेस आणले गेले. त्यामध्येच एक होता 719 माणसांना गळे आवळून ठार मारणारा, ठगांच्या एका टोळीचा सरदार ‘अमीरअली.’ साखळदंडाने जखडलेल्या बेडर अमीरअलीने काळोख्या रात्रींच्या साक्षीने, कंदिलाच्या उजेडात, कर्नल मेडोज टेलरपुढे आपला रक्तलांछित जीवनपट कथन केला. तोच जगप्रसिद्ध ‘कन्फेशन्स ऑफ ए ठग’ या पुस्तकाचा खर्डा होता. एखाद्या जबरदस्त मल्टिकास्ट बिग बजेट चित्रपटाची कथा शोभेल असा हा मेलोड्रामा. निर्विकार चेहर्‍याच्या अमीरअलीने, एका विशिष्ट तंद्रीत आणि लयीत बोलत हा जीवनपट कथन केला आणि मेडोज टेलरने तो वृत्तांत जसाच्या तसा लिहून काढला. पुढे मेडोज टेलर निजाम सरकारच्या नोकरीतून रिटायर झाल्यानंतर लंडनमध्ये स्थायिक झाला आणि अमीरअलीने कथन केलेल्या सत्य घटनांवर आधारित ‘कन्फेशन्स ऑफ ए ठग’ हे पुस्तक जुलै 1839 ला त्याने लंडनहून प्रसिद्ध केलं.

अनंत आत्माराम मोरमकर यांनी 1931मध्ये त्या मूळ पुस्तकाचं ‘ठगाची जबानी’ नावाने भाषांतरित केलेलं आणि अमरावती नगर वाचनालयाने दुर्मिळ यादीत टाकलेलं पुस्तक मला आमचे ज्येष्ठ मित्र साहित्यिक ज्ञानेश्वर दमाहे यांनी वाचायला सांगितलं. अनंत मोरमकरांनीही एकंदर पुस्तकाच्या केवळ पूर्वार्धाचंच भाषांतर केलेलं आहे. तेवढ्या आधाराने व इतर आणखी काही संदर्भग्रंथांमधून ठगांच्या जीवनपद्धतीविषयी माहिती मिळते.

ठगीच्या धंद्याच्या उगमाविषयी ‘कन्फेशन्स ऑफ ए ठग’मध्ये अमीरअली म्हणतो, ‘सृष्टीच्या उत्पत्तीकाळी परमात्म्यापासून दोन शक्ती उत्पन्न झाल्या, पैकी एक उत्पादक शक्ती आणि दुसरी संहारक म्हणजे नाश करणारी शक्ती. अर्थातच या दोन तुल्यबळ शक्तींनी आपले काम इतक्या जोरात चालवले की संहारक शक्तीच्याने तिची बरोबरी करवेना व तशी बरोबरी करण्याची तिला आज्ञाही नव्हती. तरीही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी वाटेल त्या उपायाची योजना करण्याची मोकळीक तिला मिळालेली. संहारक शक्तीचं रूप म्हणजे कालिमाता. तिने आपल्या हाताने मातीची एक मूर्ती घडवून ती सजीव केली आणि आपल्या सर्व भक्तांना गोळा करून त्यांना ‘ठग’ हे नाव दिले. तिने त्या सगळ्यांना ठगीची विद्या शिकवली आणि त्या विद्येच्या सामर्थ्याने देवीने खुद्द आपल्या हाताने त्या मूर्तीचा जीव घेऊन दाखविला. पृथ्वीवरील मनुष्यमात्रास फसवून त्यांचा युक्तीने नाश करता यावा, म्हणून देवीने ठगास विशाल बुद्धिमत्ता व अलौकिक बुद्धिचातुर्य दिले. या प्राणनाशाच्या बदल्यात बक्षीस म्हणून मृतकाचे वित्त मिळेल ते घ्यावं, असं सांगितलं. म्हणून सर्व जाती-जमातीतले सगळेच ठग देवीचे म्हणजेच कालिमातेचे उपासक आहेत. एकदा का विधिवत देवीचा गूळ खाल्ला की तो माणूस ठग म्हणून त्याच्या देवकार्यास मोकळा. मुलायम रेशमी रुमाल आणि त्याच्या एका टोकाला बांधलेला चांदीचा तुकडा अथवा रुपया, एवढंच ठगाचं अमोघ शस्त्र. एकदाचा का हा रुमाल बनिजाच्या गळ्यात पडला की त्याचा खेळ खलास.’
(क्रमश:)
(ranjitrajput5555@gmail.com)