आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjeet Rajput Article About Gavilgad Fort, Divya Marathi

गावलिगडाच्या उपेक्षित इतिहासाचे वर्तमान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतवर्ष आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट आजपर्यंत असा तब्बल एक हजार वर्षांचा बुलंद साक्षीदार असलेला गाविलगड अनेक वर्षे व-हाडची राजधानी राहिलेला. देवगिरीचे यादव, बहामनी, इमादशाही, निजामशाही, मोगल व मराठे अशा विविध सत्तांची धुरा, कुण्या राजपूत सुभेदारिणीच्या वास्तव्यखुणांची अस्पष्ट चाहूल बोलकी करणारी ‘राणीची देवळी’, तिच्या जोहाराची वीरगाथा आणि राजपूत सरदारांच्या शौर्याने पावन झालेला जाज्वल्य इतिहास गाविलगडाने सांभाळला आहे. भूमिगत क्रांतिकारकांच्या भीतीने हादरलेल्या इंग्रजांनी सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर असलेल्या गाविलगडास अक्षरश: उद्ध्वस्त केले. आजही आपल्या भग्न हृदयाने अनेक संकटांना तोंड देत, बुलंद तटबंदीला पडलेल्या चिरा कशाबशा सावरीत आपल्या वैभवाची आठवण जगाला करून देण्यासाठी तो शिल्लक आहे.

गाविलगडाच्या इतिहासावर आजवर अनेकांनी कार्य केले, दिग्गजांची संशोधनंही प्रसिद्ध झाली; पण वडिलांचे मोठेपण सांभाळण्यात वडीलभावाचे कर्तृत्व उपेक्षित राहते, त्याचे सामर्थ्य कुणाच्याही लक्षात येत नाही, अशीच शोकांतिका गाविलगडाच्या संशोधनाच्या संदर्भात इतिहासकारांची झाली. विशेषत: मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास तपासताना व-हाड प्रांत, त्यानंतर इलिचपूरचा मुख्य सुभा यांच्या इतिहासात राजघराणी आणि राज्यसत्ता यांची बहुतेक वर्णने आढळतात. परंतु गाविलगड जिंकल्याशिवाय व-हाड किंवा इलिचपूर जिंकता येत नव्हते, या गोष्टीकडे इतिहासकारांनी का म्हणून डोळेझाक केली असावी? प्राचीन डोंगरी-गवळी किंवा अहिर-गवळी वगैरे वन्यजातींनी किंवा महाभारत काळातील अस्तित्वखुणांपासून ‘गवळीगड’ या नावाने अस्तित्वात असणारा हा किल्ला सन 1200च्या अगोदर बांधला गेला. हा किल्ला सन 1185 पासून 1302 पर्यंत देवगिरीच्या यादववंशीय राजांच्या ताब्यात होता. म्हणूनच त्याच्या वास्तुशिल्पांवर यादवकालीन खुणा, वास्तुशिल्पकलेचा ठसा दिसून येतो, ही बाब गाविलगडाच्या इतिहासात स्पष्टपणे कुठेही मांडली गेली नाही. सन 1185 पासून 1302 पर्यंतचा यादवकालीन इतिहास उपलब्ध असला तरी शासकीय गॅझेटिअर्समध्ये अकोला किंवा अमरावती जिल्ह्यांच्या इतिहासात यादवकालीन गाविलगडाचा उल्लेख दिसून येत नाही. त्यामुळेच इतिहासाच्या अभ्यासकांना किंवा गडकिल्ल्याच्या संशोधकांना गाविलगडाचे आकर्षण वाटले नाही. दुसरे दुर्दैव असे की, गाविलगडाचा सन 1185च्या पूर्वीचा व सन 1302 ते 1425 पर्यंतचा सुमारे 123 वर्षांचा इतिहास कुठेही उपलब्ध नाही.

उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार बहामनी घराण्यातील नववा राजा अहमदशाह वली याने सन 1425मध्ये गाविलगड ताब्यात घेऊन त्याचे बांधकाम सुरू केले. बहामनशाहीचे विभाजन झाल्यानंतर इमादशाहीचा मूळ पुरुष फतेहउल्ला याने सन 1488मध्ये त्याची दुरुस्ती केली. फतेहउल्ला इमादउल-मुलक म्हणून 1471 पासून गडाचा सुभेदार होता. त्याने सुप्रसिद्ध शार्दूल दरवाजावर विजयनगरच्या हिंदू राज्याचे विजयचिन्ह ‘गंड-भेरुंड’ कोरले, असेही उल्लेख आढळतात. मोगलकालीन इतिहासात अकबरासोबतच शहाजहाँपासून औरंगजेबापर्यंत गाविलगड मोगलांच्या ताब्यात असल्याचे उल्लेख आहेत. किल्ले दौलताबादचे निर्माण होताना, गाविलगड औरंगजेबाच्या ताब्यातील प्रमुख किल्ला असल्याचे सांगण्यात येते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगात चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर असलेल्या गाविलगडाचा गड-किल्ल्याचे वास्तुशिल्प म्हणून विचार केल्यास सुमारे 12 ते 13 किलोमीटर परीघ आणि भव्यता स्पष्टपणे नजरेला जाणवल्याखेरीज राहत नाही. त्यांच्या तिन्ही बाजूंनी उंच, अभेद्य आणि शाबूत असलेले कडे आहेत. या तटबंदीच्या आत आणि समांतर अंतर राखून त्यांचे अंतर्याम उभे आहे. चिखलदर्‍याच्या पठाराकडे असलेला दिल्ली दरवाजा, त्यामागचा बुरुजबंद दरवाजा, अचलपूरच्या दिशेने असलेला आणि त्या काळी मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा अचलपूर किंवा पीरफत्ते दरवाजा आणि नरनाळ्याकडे जाणारा वस्तापूर दरवाजा किल्ल्याच्या बांधणीचे मुख्य दरवाजे असून त्यापैकी काहींची स्थिती अद्यापही चांगली आहे.

सुमारे 10 ते 12 कि.मी. परिघात दूरवर पसरलेल्या गाविलगडाच्या भव्य वास्तूचे स्वरूप आणि ती उभी करण्यासाठी हिंदू आणि यावनी कलाकारांनी व कारागिरांनी विविध कालखंडांत घेतलेले कष्ट याचा स्पष्ट उल्लेख वास्तुशिल्पाचा इतिहास म्हणून उपलब्ध नाहीत. निदान आतापर्यंतच्या संशोधनात ते मिळालेले नाहीत. परंतु हिंदू आणि यादवी वास्तुशिल्पकलेचा एक मनोरम आलेख गाविलगडाच्या विस्तारात सर्वत्र प्रकट होतो. गाविलगडावर आज शिल्लक असलेल्या इमारती आणि अवशेषांचा विचार केल्यास गाविलगडाचे बुरुज आणि प्रचंड दगडी दरवाजे याशिवाय नागमंदिर, राणीमहाल, या महालावरील ‘राणीची देवळी’ (झरोका), हत्तीखाना, राजाची समाधी, देवीमंदिर, मोठी मशीद आणि इतर अनेक छोट्यामोठ्या वास्तू आजही सुस्थितीत परंतु काळाशी झुंज देताना आढळतात. उभ्या महाराष्ट्रात गाविलगडाचा जुळा भाऊ नरनाळा सोडल्यास एवढे मोठे इतिहासकालीन अवशेष आज क्वचितच एखाद्या किल्ल्यावर आढळतील.

भोसलेपूर्व काळापासून, गाविलगडाची ख्याती त्यावरील अचूक मार्‍याच्या तोफांसाठी होती. आजही सुस्थितीत असलेल्या कालभैरव आणि बिजली या त्यांच्या कड्यांसह घडविलेल्या अखंड तोफा आहेत. पैकी एक सुमारे 19 फूट लांब, तर दुसरी सुमारे 16 फूट लांब आहे. एक पीर-फतेह दरवाजावर असून दुसरी चिखलदर्‍याकडे आहे. याशिवाय आणखी चार छोट्या तोफा खाली उतरविण्यात आल्या. काही पोलिसांच्या ताब्यात होत्या. काही अष्टधातूंच्याही तोफा होत्या. अष्टधातूंच्या तोफेचे 3 क्विंटल वजनाचे अवशेष वन विभागाने जपून ठेवले आहेत. ऐने अकबरीतील उल्लेख आणि इतिहासकार अबुल फाजलने केलेल्या वर्णनानुसार गाविलगडावर तोफा ढाळण्याचे आणि पोलादी शस्त्रांचे काम अतिशय उत्कृष्ट होत असे. मेळघाटातल्या डोंगरदर्‍यांत विखुरलेली त्याची व्यापकता आणि वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून आपल्याला ‘सुबक आकार, व्यापक विस्तार’ याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

भोसलेंच्या दरबारी,राजपुतांची सरदारी
गाविलगडाची मालकी भोसल्यांकडे आल्यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या आणि भक्कम किल्ल्यासाठी योग्य अशा सरदाराची आवश्यकता भोसल्यांना जाणवू लागली. अशातच बंगालवरील एका लढाईत इंग्रज आणि नवाबाशी झालेल्या युद्धात झामसिंग नावाच्या शूर आणि इमानदार राजपूत सरदाराशी भोसल्यांची गाठ पडली. बंगालची लढाई भोसल्यांनी जिंकली आणि त्याचबरोबर झामसिंगचे मनही वळवले. पराभवाने अपमानित झालेला झामसिंग भोसल्यांच्या मोठेपणाने आणि मार्दवाने विरघळला. भोसल्यांच्या दरबारी त्याने सरदारी स्वीकारली आणि गाविलगडाची किल्लेदारी त्यानंतर राजपूत सरदारांकडे आली. गाविलगडाचा पाडाव होईपर्यंत गाविलगडाची किल्लेदारी झामसिंगाच्या वंशजांकडे कायम होती. झामसिंगनंतर त्याचा पुतण्या प्रमोदसिंग, प्रमोदसिंगाचा मुलगा दर्यावसिंग आणि त्याचा मुलगा सरदार बेणिसिंह ही नररत्ने गाविलगडाच्या उज्ज्वल परंपरेची व चिवट झुंजीची खरी साक्ष होत.

इंग्रजांनी सारा हिंदुस्थान पादाक्रांत करणे सुरू केल्यानंतर मध्य भारतातील गाविलगडासारख्या अभेद्य किल्ल्याचा पाडाव करणे त्यांना आवश्यक वाटू लागले. त्यानुसार गव्हर्नर वेलेस्ली आणि कर्नल स्टीव्हन्सन यांच्या नेतृत्वाखाली 20 नोव्हेंबर 1803 रोजी गाविलगडाची मोहीम इंग्रजांनी सुरू केली.

सरदार बेणिसिंह आणि त्याचे साथीदार उत्तरेचा बंदोबस्त करण्यात गुंतले असताना गव्हर्नर वेलेस्लीला नवाबाच्या फितुरीने दक्षिणेकडील मार्‍याची जागा सापडली होती. मारा अचूक ठरला. इंग्रज सैन्य समोर सरकू लागले. परंतु उत्तरेचा बंदोबस्त केल्यास दक्षिण आघाडी सांभाळण्याची उमेद अद्यापही बेणिसिंहाच्या मनात होती. आणि 15 डिसेंबर 1803 रोजी प्रचंड असा दिल्ली दरवाजा उघडून सरदार बेणिसिंह स्टीव्हन्सनवर तुटून पडला. सरदार बेणिसिंह उत्तरेकडे गुंतल्याचे पाहून गव्हर्नर वेलेस्लीने धडक मारली. आणि इंग्रज सैन्य किल्ल्यात घुसले. पराक्रमाची शर्थ करून लढणार्‍या बेणिसिंहला या लढाईत वीरगती प्राप्त झाली. मात्र उत्तरेकडून नाजूक असलेल्या गाविलगडात बेणिसिंहला मरण येईपर्यंत स्टीव्हन्सनचे सैन्य गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकले नाही.

अशाही परिस्थितीत बेणिसिंहाच्या कर्तृत्वाचा आणि स्वामिनिष्ठेचा कळस म्हणजे एवढ्या घनघोर लढाईत गुंतला असतानाही त्याने भोसल्यांचा संपूर्ण खजिना आणि दौलत वस्तापूरमार्गे किल्ले नरनाळ्यावर पोहोचवली. लढाईत कसलेल्या सुमारे 160 स्वामिनिष्ठ भोयांनी हा खजिना तीन रात्रींतून नरनाळ्यावर पोहोचवला. एवढे असूनही ताब्यात आल्यानंतर इंग्रजांना गाविलगडावरील तळघरातून 500 कोटींची लूट मिळाली. शिवाय सुवर्णपत्रावर लिहिलेली कुराणाची प्रतही त्यांनी ताब्यात घेतली. फितुरीचे आर्थिक बक्षीस म्हणून ही कुराणाची प्रत अचलपूरच्या नवाबाला भेट देण्यात आली. गाविलगडाच्या पाडावानंतर गडाच्या पायथ्याशी 17 डिसेंबर 1803 रोजी देवगाव येथे इंग्रज आणि भोसले यांच्यात तह झाला आणि व-हाडातील मोहीम संपली.