आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjeet Rajput About Hill Station Toranmal, Rasik, Divya Marathi

रानपिंगळ्याची पाखरमाया..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'करपलेल्या पानगळीचे जाळीदार वस्त्र परिधान केलेल्या रानवाटा संध्यामग्न होत असताना एका पाखराची भरारी माझ्या नजरेत भरली. जगातून 113 वर्षांपूर्वी नामशेष झालेला आणि 1997ला अमेरिकेच्या पक्षिशास्त्रज्ञाने शोधून काढलेला रानपिंगळा・चक्क समोर प्रगटला होता...'
एका सांजवेळी तोरणमाळच्या रानात साडेसाती घाटाने प्रवेशलो. हाय, हॅलोचे सोपस्कार पूर्ण करणार्‍या शहराच्या बेगडी संवाद संस्कृतीतून खूप दूर म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर・आलो होतो. शिशिराच्या सरत्या पानगळीत वसंत ऋतूची हळुवार चाहूल जाणवू लागली होती. दर्‍याखोर्‍यातील रान पार बोडकं झालं होतं. करपलेल्या पानगळीचे जाळीदार वस्त्र परिधान केलेल्या रानवाटा संध्यामग्न होत असताना एका पाखराची भरारी माझ्या नजरेत भरली. जगातून 113 वर्षांपूर्वी नामशेष झालेला आणि 1997ला अमेरिकेच्या पक्षिशास्त्रज्ञाने शोधून काढलेला रानपिंगळा・चक्क समोर प्रगटला होता...

जगातून 1886मध्ये नामशेष झालेला ‘रानपिंगळा’ 113 वर्षांनंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याच्या जंगलात 1997ला आढळून आला. त्यानंतर तो तोरणमाळ, यावल आणि मेळघाटातील ‘चौराकुंड’ वनक्षेत्रात अभ्यासकांनी शोधून काढला. आज वाघापेक्षाही दुर्मिळ असलेल्या रानपिंगळ्याच्या अभ्यासासाठी जगभरातून अभ्यासक सातपुड्यात येतात. रानपिंगळ्याच्या शोधात सातासमुद्रापार आलेल्या या पाहुण्यांची धडपड बघून मी माझी रानपिंगळ्याबद्दलची शोधयात्रा सातपुड्याच्या परिक्रमेतून सुरू केली...
रानपिंगळा हा इंग्रजीमध्ये फॉरेस्ट आऊलेट आणि शास्त्रीय भाषेमध्ये (हेटेरो ग्लॉक्स ब्लेव्हिटी) या नावाने ओळखला जातो. पिंगळा प्रकारातल्या तीन ते चार प्रजाती सामान्यपणे दिसत असल्या, तरी सर्वात सामान्य आणि सर्वांच्या परिचयाचा म्हणजे ठिपकेवाला पिंगळा; जो गावात, शेतात, रस्त्याच्या कडेच्या झाडांवर आणि जंगलात सर्वत्र आढळतो.

रानपिंगळे दिवसा आपल्या लपण्याच्या जागेवर किंवा झाडांच्या ढोलीत गुपचूप बसून असतात. सायंकाळ झाली की आपल्या घरट्यातून बाहेर पडून आवाजानं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. रात्री घरट्यातून बाहेर वावरताना दिसतात. रानपिंगळा हा घुबड प्रकारातला भारतातला एकमेव दिवसा वावरणारा पक्षी आहे. इ.स. 1872मध्ये त्याचा शोध लागल्यापासूनच तो कायम चर्चेत राहिला. एफ. आर. ब्लेविट या शास्त्रज्ञानं 1872मध्ये फुलझन (मध्य प्रदेश) मधून या पक्ष्याचे काही गोळा केलेले नमुने अभ्यासून पुढच्या वर्षीच प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ ए. ओ. ह्यू यांनी त्याचं वर्गीकरण केलं आणि हा पक्षी वेगळा असल्याचं संशोधन मांडलं. त्यानंतर या पक्ष्याचं शास्त्रज्ञाच्या नावानंच, म्हणजे अ‍ॅथिनी ब्लेविटी असं नामकरण झालं. 1877मध्ये या रानपिंगळ्याचा अधिक अभ्यास करण्यात आला. त्या वेळी हा पक्षी सरईपल्ली ते गोमर्धा, उंदती अभयारण्य, रायपूर ते बसना रोड (आताचे) या ठिकाणी आढळून आला. फेब्रुवारी 1877मध्ये व्हॅलेंटाइन बेल या अभ्यासकानं खारियार-संबलपूर (ओडिशा), नंदुरबार, तळोदा, खान्देश (सातपुडा, महाराष्ट्र) आणि रायपूर (मध्य प्रदेश) या ठिकाणाहून या पक्ष्यांचे एकूण पाच नमुने गोळा केले. हे सर्व नमुने आजही इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत. हा झाला या पक्ष्याच्या सुरुवातीच्या काळातला इतिहास. परंतु त्यानंतर हा पक्षी 1884च्या लिखित नोंदीनंतर कुणालाही सापडल्याची नोंद नसल्यामुळे पुढे विसाव्या शतकात या पक्ष्याचा समावेश नामशेष पक्ष्यांच्या यादीत झाला. त्या वेळी भारतातून नामशेष झालेल्या पक्ष्यांच्या शोध प्रकल्पादरम्यान, 1986मध्ये रानपिंगळ्यालाही शोधण्याचा प्रयत्न स्वत: डॉ. सलीम अली यांनी केला, मात्र तो त्या वेळी सापडू शकला नाही.

विसावे शतक सरताना अमेरिकन पक्षिशास्त्रज्ञांच्या एका समूहानं मात्र हा पक्षी अजून या पृथ्वीतलावर जिवंत असेल, अशी आशा ठेवून त्याला शोधण्याचं आव्हान स्वीकारलं. ब्रिटिश म्युझियममधून 100पेक्षा जास्त वर्षांपूर्वी गोळा केलेल्या नमुन्याच्या दिसण्यावरून आणि त्यांच्या सापडण्याच्या ठिकाणाच्या नोंदीवरून पामेला रासमुसेन, बेनकिंग आणि डेव्हिड अबॉट यांच्या संशोधन चमूनं मोहीम आखली आणि 1997ला भारतात येऊन गुजरातच्या पश्चिमेकडच्या टोकापासून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगेत शोधमोहिमेस प्रारंभ केला. 27 नोव्हेंबर 1997ला या चमूस नंदुरबारजवळच्या तळोद्याच्या जंगलात हा पक्षी पुन्हा सापडला. तब्बल 113 वर्षांनंतर रानपिंगळ्याचा पुनर्शोध लागला. या पुनर्शोधानंतर दुसर्‍याच वर्षी 1998ला रानपिंगळा अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्येसुद्धा सापडला. 1998-99 दरम्यान बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेनं या पक्ष्याबाबत सर्वेक्षण आणि सखोल अभ्यास करून या पक्ष्याचं अस्तित्व आणखी काही ठिकाणी शोधून काढताना मेळघाटात हा पक्षी सापडत असल्याचं सांगितलं. आज हा पक्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चौराकुंड वनक्षेत्र परिसरात सर्वात चांगल्या संख्येत, तसंच सातपुड्यातल्या यावल अभयारण्य, तळोदा आणि तोरणामाळचे (नंदुरबार-धुळे) जंगल, मध्य प्रदेशातल्या बर्‍हाणपूर, खंडवा जिल्ह्यातल्या तापीकाठचं जंगल इतक्याच ठरावीक ठिकाणी सापडतो. पुण्याच्या वाइल्ड लाइफ रिसर्च अँड कंझर्व्हेशन सोसायटीनं शतकापूर्वीच्या छत्तीसगड आणि ओडिशामधल्या त्याच्या ठिकाणांवर केलेल्या शोध प्रकल्पादरम्यान हा पक्षी मात्र पुन्हा सापडला नाही. सागबहुल जंगलामध्ये अधिवास असलेला हा पक्षी सातपुड्यामध्ये साधारणत: समुद्रसपाटीपासून 350 ते 1000 मीटर उंचीवर सापडतो.

रानपिंगळा हा आकारानं साधारणत: 23 सेंमी म्हणजेच सामान्य ठिपकेवाल्या पिंगळ्याच्या आकाराचा असून रंगानं करडा विटकरी आणि पोटावरची पिसं पांढर्‍या रंगाची असतात. रानपिंगळ्याचं खाद्य उंदीर, सरडे, पाली, कीटक असून हा झाडाच्या ढोलीमध्ये घरटे करून राहतो. आतापर्यंतच्या अभ्यासावरून सध्या जगभरात फक्त सातपुडा म्हणजेच महाराष्ट्रातच रानपिंगळा पक्षी सापडत असून त्याची ओळख सातपुडा प्रदेशनिष्ठ (एंडेमिक टू सातपुडा) अशी झाली आहे. या प्रजातीचे फक्त 50 ते 100 इतकेच पक्षी आज अस्तित्वात असावेत. त्यामुळेच या पक्ष्याचा समावेश दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीमध्ये वरच्या स्थानी केला गेला आहे. सध्याच्या काळात वृत्तीनं संकुचित होत चाललेली माणसं, आक्रसलेली जंगलं, या पक्ष्यांच्या अधिवासामध्ये होणारी वृक्षतोड, शेतीसाठी केलं जाणारं अतिक्रमण, वन तसंच परिसरातल्या शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक औषधं, इत्यादीमुळे हा पक्षी आणि त्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. ठरावीक ठिकाणी याचं अस्तित्व असल्यामुळे हे अधिवास जर आज आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही, तर 113 वर्षांनंतर पुनर्शोध लागलेला एक महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ पक्षी पुन्हा या पृथ्वीतलावरून लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.
(ranjitrajput5555@gmail.com)