आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानतीर्थ लोणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसॉल्ट खडकातील एकमेव भारतीय आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचे लोणार सरोवर. हजारो वर्षांची उपेक्षा पचवणार्‍या या सरोवराचं नाव चंद्रावर असलेल्या अवशेषांशी असलेल्या साधर्म्यामुळे अचानक जगासमोर आलं. काही निवडक खगोलप्रेमींना जरी लोणार हे विज्ञानतीर्थ वाटत असले तरी सामान्यांपर्यंत लोणारची महती पोहोचलेली नाही. जागतिक दर्जाचा हा नैसर्गिक ठेवा महाराष्ट्रात सातपुडा पर्वत उपरांगांतील बुलडाणा जिल्ह्यात आहे, पण खुद्द बुलडाणा आणि लोणार सरोवरातल्या परिसरात राहणार्‍या बहुसंख्य लोकांना आजही त्याचे महत्त्व ज्ञात नाही.
बेसॉल्ट खडकामध्ये म्हणजे, काळ्या दगडात आकार घेतलेलं लोणार विवर हे जगातील एकमेव विवर आहे. विवराचा वरचा भाग वर्तुळाकार असून, त्याचा परीघ सहा किलोमीटर इतका आहे. विवरात मधोमध वर्तुळाकार भागात पाच ते सहा मीटर खोलीचे खारे पाणी आहे. सध्याचा परीघ अंदाजे चार किलोमीटर आहे. विवराच्या कडा 100 ते 80 अंशांच्या उतारात असून, त्यावर वृक्षराजीचे आच्छादन आहे. तलावाकाठी बाराव्या आणि तेराव्या शतकातील पुरातन मंदिरसमूह आहे. सरोवराच्या बाहेरील बाजूस स्वच्छ पाण्याचा अखंड वाहणारा झरा आहे. त्याचा उगम गंगेपासून झाल्याचे मानण्यात येते.

या धार मंदिरसमूहात बारमाही गोड्या पाण्याची धार पडत असते. या शिवाय सीता वाहिनी, रामगया असे दोन झरे आहेत. लोणार सरोवराचे पाणी समुद्राच्या पाण्याच्या सातपट खारट आहे. त्यात क्लोराइड आणि फ्लोराइडचे प्रमाण जास्त आहे. परिसरातील क्षार वाहून तळ्यात जमा होतात. हजारो वर्षे एकाच ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे या पाण्याला तीव्र खारटपणा आला असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये या सरोवराच्या पाण्यातून दल्ला नमक, पिपडी, खुप्पल आणि भुस्की असे सोडा आणि मिठाचे प्रकार तयार करतात, असे लिहिलेले आहे. जे.ई.अलेक्झांडर या ब्रिटिश अधिकार्‍याने सर्वप्रथम 1823 मध्ये लोणार हे एक विवर असण्याची शक्यता व्यक्त केली. तेव्हापासून सुमारे दीडशे वर्षे हे एक मृत ज्वालामुखीचे विवर असावे, असा समज कायम राहिला. परंतु 1952मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ सी.ए. कॉटन यांनी त्यांच्या ‘ज्वालामुखीचा भूरचनेतील सहभाग’ या प्रबंधात भारतीय उपखंडात ज्वालामुखीचे उद्र्रेक अतिप्राचीन काळापासून झालेले दिसत नाहीत. परिणामी ज्वालामुखीमुळे होणारे भूगर्भीय बदल आणि जमिनीची रचना लोणार सरोवराच्या बाबतीत दिसत नाही, हे निदर्शनास आणले. हे विवर अशनीपाताच्या घटनेमुळे तयार झाले असावे, अशी शक्यता प्रथम चर्चेला आली, 1961 मध्ये. एन.सी. नंदी आणि व्ही.बी. देव यांनी विवरातील दगड खोदून केलेल्या सर्वेक्षणातून तेथे ब्रॅकिया प्रकारचे प्रचंड आघाताने तयार झालेले दगडाचे नमुने मिळाले. त्यातून हे विवर ज्वालामुखीपासून बनलेले नाही, तर आघातविवर आहे हे नक्की झाले. तर 1964 मध्ये युजेन लाफोंड यांनी रॉबर्ट डाएझ यांच्याबरोबर केलेल्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आणले की, विवराच्या समवर्तुळाकार, कडेला असणारा तुलनेत कमी उंचीचा उंचवटा, त्याचा क्षितिजरेषेशी असणारा उतरता कोन आणि विवरातील जमिनीची धूप होऊन तयार झालेली नवीन दगडमाती हे सर्व प्लिस्टोसीन कालखंडातील उलथापालथ दाखवतात. या विवराचा जन्म साधारणत: 50,000 वर्षांपूर्वी झाला असावा.

त्या काळात किंवा भारतात ज्वालामुखीचे उद्रेक झालेले दिसत नाहीत. त्यानंतर भारतातील सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडी इन जिऑलॉजी, सागर विद्यापीठ, मध्य प्रदेशाच्या व्ही.के. नायक यांनी अलीकडे जे संशोधन केले, त्यात त्यांना विवराच्या दगडांमध्ये काचसदृश गोलाकार गोटे मिळाले. 1 ते 5 सें.मी आकाराचे हे मणी म्हणजे अतिदाबाखाली, घर्षणाने व अतिउष्णतेने दगड वितळून तयार झालेली एक प्रकारची काच होती. ही अत्यंत वेगाने झालेल्या अशनीपाताच्या आघातानेच घडू शकणारी घटना होती. 1973 मध्ये अमेरिकेच्या स्मिथसोनियन संस्थेतील के फ्रेडरिकसन, यू.एस. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ कॅनडाचे डी.जे. मिल्टन, भारतीय भूवैज्ञान संस्थेतील ए. दुबे आणि एम.एस. बालसुब्रह्मण्यम यांनी केलेल्या संशोधनुसार विवरात खोलवर केलेल्या उत्खननातील नमुन्यात ब्रॅकियासोबतच ‘मस्केलिनाइट’ प्रकारचे दगड सापडले. या दगडात विशिष्ट प्रकारच्या भेगा दिसून आल्या. मस्केलिनाइट प्रकारचा दगड तयार होण्यासाठी वातावरणाच्या दाबाच्या 4 लाख पट दाब आवश्यक असतो, हा दगड ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होत नाही. दगडात शंकूच्या आकाराच्या भेगा पडण्यासाठी प्रचंड वेगात आघात व्हावा लागतो. या संशोधनातूनच खर्‍या अर्थाने लोणार विवराच्या निर्मितीचे रहस्य उलगडले. त्यानंतर डी. लाल, डी मॅकदुगल आणि एल. विल्किन्सन या तीन संशोधकांनी फिशन ट्रॅक डेटिंगच्या पद्धतीने या विवराचे वय 50,000 वर्षे असावे, असे निश्चित केले, तर सेनगुप्तांनी 1996 मध्ये आघाताने तयार झालेल्या काचमण्यांच्या विश्लेषणातून हा आघात 52,000 वर्षांपूर्वी झाला हे सिद्ध केले.

लोणारसंदर्भातील संशोधनातील सर्वात महत्त्वाची बाब ठरली ती म्हणजे, फ्रेडरिकसन आणि सहकार्‍यांनी जेव्हा चंद्रावरून आणलेल्या विवरातील दगडांचे आणि लोणार विवरातील दगडांचे विश्लेषण केले, तेव्हा चंद्रावरील दगडांचे लोणार विवरातील दगडांशी असणारे अतीव साधर्म्य पाहून ते चक्रावून गेले. बेसॉल्ट प्रकारच्या दगडात जगातले एकमेव ठरणारे लोणार हे आघातविवर, चंद्रावरील आघातविवरांशी साधर्म्य दाखवत असल्याने, सूर्यमालेतील एकूणच आघातविवरांच्या अभ्यासासाठी एक नवे दालन व अनमोल उपलब्धी ठरले आहे. हीच बाब या विवराचे जतन करण्यासाठी आणि जागतिक वारसा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यास पृथ्वीवरील चंद्रवंशी लोणार सरोवर म्हणूनही येणार्‍या काळात संबोधले जाईल.